Minakshi Jagtap

Abstract Children Stories Comedy

2  

Minakshi Jagtap

Abstract Children Stories Comedy

आठवणी बालपणीच्या.

आठवणी बालपणीच्या.

7 mins
106


     नकळत खोड्या करणे, नासमज होऊन चुका करणे, थोड्या थोड्या गोष्टीवर रडणं, बहीण भावाच्या चुगल्या आई बाबांना सांगणं, दिवसभर इकडे तिकडे हिंडणे, मित्रांशी कधी कट्टी तर कधी दोस्त करणे, असंख्य गप्पा, मस्ती, भांडण, रात्री आई बाबा व इतर सर्व मंडळी झोपल्यावर तोंडावर गोधडी पांघरून बहिणीशी गप्पा करणे, हळूच पावलांनी डब्ब्यातून खाऊ काढून घराच्या पाठीमागे बसून खाणे, आई बाबा रागावले की तोंडाचा मोठा भोंगा करून रडणे, थोड्या वेळाने लगेच आईला बिलगणे...

       बालपणाच्या आठवणीत अजुन खुप खुप भरले आहे. सांगितल तेवढं आठवतं जातं आणि बस या आठवणी डोळ्या समोर तरंगायला लागतात.

     आजही लहान मुलांना गप्पा मारताना पाहिले की मला त्यांच्या गोष्टी ऐकत रहावे असे वाटते. आणि खरंच मला माझ्या बालपणाची आठवण येते. माझ्या मुलांना मी माझ्या बालपणीच्या खोड्या सांगते तर तेही खुप हसतात.

     लहान असताना आपल्याकडून पुष्कळशा चुका घडत असतात. त्या गोष्टी आठवल्या की मनात रागही निर्माण होतो आणि स्वतःची लाजही वाटते.असे वाटते की अरे मी लहानपणी अशी होती? कधीकधी त्या गोष्टींवर खूप हसूही येतं.माझ्या बालपणाच्या गोष्टी आता मी तुमच्या समोर सादर करत आहे ऐका आणि हसा नक्की हं.

      1992 मध्ये सुरत मध्ये झालेले दंगे सर्वांनाच माहित त्यावेळेला वातावरण खूपच भयंकर झाले होते.हिंदू-मुस्लिम दंगल चालले होते.सगळीकडे जणू काही वनवा पेटला होता. असंख्य लोक जीव गमावून बसले . कर्फ्यू सुरू होता. सर्वजण आपापल्या घरात किंवा आपल्या गल्लीतच लोक फिरू शकत होते बाहेर दिसणाऱ्या लोकांना पोलिस मारत होते. अशातच एकदा काय झाले .मी खूपच लहान होती . पहिली किंवा दुसरीला असेल.माझे वडील वेल्डरचे काम करायचे. दारे-खिडक्या लोखंडाचे पलंग वगैरे ते घरीच बनवायचे. आमची घरचीच वेल्डिंग मशीन होती. त्यामुळे घराच्या बाहेर अंगणात नेहमी त्यांचे साहित्य पसरलेले असायचे. मी लहानपणी माझ्या वडिलांना खूपच घाबरायची. कारण त्यांना पिण्याची सवय होती.

    तर अशावेळी माझे वडील अंगणातच काहीतरी लहानसे काम घेऊन बसले होते. त्यांचे वेल्डिंगचे साहित्य इकडे तिकडे पडलेले होते. गल्लीतल्या गल्लीत लोक बाहेर निघू शकत होते पण रोडावर जाऊ शकत नव्हते. मी माझ्या वडिलांकडे पहात होती. की ते कशा रीतीने काम करतात. त्यांनी हातोडी घेतली आणि लोखंडावर ठोकू लागले. मी पण एक लहानशी हातोडी तिथे पडलेली होती ती घेऊन एका वस्तूवर ठोकू लागले. पण माझ्या एकदाच ठोकल्याने त्या वस्तूचे दोन तुकडे झाले. माझ्या वडिलांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. पण हा सर्व प्रकार माझे मोठी बहीण जी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे ती पहात होती. मी पहिलीला आणि ती तिसरीला होती. ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, "अगं हे काय केलं? पप्पांची कामाची वस्तू तोडून टाकली. आता पप्पा तुला काही सोडणार नाही. आता तर तुला खूपच मार पडेल." ती वस्तू तोडल्यानंतर जेवढी भीती मला वाटली नव्हती. तेवढी भीती मला माझ्या बहिणीने घाबरवल्यामुळे वाटायला लागली. मी हळूच हातोडी बाजूला केली आणि ज्या वस्तूचे दोन तुकडे झाले होते त्याला जोडण्याचा प्रयत्न करू लागले. ज्याच्याने आपण चाकू कातर वगैरेंना धार लावतो असा तो दगड होता. मी तर खूपच घाबरली होती. त्यात तो दगड काही जुळत नव्हता. मी हळूच तिथून उठली आणि समोरच एक पडीक घर होते. त्या घरच्या मागच्या बाजूला जाऊन बसली. तिथून चोरून पप्पांकडे पाहू लागली. पण पप्पा तर स्वतःचा कामात मग्न होते. जवळ जवळ एक तास गेला. मी अजूनही तिथेच बसून होते. थोडा अंधार पडायला लागल्यावर पप्पांनी त्यांचे सर्व साहित्य गोळा केले. त्यात त्यांना दिसले की त्या दगडाचे दोन तुकडे झाले आहे. तेवढ्यात माझी बहीण आली आणि तिने पप्पांना सांगितलं की ,"पप्पा तुमच्या दगडाचे तुकडे मीनानेच केले आहे." लगेच पप्पा तिला म्हणाले," की जाऊ दे, काही कामाचा नव्हता तो दगड. पण मीना कुठे आहे?" तेव्हा माझ्या बहिणीने सांगितले की ,"ती तुम्हाला घाबरून त्या घराच्या मागे जाऊन बसलेली आहे." पप्पांनी सांगितले की ,"जा ,तिला घेऊन ये." तशी माझी बहीण माझ्याकडे धावत येताना मला दिसली. मी गल्लीत इकडे तिकडे पळू लागले. तेव्हा पप्पांनी मला आरोळी मारून सांगितले की ,"अगं घरी ये मी तुला मारणार नाही. तो दगड काहीच कामाचा नव्हता. तू घरी ये . अंधार पडत आहे. "पण मला वाटले की पप्पा मला गोड बोलून घरी आणतील आणि नक्कीच मारतील. मी काही घरी येत नव्हती. माझी बहीण मला वेगवेगळ्या रीतीने पकडण्याचा प्रयत्न करत होती पण मी काही हातात सापडत नव्हती. आणखीन एक तास गेला. शेवटी पप्पाच मला घेण्यासाठी येताना दिसले. मी तर आणखीनच घाबरले आणि रोडा च्या दिशेने पळू लागले. आता तर पप्पांचा जीव घाबरला. कारण रोडावर कर्फ्यू सुरू होता सगळीकडे सुमसाम होते. रस्त्यावर रिक्षा गाड्या होत्या. काही काही ठिकाणी दोन-तीन पोलीस शिवाय दुसरा एकही मनुष्य दिसत नव्हता. मला पडताना पाहून पप्पांनी आरोळी मारली की ,"तिथे पोलीस आहेत तू जाऊ नकोस." पण त्या वेळेला मला पोलिसांपेक्षा सुद्धा जास्त भीती पप्पांची वाटत होती. मग काय, मी तर पळत सुटली. पप्पा लपत लपत माझ्या मागे येत होते. मी पप्पांना बघून तिथे उभ्या असलेल्या एका रिक्षात लपून बसले. रिक्षाच्या थोड्याच अंतरावर चार पोलीस उभे होते. पप्पा रिक्षाच्या दिशेने येत होते

 मी लगेच त्या रिक्षातून निघाले आणि त्याच्या मागे उभे असलेल्या तिसऱ्या रिक्षेत जाऊन बसली. पप्पा बिचारे मला हळूहळू सांगत होते की," तू घरी ये मी तुला काहीच करणार नाही बेटा." पण माझी भीतीच काही कमी होत नव्हती. शेवटी पप्पांनी लपत लपत मला रिक्षातून पकडले. पण मी जोर जोराने रडायला लागली. माझ्या आवाजाने पप्पा घाबरले त्यांनी मला सांगितलं की ,"ओरडू नको येथे पोलीस उभे आहेत." आणि खरोखरच माझ्या आवाजाने पोलीस पळत आले. त्यांना दिसलं की एक व्यक्ती लहान मुलीला पकडून उभा आहे आणि मुलगी खूप रडत आहे. ते वडिलांकडे आले आणि त्यांना एक काठी मारली. नंतर संतापाने विचार पुस करू लागले. पप्पांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते पप्पांवर अधिकच भडकले त्यांनी सांगितलं की ,"अशा गंभीर परिस्थितीत सुद्धा तुम्हाला कळत नाही का कसं वागलं पाहिजे.?"पण खरोखर त्यात माझ्या पप्पांची काहीच चूक नव्हती तरीसुद्धा पप्पांना खाली मान घालून सर्व काही ऐकून घ्यावं लागलं. आणि पोलिसांच्या दांडा खावा लागला. पोलिसांचं सुद्धा न ऐकता मी जोरजोराने रडत होती. शेवटी ते पोलीस मला घरापर्यंत सोडायला आले. आणि पप्पांना सांगितलं की आता तिला बिलकुल मारायचं नाही. पप्पा हो म्हटले आणि मला घरात घेऊन आले.

    पोलीस तर निघून गेले.बिचारे माझे पप्पा मला थोडेच रागवले ,मारलंही नाही. परंतु माझ्या आईने मला सोडलं नाही. पोलीस गेल्या नंतर माझ्या आईने मला जो धू धू धुतलं ते मी वर्णनच करू शकत नाही.😊

    अशा रीतीने माझ्या वडिलांना माझ्या मूर्खपणामुळे जे काही सोसावं लागलं त्याचा पस्तावा मला कधी कधी होतो. दुःखही होते. असे असते हे बालपण,

     आता दुसरी एक कथा सांगते.माझी आई आम्हा दोघी बहिणींना घेऊन दरवर्षी दिवाळीला मामाच्या घरी जात असे. आम्हाला मामाच्या गावाला जायला खरोखरच खूपच मजा यायची. दर दिवाळीला मामा आम्हाला नवे नवे कपडे घेऊन देत असायचे. आमच्या स्वतःच्या घरची परिस्थिती खूप खराब असल्याने दर दिवाळीला मामांकडून आम्हाला कपड्यांची आशा असायची. त्यात मामी सुद्धा खूप प्रेमळ होत्या. आणि माझ्या आईची आई तर आम्हावर खूपच जीव टाकायची. आजी खूप म्हातारी झालेली होती. तिच्या डोक्यावर एकही काळा केस उरलेला नव्हता. दातही मोजकेच उरले होते. पण आजी रंगाने खूपच गोरीपान होती. मामाचे घर तीन खोल्यांचे. आधी स्वयंपाक घर , त्यानंतर एक खोली आणि पुढे हॉल म्हणजे त्यात दुकानही होते. मामा शृंगारच्या वस्तू, नवरीच्या साज, फेटे वगैरे वस्तू विकणे, भाड्याने देणे असा व्यवसाय पण साईड बिजनेस म्हणून करायचे तसे ते हायस्कूलमध्ये शिक्षक होते. तर असेच भर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर माझी मामी, आई, मोठी बहीण हे सर्वजण हॉलमध्ये बसलेले होते. आणि माझी आजी आणि मी मधल्या खोलीत बसलो होतो. माझ्या आजीने मला तिच्या डोक्या मधल्या उवा काढायला सांगितले. मी माझ्या आजीच्या डोक्यातल्या उवा काढण्यात मग्न होती. मी आजीला म्हणाली ,"आजी मला एखादी गोष्ट तर सांग ना." आजी म्हणाली ,"ठीक आहे, ऐक तर मग." आजी मला भुताची गोष्ट सांगू लागली. आजी मला म्हणाली ,"तू घाबरत तर नाहीस ना?" पण खरोखर तर मी लहानपणी खूपच घाबरी होती. मी आजीला सांगितले की ,"नाही ,मी नाही घाबरत तू सांग. मग आजीने मला भुताची गोष्ट सांगितली. गोष्ट पूर्ण झाल्यानंतर आजीने मला विचारले की ,"तुला अजूनही भीती वाटली नाही ना". मी आजीला सांगितले ,"नाही मला तर बिलकुल भिती वाटली नाही." आता आजी म्हणाली ,"चल आता, तू पण एक गोष्ट मला सांग." मला तर गोष्ट येतच नव्हती. मी आजीला म्हणाली." आजी मला गोष्ट येत नाही

 मला जोक सांगता येते सांगू का?" आजी म्हणाले," ठीक आहे सांग." मी कोणती जोक सांगितली ते तर मला आठवत नाही. पण माझी जोक ऐकल्या नंतर आजीला खूपच हसू आले. आजी जोरजोराने हसू लागली. मला पण हसू आले. पण आजीला तर आणखीनच जोरात हसू येत होते. आता आजीला पाहून माझ्या चेहरा उतरला. कारण पांढरे केस मोकळे होते. मोजकेच दात दिसत होते. आणि आजी अट्टहास करत होती. ती एखाद्या भुतापेक्षा कमी दिसत नव्हती. मी तिच्या भुताचा गोष्टीने घाबरली नाही ,पण माझी जोक्स नंतर आजीच्या हसण्याने खूपच घाबरले. त्यात मधल्या रूममध्ये फक्त मी आणि आजीच होती.मी तिथेच रडायला लागले. मला रडताना बघून आजीला आणखी हसू आले .तिने मला जवळ बोलवण्याचा प्रयत्न केला. पण मी जोरजोराने रडत तेथून पळाली . पुढच्या हॉलमध्ये माझी आई शिवणकामाच्या मशीनवर बसलेली होती आणि कपडे शिवत होती. मी एवढी घाबरली होती की पळत पळत मशीनवर चढून गेली आणि तिथून जोरातच खाली पडली. मला पाहून सर्वजण घाबरले .माझ्या आईने मला जवळ घेतले आणि माझे कान फुकायला लागले. आणि विचारपूस करायला लागले. तेवढ्यात आजी हसता हसता पुढे आली. माझी आई आणि आजी यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. माझ्या आईला वाटले की तू तिला भुताची गोष्ट सांगितली म्हणूनच ती घाबरली. पण जेव्हा खरी हकीगत तिला कळाली तेव्हा मामी, आई ,बहीण ,आजी सर्वच पोट धरून हसू लागले आणि मी एकटीच रागाने रडत होती.

     पण आता हे असे बालपण हरवलेले आहे. आजच्या मुलांना दप्तराच्या भार आणि शिक्षणाच्या सुद्धा भार आहे. कोमल खांद्यांवर जवाबदारीचे ओझे आहे. त्यात संपूर्ण घराची जबाबदारी एका कोवळ्या मनावर येते आणि तो बाळ मजुरीचा भोग बनतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract