Saraswat sai

Tragedy Others

3.4  

Saraswat sai

Tragedy Others

स्त्री शक्ती.. अस्तित्व तिचे

स्त्री शक्ती.. अस्तित्व तिचे

17 mins
429


 पंखा चालू करा ना.. किती गरम होत आहे. लाईट गेली की काय" अर्ध झोपेत डोळे न उघडता मीठाबाई बोलत होती. दोनदा बोलली तरी कुणी पंखा चालू करत नव्हतं. शेवटी मीठाबाईच उठली. पाहते तर काय? ती एका अंधा-या खोलीत होती. ते तिचे घर नव्हतेच. तिला काही समजलच नाही. अचानक तिचं डोकं खुप दुखायला लागलं. आत्ताच डोक्याची नस फाटेल की काय असं झालं तिने जवळच पडलेल्या उशीत डोके खुपसले आणि तिचे भान हरवले.

       जवळ जवळ अजून दोन तास गेले . मिठा पुन्हा भानावर आली. अचानक दोन तासापूर्वी जो अनुभव तिने केला होता ते तिला आठवलं. तिला वाटलं बहुतेक हे स्वप्न असावे. खाडकन तिने डोळे उघडले आणि उठून बसली. पण आता ही ती त्याच अनोळखी खोलीत होती तिच्या घसा कोरडा पडला. अंगावर शहारे निर्माण झाले. आवाज बाहेर ऐकू येईल एवढी हृदयाची धडधड वाढली. श्वास घेण्यासाठी जणू ऑक्सिजन पुरत नव्हता असे झाले. एक जुन्या पलंगाशिवाय त्या खोलीत काहीच दिसत नव्हते. दरवाजा घट्ट बंद होता. तिने उठून जोरात दरवाजा ठोकला. पण बाहेर कुणीच नव्हते. "मी इथे कशी? ही जागा कुठली?, कुठे आहे मी?..." रडत रडत मीठाबाई ओरडू लागली.

         जड झालेल्या डोक्याला हातात घेऊन आठवण करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला काहीच आठवत नव्हते .तिच्या ओरडण्याचा आवाज भिंतींच्या बाहेर जातच नव्हता. खूप रडून झाल्या नंतर जवळच असलेल्या बाथरूम मध्ये जाऊन पाहिले. तर तिला एक खिडकी दिसली. ती पण बाहेरून बंद होती तिने तिला उघडण्याच्या खूप प्रयत्न केला. पण काही यश येत नव्हते. खिडकीच्या दोन्ही बंद दरवाजाच्या मध्यभागी असलेल्या फटीतून किंचितसे उजळ येत होते. त्यावरून दिवसाची वेळ आहे, रात्र नाही हे तिला कळले. खिडकी उंच असल्याने तिला बाहेर पाहता येत नव्हते .काय करावे समजत नव्हते. अचानक तिचे लक्ष जवळच असलेल्या बादली जवळ गेले. तिने लगेच ती बादली उचलुन उलटी ठेवली आणि त्यावर चढून खिडकीच्या बाहेर फटीतून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. थोड्या दूर अंतरावर दोन अनोळखी इसम लांब असलेल्या गेटजवळ उभे असलेले तिला दिसले. ती त्यांचे बारीक निरीक्षण करू लागली. वारंवार त्यांच्या शारीरिक आकृतीकडे पाहून कोणीतरी ओळखीचे निघतात की काय त्यासाठी बुद्धीला ताण देऊ लागली. पण तिची बुद्धी कोणताच प्रतिसाद देत नव्हती. जवळ जवळ पाऊण तास खिडकीजवळ उभी राहून आठवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिला ते इसम जवळ येताना दिसले. पाठमोरी आकृती अचानक मागे फिरली आणि तिला त्यांचे चेहरे दिसले.

         मेंदूत काहीतरी हालचाल झाली. मेंदूच्या नसात जोरात रक्त प्रवाहाचा संचार व्हावा तसा डोक्यातही प्रकाश पडला आणि त्या प्रखर प्रकाशात ते दोन चेहरे तिला आठवले. ते ओळखीचे तर नव्हतेच परंतु कुठेतरी पाहिलेले होते.ते चेहरे खूप जवळचे नव्हते. ते तर नेपाळी चेहरे दिसत होते. ती त्यांना ओळखत तर नव्हती ,पण कुठेतरी पाहिले होते त्यांना. तिला आठवले की आठ दिवसांपूर्वी आई सोबत बाजारात गेली होती तेव्हा बाजारात हे दोन्ही व्यक्ती आईशी बोलत होते.मी तेव्हा कटलरीच्या लॉरी जवळ उभी राहून नेलपॉलिश घेत होती. पण त्यावेळी आईला त्यांच्याशी काहीतरी पुटपुटताना पाहिले होते. त्या आधी पण आपल्या घराच्या समोर असलेल्या निंबाच्या झाडाखाली मी त्यांना आधी पाहिलेलं होतं." हो तेच लोक आहेत हे."

               मिठाबाई ..... सावत्र आईच्या हाताखालून वाढत आलेलं हे लेकरू. मिठाबाई सहा वर्षाची असताना आई आजारपणाने वारली. वडील भजनी मंडळ चालवत असत. गावोगावी भजन करण्यास हिंडत असत. परंतु पत्नीच्या निधनानंतर आता मिठाबाईची संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यामुळे भजनी मंडळात त्यांना जाता येत नव्हतं. तिथे सर्वांना त्यांची कमतरता भासू लागली. भजन करत गावोगाव हिंडणे हा त्यांच्या आवडीचा विषय होता. म्हणून त्याकडे त्याची सारखी ओढ असायची त्यामुळे कधीकधी शेजार्‍यांकडे मिठाबाईला सोपवून ते निघून जायचे. कधी कधी त्यांना मिठाबाईवर यामुळे रागही यायचा.

          शेवटी काही मित्रांनी त्यांना दुसरे लग्न करण्याची सल्ला दिली आणि दोन मुलांची आई सुनीता जी नुकतीच एक वर्षा पुर्वी विधवा झालेली होती. तिच्याशी त्यांनी लग्न केले आणि मीठाबाईच्या संगोपनाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पुन्हा ते आपल्या कामाला लागले. त्यातून कमाई तर खूप कमी होती. आता परिवारही वाढला होता. आर्थिक परिस्थिती कटकटीची होती. सुनिता शेतात मजुरीवर कामाला लागली. जे काही पैसे तिला मिळत होते त्यामध्ये ती फक्त तिच्या दोन्ही मुलांवर जास्त लक्ष देत होती. मीठाबाई शेवटी सावत्र असल्याने सुनिता लहानशा मीठा बाईला घरची सर्व कामे करवत असत. गावाच्या सरकारी शाळेत ती शिकत होती . आता ती मोठी झाली होती. सातवीला आली होती. घरच्या सर्वच कामाची जबाबदारी तिच्यावर होती. तरीही सुनिता तिच्या कामाबद्दल सतत चुका काढायची, तिला फटकळपणे बोलायची, तिच्या पोटाला चिमटा काढायची, केस ओढून मारायची.

           सातवीनंतर मिठाबाई पुढे शाळा शिकू शकली नाही. आता ती यौवनात आली होती. ती खूपच सुंदर म्हणता येईल अशी नव्हती. परंतु सावळा रंग असून सुद्धा नाकी-डोळी छानच होती. मध्यम उंची, सडपातळ शरीर. आई शेतात असायची तेव्हा तिची एखादी साडी नेसून पाहायची. तेव्हा तर ती खूपच शोभून दिसायची. वडिलांचे तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्षच होते. पण कधीकधी गावाहून घरी आले की मिठाबाईशी खूप प्रेमाने बोलायचे. तिच्या आवडीचे पदार्थ खायला घेऊन यायचे. त्यामुळे प्रेमाच्या दोन शब्दांसाठी तहानलेल्या मीठाबाईला वडिलांच्या येण्याची ओढ लागलेली असायची. कधी कधी दरवाज्यात बसून त्यांच्या मार्गाकडे सतत तिची नजर एकटक लागून असायची.

         दोन्ही भावांचे सुद्धा पाहिजे तसे प्रेम मिळवू शकली नव्हती. आईच्या स्वभावानुसार भावांचा स्वभाव पण तसाच ढळलेला होता. यौवनात आलेल्या मिठाबाईच्या लग्नाची चिंता आता सुनीताला लागली होती. परंतु तिच्यासाठी एकही रुपया खर्च करण्याची इच्छा सुनीताला मुळीच नव्हती. तिची घरात सारखी चिडचिड चालत असे .आई असून सुद्धा मीठाबाईला आईचे प्रेम मिळाले नव्हते.

              पण आठ दहा दिवसापासून घरात विचित्र घडत होते. आईचा वर्तनात पडलेला फरक तिला स्पष्टपणे जाणवत होता .आई आणि दोन भाऊ तिच्यावर खूप प्रेम व्यक्त करत होते. आई तीला कामात मदत करायला लागली होती. सकाळ संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचे ते आईने मिठाबाई वर सोडून दिले होते. मिठाबाईच्या कामाबद्दल तिची सारखी प्रशंशा होत होती. सकाळी उशिरा उठल्यामुळे घाबरलेल्या मिठाबाईला कोणीच काही बोलले नव्हते. आज तर आई खुपच आनंदात होती. आज आई मिठाबाईला घेऊन बाजारात आली होती. दोन तीन भाज्या घेतल्यानंतर एका कटलरीच्या लॉरी जवळ ती मिठाबाईला घेऊन आली आणि "तुला आवडेल ते घे मी जरा तिकडे जाऊन येते"असे सांगून गेली होती.

         मिठाबाईला तर धरती आकाश एक झाल्यासारखे झाले होते, ज्या प्रेमासाठी एवढ्या वर्षापासून ती वाट पाहत होती, तो अनुभव तिला या आठ-दहा दिवसांपासून येत होता.तिच्या आनंद गगनात मावत नव्हता.म्हणून या बदलावाचे कारण जाणण्याच्या प्रयत्नही तिने केला नव्हता.

            रात्री सर्वजण जेवणाला बसले. आईने आज स्वतःच्या हाताने जेवण वाढण्याची जिद्द केली होती. मिठाबाईला पण तिने स्वतःच्या हाताने जेवण वाढले होते आणि तेही सर्वांसोबत. मिठाबाईला गहिवरल्या सारखं झालं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते आज तिने पुष्कळ दिवसानंतर पोटभर जेवण केलं होतं. खीर जरी स्वतः बनवली होती तरी आईने वाढल्यामुळे ती अधिक चविष्ट लागत होती. आईने खूप प्रेमाने जबरदस्ती करून तिला दोनदा दिली होती.म्हणून ती नकार देऊ शकली नव्हती. तिला हे सर्व आठवलं होतं. परंतु त्यानंतरच्या एकही क्षण तिला आठवत नव्हता. ती वारंवार आठवण्याचा सारखा प्रयत्न करत होती. विचारात मग्न झालेली ती दरवाजा उघडण्याच्या खाडकन आवाजाने दचकली. दरवाजातून येणाऱ्या प्रकाशासोबत त्याच दोन आकृत्या आत शिरल्या . त्यांना पाहताच ती भिंतीला टेकुन घाबरुन कोपऱ्यात जाऊन उभी राहिली.

        "कोण आहेत तुम्ही? मी इथे कशी आली? सांगा... मी कुठे आहे? का आणलं मला इथे ? बोला.... बोला ना लवकर"सारखे प्रश्न विचारून ती रडायला लागली. त्या दोन्ही व्यक्तींनी तिच्यासाठी खाण्याचे पदार्थ आणि कपडे आणले होते. तिच्या जवळ असलेल्या पलंगावर ठेवून ते तिला म्हणाले,"पहले कुछ खा ले और ये कपडे पहन कर अच्छे से तयार हो जा"

        " नाही ....मी नाही होणार तयार आणि काही खाणारही नाही. आधी सांगा.. मी इथे कशी आली? का आणलं मला? हे कुठलं गाव आहे?"

              तेव्हा त्यातला एका व्यक्तीने सांगितलं की तुला तुझ्या घरच्यांकडून आम्ही पन्नास हजाराला विकत घेतले आहे आणि येथून तू पळून जाऊच शकत नाही. कारण हा तुझ्या देश नाही हा नेपाळ देश आहे . हे ऐकून मिठाबाईच्या पायाखालची जमीन सरकली. हृदयाचे तुकडे तुकडे होऊन जमिनीवर स्वैरवैर बाहेर पडतील एवढा मोठा आघात तिच्या जीवाला लागला आणि भारतातून नेपाळ मध्ये अपहरण करून आणलं तरी ती भानावर नव्हती हा आश्चर्याचा धक्का तिला सहन होत नव्हता.. तिचं सर्वस्व संपलं आहे हा आभास तिला कळून चुकला होता. हात पाय गारठले होते. पुन्हा एकदा डोकं जड होऊन ती बेशुद्ध झाली होती.

 आता मिठाबाईचं अस्तित्वच उरलं नव्हतं. तिचं फक्त मन तिचं होत. तिचा देह तिचा राहिला नव्हता. पुष्कळ दिवस ती नकार देत राहिली. खुप खुप रडली.अन्नाचा त्याग केला. पण तरीही काही उपयोग झाला नाही. तिथल्या काही स्त्रिया तिला समजावत होत्या.

               अश्या रीतीने थोड्या दिवसाच्या नकारानंतर तिने त्याचा स्वीकार केला. तिला करावाच लागला. कारण तिथून निघण्याचा काही मार्ग उरलाच नव्हता हे तिला कळलं होत.

                  आता रोज रोज वेगवेगळ्या पुरुषासाठी ती तयार होत होती. निरनिराळे कपडे, मेकअप याद्वारे मिठाबाईला तयार करण्यात येत होते. रात्री वासनारुपी स्वार्थी प्रेमाने पाहणारा प्रत्येक पुरुष तिच्या शरीरावर ताबा मिळवित होता आणि सकाळी मात्र तुच्छ नजरेने पाहून तेथुन स्वतःची वाट धरत होता. कोणी नवीन पुरुष आत आला की त्याला आपल्यावर झालेला अन्याय सांगुन सुटकेचा मार्ग विचारावा असे नेहमी तिला वाटत होते. पण आपले मन मनसोक्त रित्या मांडता येईल अशी एकही पुरुषाची लायकी दिसत नव्हती. म्हणुन दुःखाचा घोट ती मनात गिळत होती.

                     पण आपल्याच परिवाराने केलेल्या विश्वासघात ती अजुन विसरली नव्हती. तर या पर पुरुषांवर काय विश्वास करावा ते तिला समजलं होत.मनात सुड भावनेचा जन्म झाला होता. हृदयाची आग मस्तकात धगधगत होती. तिचे दुःख कोणालाही सांगता येत नव्हते. कारण हे दुर्दैव तिच्या एकटीचे नव्हते. तिथे तिच्या सारख्या अजून काही स्त्रिया होत्या. प्रत्येकाच्या जीवनाचे प्रसंग निराळे होते. सर्वच दुर्दैवी होत्या. मग आपलीच कथा मांडण्यात काय अर्थ होता?

               असे करत करत सहा वर्ष लोटले. या सहा वर्षात तिने एका बाळाला ही जन्म दिला होता. तो कोणाचा होता हेही तीला माहित नव्हतं. पण त्याचं अस्तित्व ही तिच्यासाठी शून्य होतं. बाळ होताच इथल्या एजंटने त्याच्या वर कब्जा केला होता. आता तर तिचे मातृत्व ही काही कामाचे नव्हते. तिच्या मनाचा उद्वेग अश्रू रूपाने वाहून गेला होता. ते बाळ तिला पुन्हा पाहायला मिळालं नव्हतं. कोण जाणे कुठे होते ते. एकदा पुन्हा या अस्तित्वाचा स्वीकार तिने करून घेतलेला होता.

                त्या ठिकाणी नवीन स्त्रिया आणल्या जात होत्या. देहव्यापार सुरूच होता. पण मिठाबाई तिचा प्रसंग अजूनही विसरली नव्हती. जणू कालच तो प्रसंग घडला आहे अशा रीतीने तिने त्या जखमा अंतर्मनात जिवंत आणि ताज्या ठेवल्या होत्या. वाट पहात होती ती फक्त संधीची. तिला वाटत होतं की परमेश्वर तिला ती संधी नक्कीच देईल हा आत्मविश्वास मनात कायमच होता. आणि आज खरच तो दिवस उजाडला होता.

                 आज तिच्या मनात भावनांनी काहीसे सुनामीचे रूप घेतले होते.आज काय माहीत का? पण मनाशी एक निर्णय घेतला होता . तिथल्या काही स्त्रिया एजंटच्या विश्वास पात्र झाल्या होत्या. मिठाबाईनेही तो विश्वास मिळविला होता. पण तिच्या मनातलं तीच जाणत होती. काही स्त्रियांना देहव्यापार साठी बाहेरसुद्धा पाठवलं जात होतं. आज मीठाबाईला सुद्धा बाहेर पाठवण्यात येणार होतं. दोन स्त्रियांसोबत गेट बाहेर जाण्याची संधी तिला मिळालेली होती. आणि हीच ती संधी होती जीची ती सहा वर्षापासून वाट पहात होती. जी तिला पुन्हा मिळेल की नाही त्यात प्रश्नचिन्ह होता. मनात एक पक्की गाठ बांधून ती बाहेर निघाली. सहा वर्षात तिने पहिल्यांदाच गेटच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. बाहेरची दुनिया खूप दिवसाने तिने पाहिली होती. हात पसरवून, मुक्तपणे श्वास घेऊन ती हळुवारपणे चालू लागली. त्यांच्या मागे दोन नेपाळी एजंट चालतच होते. त्या तिघींना कोणाच्या घरी जायचे आहे ते आधी पासून निश्चित करण्यात आले होते.

            सर्वात आधी एकीला पोहोचविल्या नंतर दुसरे मिठा बाईला पोहोचवायचे होते. थोड्याच वेळात ते घर आले. त्या घराच्या भेट जवळ सोडून एजंट तिथे उभा राहिला. आतून एक व्यक्ती बाहेर आला. त्याने मिठा बाईला आत बोलावलं. मीठाबाई आत गेली. तो व्यक्ती तिच्याशी खूपच प्रेमाने बोलत होता. पण तिला या स्वार्थी प्रेमाची सवय पडून गेलेली होती. म्हणून कोणताही विश्वास ती करत नव्हती. पण तिने ज्याची कल्पना केली होती त्यातलं खरंच काही घडलं नव्हतं. तो व्यक्ती एक पत्रकार होता आणि कधी पासून या एजंटच्या शोधात होता.

                त्या पत्रकाराने मीठाबाईला विश्वासात घेऊन तिच्या विषयी सर्व माहिती तिला विचारली. तिच्या बोलण्यावरून ती या देशाची नाही हे त्याला समजलं. पत्रकाराने विश्वासाने जेव्हा मीठाबाईला तिच्या जीवनाबद्दल सारं काही विचारलं. त्या दिवशी मिठाबाईला आकाश-पाताळ एक झाल्यासारखं वाटलं. ती आज मनसोक्त रडली. आणि सर्व कहाणी तिने पत्रकारांला सांगितली. पत्रकार आता सर्व काही समजला होता. त्याने मीठाबाईने जे काही सांगितले त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा केले होते. पत्रकाराने तिला आश्वासन दिले की" मी तुला तुझ्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था करून देईल. घाबरू नकोस आणि काळजीही करू नकोस."

               आज मिठाबाईने इथून पळून जाण्याच्या मनाशी जो निर्णय केला होता. तोच निर्णय खरं तर परमेश्वराने तिच्यासाठी घेतलेला होता. स्वतःच्या देशात परत जाण्याच्या विचारानेच तीचे आनंदाश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. पत्रकाराने तिला धीर दिला आणि मागच्या दाराने तिला घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी तिला सर्व विचारपूस केली. तिथली भाषा तिला कळत नव्हती त्यासाठी पत्रकाराने तिला मदत केली होती. त्याने पोलिसांना तिची सर्व हकीकत सांगितली. आता पोलिसांनी सुद्धा तिला संरक्षणाचं वचन देऊन स्वतःच्या ताब्यात घेतलं. तिला भारतात परत पाठवण्याचं वचन दिलं. तिला असे झाले होते की कधी तो दिवस उजाडेल की मी माझ्या भारत देशात पाय ठेवेल. तिला धीर येत नव्हता. चार पाच दिवसा नंतर पोलिसांनी नेपाळहून दिल्लीचं तिकिट तिच्या हातात दिले. काही पैसेही दिले. व विमानात बसवुन दिले. विमान आकाशात उडू लागले. तिने अनुभव केला की ती आता नेपाळ आणि भारताच्या मध्यभागी आहे. भारतात परतल्यावर तिला कोणते कार्य करायचे आहे याचा तिळमात्रही विचार न करता शांत आणि निमुटपणे डोळे मिटून सीटला डोके टेकवून ती निवांत झोपून गेली. तिला खूप दिवसांनी शांत झोप लागलेली होती.

  सकाळी सकाळी मिठाबाईने भारताच्या दिल्लीत पाय ठेवला. तेथील गर्दी ती डोळे भरुन पहात होती. सर्व चेहरे भारतीय वाटले. एकदा तिने स्वतःच्या गालावर मारुन पाहिले. हो, खरच....ती भारतातच ,आपल्या देशात पोहोचली होती. हाश..आता खरी जंग सुरू झाली होती तिच्या जीवनाची. विमानतळावरून दिल्लीच्या रस्त्यावर ती चालू लागली. तिच्या जवळ असलेल्या पैशाने तिने थोडे पोटाला शांत केलं. तोंडावर पाणी शिंपडलं आणि निघाली दिल्लीचा रेल्वे स्टेशनकडे. तिच्याजवळ असलेले पैसे पुरतील एवढे नव्हतेच म्हणून ती रिक्षा न करता रस्त्यावर भटकत भटकत रेल्वे स्टेशन वर पोहोचली. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका गावात तिला दिल्लीहून पोहोचायचे होते. स्टेशनावर आल्यानंतर तिने स्टेशनवर उभे असलेल्या लोकांजवळ गाडीची चौकशी केली. काहीनी तिला वेळ सांगितला, तर काहीनी तिकीट खिडकी जवळ तपास करण्यास सांगितला .त्याप्रमाणे तिने विचारपुस केली. पण तिकीट काढण्यासाठी तिच्याजवळ फारसे पैसे उरले नव्हते. ती स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांजवळ पैशांची याचना करू लागली. कित्येकांनी तिला धुत्कारले. तर कित्येकांनी तिला पाच दहा रुपयाचीच मदत केली. असे जवळजवळ दोन तास भिक मागितल्यानंतर ती तिकिटाचे पैसे जमवु शकली आणि तिने तिकीट काढले व गाडीत जाऊन बसली. गाडी सुरु झाली. बस आता थोड्याच कालावधी बाकी होता. कार्य पूर्ण करायला. दुसऱ्या दिवशी ती जळगावला पोहोचली.

               किती वर्षांनी ती जळगाव स्टेशन पहात होती. खूप काही बदललं होतं अवघ्या सहा वर्षात. जळगावहुन पुन्हा स्वतःच्या गावाला जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षा चालत होती ,तसा तिच्या हृदयात आगीचा वनवा पेटला होता. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार ती आठवत होती. आठवण्याची तर गरजच नव्हती, तो प्रसंग तर मनात घर करून बसला होता ,आता रिक्षा गावात शिरली. रिक्षावाला तिला नगर गल्ली विचारू लागला. नगर तर ती विसरली होती, पण रस्ता तिला ठाऊक होता. तिच्या सांगितल्याप्रमाणे रिक्षा पुढे पुढे जात होती.एका ठिकाणी येऊन तिने रिक्षा थांबविली आणि रिक्षेच्या बाहेर उतरली. रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देऊन तिने रवाना केले. घराचा दरवाजा बंद होता. आजुबाजूला तीन कच्ची घरे आता पक्क्या भिंतींची झाली होती. समोरचे निंबाचे झाड अजूनही तसेच होते .हळूहळू ती पुढे सरसावली आणि त्या घराचा दरवाजावर तिने जोरात धडक दिली. तिच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. आता पुढे जे होणार ते तिलाही ठाऊक नव्हतं. आतून कोणीतरी ओरडलं ,"कोण आहे? एवढ्या जोरात दरवाजा ठोकायला". आणि एक स्त्री बाहेर आली. ती स्त्री आणि मिठाबाई एकमेकींकडे अनोळखी नजरेने पाहू लागले. मीठाबाईने विचारले," इथे सुनीताबाई आणि त्यांची मुले राहत होत्या ते कुठे आहेत?" ती स्त्री म्हणाली," मला नाही माहित. आम्हाला येथे येऊन चार पाच वर्षे झाली .हे घर आम्ही विकत घेतलय. तुम्ही दुसरं कोणाला जाऊन विचारा" मिठाबाई विचारात गुंतली. इतक्यात समोरच्या भीमाकाकू केव्हापासून मिठाबाईकडे प्रश्नार्थ नजरेने पाहत असलेल्या तिला दिसल्या. मिठाबाई लगेच त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली." अहो, भीमाकाकू ,ओळखलं नाही का मला?" "मिठा का ग तू? बाई ग किती बदललीस.ज कुठे होती इतके दिवस? आणि काय ग असं कुणाबरोबर पळून जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही" मिठाबाई फक्त ऐकत होती भीमा काकू म्हणाल्या," का ग एकटी आलीस. तुझा नवरा नाही आला का सोबत?"

               मिठाबाई काहीच बोलत नव्हती. भीमा काकूंनी तिला आत बोलावून विचारपूस केली. पण मीठाबाईने तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला नाही.तिने तिच्या आई-वडील आणि भावाबद्दल विचारपूस केली. तेव्हा भीमाकाकू ने सांगितलं की ,"तू येथून गेल्या नंतर गावात खूप चर्चा सुरू झाली आणि तू कोण्या नेपाळी मुलासोबत पळून गेल्याची बातमी तुझ्या आई कडून कळाली. वडिलांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांनी रागात तुझा शोध घेण्यास नकार दिला आणि अशी मुलगी परमेश्वराने मला दिली नसती तर बरे झाले असते. असे म्हणाले. चार-सहा महिने कोणी तुझा तपासही केला नाही आणि मग हे घर तुझ्या भावाने विकून टाकले. आता सुरतला राहायला ते सर्व गेले आहेत."


आता मीठाबाईला धीर निघत नव्हता. तिने भीमा काकूंना सुरत मध्ये आई वडिलांचा पत्ता विचारला. भीमा काकुनी पत्ता सांगितला. त्याप्रमाणे मागच्या पावलांनी मीठाबाई पुन्हा जळगाव स्टेशनवर आली आणि तिथे बसून सुरतच्या गाडीची वाट पाहू लागली. स्टेशनावर चौकशी करता तिला माहित पडले की गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आहे. म्हणून तिने स्टेशनवरच रात्र काढली. आता तिला तिच्या अस्तित्वाची कोणतीच भीती राहिली नव्हती. तिच्यासोबत जे व्हायचे ते आधीच होऊन गेले होते. आता तिचे कोणतेच अस्तित्व उरले नव्हते. मग भीती कशाची?दुसऱ्या दिवशी ती सुरत गाडीत बसली व संध्याकाळी साडे सातला सुरतच्या स्टेशनवर उतरली. तेथून निघून भीमा काकूंनी दिलेल्‍या पत्ता घेऊन ती रिक्षावाल्याला विचारू लागली. रिक्षावाल्याने तिला उधना मध्ये सोडले.

                उधन्यात आल्यानंतर तिने दिलेल्या पत्त्यावर जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ती त्या गल्लीत शिरली. आणि तेथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तिने पत्ता विचारला त्या पत्त्यावर तिच्या वडिलांचे नाव होते. तिच्या वडिलांना तो व्यक्ती ओळखत होता. तो तिला म्हणाला की ,"दोन गल्ल्या सोडून पुढे एक मारुतीचे मंदिर आहे त्या मंदिराच्या ओट्यावर आज थोड्याच वेळात म्हणजे साडे आठ वाजेला यांचे किर्तन आहे. ते तुला तिथेच भेटतील. तुझे भाऊ कामाला गेले असतील आणि आई सुद्धा जरीच्या कारखान्यात कामाला जाते." मिठाबाई पुढे गेली. मारुतीच्या मंदिरात लोकांची खूपच गर्दी जमली होती.तिचे वडील प्रख्यात कीर्तनकार म्हणून नावाजले होते.लोकांच्या घोळक्यात मिठाबाई सुद्धा जाऊन बसली. थोड्याच वेळात तिथे तिचे वडील आणि त्यांच्यासोबत काही भजन मंडळी आली .यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. माइक, स्पीकर, संगीताची साधने सर्व तयार होते. मिठाबाई तिच्या वडिलांकडे एक टक पहात होती. किर्तन सुरू झाले. वडिलांच्या किर्तनाला सुरुवात झाली. वडील लोकांना चांगले उपदेश देत होते. परंतु मिठाबाईच्या मनात आग पेटत होती. वडिलांचे उपदेश ऐकता ऐकता तिचा राग मस्तकात गेला. आणि तिने आजूबाजूला पडलेले काही दगड गोळा केले. व एवढ्या गर्दीत मध्यभागी उभी राहिली. आणि एक एक दगड ती भजनी मंडळ कडे मारून फेकु लागली. तसेच तिने शिव्यांच्या मारा सुरू केला. सर्व लोक आश्चर्याने पाहू लागले. कीर्तन करणारे मंडळ इकडे तिकडे धाऊ लागले. एका क्षणाला तर त्यांना कळलेच नाही की काय होत आहे. तिने दगडांचा मारा सुरु ठेवला आणि सोबत शिव्याही सुरूच होत्या.

              लगेच तिथले काही लोकांनी तिला पकडल. आणि घट्ट धरून ठेवलं. परंतु मीठा बाई कोणाकडूनही आवरली जात नव्हती. काही लोक तिला मानसिक रोगी समजू लागले. त्यातल्या एकाने पोलिसांना फोन केला. लगेच पोलिसांची गाडी आली आणि तिचे हात बांधले. तसेच या बद्दल चे कारण विचारू लागले. मीठा बाईच्या वडिलांनी तिचा आवाज ओळखला. तसेच मंदिरातून धावतच ते तिच्या दिशेने पळत आले. तिला त्यांनी ओळखलं.

               मिठाबाईला वडिलांनी असे करण्याचे कारण विचारले. मिठाबाईने वडील असून सुद्धा स्वतःच्या मुली बद्दल चौकशी न केल्याबद्दल रागात हे सर्व केले म्हणून सांगितलं. मिठाबाईला तिच्या वडिलांनी तिच्या कडे कायमच दुर्लक्ष केलं होतं त्याविषयीचां पण राग होताच. म्हणून तिचे मन तिच्या आई आणि भावाबरोबर वडिलांनाही माफ करण्याची परवानगी देत नव्हतं. तिच्या वडिलांनी तिची विचारपूस केली. तेव्हा त्यांना तिच्याकडून तिच्या सोबत झालेला सर्व प्रकार कळला आणि सुनिता तसेच दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून एवढे मोठे सत्य लपवले होते त्याबद्दल समजलं. तसेच त्यांनी केलेल्या कारस्थान विषयी माहिती झाले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. वडिलांनी मिठाबाईची क्षमा मागितली आणि मीठाबाई आणि तिचे वडील दोन्ही एकमेकांसाठी ढायी ढायी रडले.

              आता मीठाबाई एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचे वडील सुद्धा होते. त्यांनी ठरवलं की सुनिता आणि तिच्या मुलांना त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा व्हायलाच पाहिजे. तिथे उभे असलेल्या पोलिसांना सुद्धा सर्व प्रकार कळला. त्यांनी आई आणि भावाबद्दल पोलिसात तक्रार नोंदविण्याची सलाह दिली. मीठा बाई आणि तिच्या वडिलांनी एक क्षणाचाही विलंब न करता तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविताच पोलीस सुनिताच्या घराच्या दिशेने निघाले. तिकडे नुकतेच कामावरून आलेले तिचे भाऊ ,वहिन्या आणि आई गप्पा मारत बसले होते. दारात पोलिसांची गाडी येताच त्यांना काही उमजलं नाही. परंतु गाडीतून पोलिसांसोबत मिठाबाईला उतरतांना पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मिठाबाई परत येईल याची त्यांना कल्पनाच नव्हती.आता इकडे तिकडे धावण्यात काहीच उपयोग नव्हता. पोलिसांनी कडक आवाजात सुनीता आणि तिच्या भावाची याबद्दल चौकशी केली. सुनिता आणि दोन्ही भाऊ खूपच घाबरले होते. त्यांना त्यांच्या कर्तुत्वाचा पश्चाताप होत होता. ते तिघे जण मिठाबाईच्या पायात कडून माफी मागू लागले. परंतु मीठा बाईने त्यांना क्षमा करण्याचे तब्बल नाकारले. अशा रीतीने सुनिता आणि दोन्ही भावांची धरपकड करण्यात आली.

                  तिच्या दोन्ही वहिन्या आणि भाचा घरात रडत होते. परंतु मिठाबाईला आता कोणाचीच दया येत नव्हती. गल्लीत याविषयी चर्चा व्हायला लागली. सर्व शेजारी-पाजारी त्यांना सज्जन समजत होते परंतु त्यांचे कारस्थान ऐकून सर्व त्यांना तुच्छतेने पाहू लागले. पोलीस केस झाला. कार्यवाही किती दिवस चालली. शेवटी तिघांना दहा वर्षाची कारावासाची सजा फटकारण्यात आली. त्यांनी केलेल्या कृत्याचे त्यांना फळ मिळाले होते. दोन्ही वहिनी यांना त्यांचे माहेरचे लोक येऊन घेऊन गेले.

                     आज मिठाबाई खूप आनंदात होती. काही दिवस मीठा बाई तिच्या वडिलांसोबत राहीली. परंतु तिने त्या घरात राहायचे नाकारले. सुरत मध्येच तिने कंपनीत काम शोधले. आणि ती कामाला लागली. सुरत मध्ये पुष्कळ लोक कामाच्या शोधात येत असतात. कारण सुरत मध्ये कापड कारखाने, हिरा उद्योग आहे. मिठाबाईला पण लगेच काम मिळाले. पुष्कळ वर्ष तिने काम केले. लग्न तर तिला करायचे नव्हते. वडिलांच्या निधनांपर्यंत तीने त्यांना सांभाळले. आता मिठाबाई एकटीच होती.ती आता गरीब राहिली नव्हती. तिच्या जवळ घर-दार ,जमीनी सर्व होत. पण एकांत तिला आवडत नव्हता.

         तिने मनाशी एक निर्णय केला. स्टेशनावर किंवा इतर ठिकाणी भटकणाऱ्या गरीब असहाय लोकांना तीने गोळा केले. त्यांना आपले समजुन त्यांची ती सेवा करू लागली.ते मिठाबाईचा खुप सन्मान करू लागले. त्यांनी मनापासून तिचे आभार मानले. त्यांना मिठाबाई मुळे चांगले जीवन मिळाले होते. आता ती एकटी नव्हती. तिचं कुटुंब मोठं झालं होत.

              भावांची सजा आता पुर्ण झाली होती. सजा पुर्ण झाली तरी मिठाबाईला त्यांच्या बद्दल द्वेष होता. ती काहीच विसरू शकत नव्हती. परंतु भाऊ आणि आई तिला भेटायला आले. त्यांनी पुन्हा तिच्या जवळ पश्चात्ताप व्यक्त केला. मिठाबाईचा राग थोडा शांत झाला. खरंतर भावांचे कपटी मन तिच्या प्रॉपर्टी वर होते. आता त्यांचे संबंध थोडे बरे झाले होते.

              एकदा त्यांनी मिठाबाईला परिवारासोबत फिरायला जाण्यास सांगितले. नाही नाही म्हणत मिठाबाई शेवटी तयार झाली. आणि सर्वजण फिरायला निघाले. सर्वांनी खूप मजा केली. परंतु परत येताना रेल्वेतून मिठाबाईला कोणीतरी धक्का दिला.ती रेल्वेतून खाली पडली. पडताना तिचे लक्ष मागे गेले तर ते तिचे भाऊच होते. त्यांना मिठाबाईचा सूड घ्यायचा होता. तीला यमसदनी पोहोचविण्याचा त्यांचा प्लान होता. पण ते म्हणतात ना जी असहाय लोकांची रक्षक झाली होती. म्हणुन तीची रक्षा परमेश्वर करीत होता. त्या अपघातात मिठा बाईचा पाय जखमी झाला होता. पण जीव वाचला होता. तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. काही दिवसांनी ती बरी झाली. पण अजुनही ती एकटी नाही. तिच्या या परिवाराने तिची खुप सेवा केली.

                 आता तिचे घर ते घर नाही .अनाथाश्रम झाले आहे. आज त्या आश्रमात सत्तर ते पंच्यात्तर लोक आहेत. सर्व खुप आनंदात आहेत.

                मी खुप लहान असताना मिठाबाई काठी टेकत टेकत सर्वांकडे यायची. तेव्हा मी तिला पाहिले होते आणि कर्नोपकरणी तिची ही कथा मी ऐकली होती. जी मी आज तुमच्या समोर माझ्या लेखनातून सादर केली आहे.

        

   *मिठाबाईची ही कथा आपण पुर्ण वाचली, त्या बद्दल आपला सर्वांचा खुप खुप आभार.*


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy