आत्मभान
आत्मभान
नेहमीसारखीच नवऱ्याचा सणकून मार खाऊन ती पडली होती, मुटकुळं करून ठणकणाऱ्या अंगाने. सात महिन्याची पोटुशी होती ती. पण नवऱ्याला काय फिकीर. दारूच्या नशेत तो आपला बदडायचा तिला काहीही कारण नसताना. ती बिचारी हुं कि चूं न करता मार खात राहायची. प्रतिकार केला अन त्यानं घराबाहेर काढलं तर... भीती वाटायची तिला. माहेरीही आपल्याला थारा मिळणार नाही याची खात्री होती तिला.
तिला शारीरिक आणि मानसिक दुःखाने रडू फुटले होते. "कसले हे आपले आयुष्य ? जन्मापासून सुख म्हणून नाही." विचार करता करता सारे आयुष्यच तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. माहेरी कमालीची गरीबी नेहमीच. हातातोंडाची गाठ पडायचं मुश्किल. जे काय थोडंफार शिजायचं त्यातही भावांची पोट भरली कि मगच हिच्या पुढ्यात यायचं अन्न. भावांचे साऱ्याच बाबतीत जास्त लाड व्हायचे. सहा भावंडात ही दुसरी. घरी आईच्या मदतीला कोणी हवं म्हणून चौथीतच शाळा बंद केलेली. लहान भावंड सांभाळणे आणि घरकाम ह्यात बालपण कधी सरलं कळलंच नाही तिला. ही पंधरा सोळा वर्षाची होताच घरातलं खाणार एक तोंड कमी व्हावं म्हणून वडिलांनी कसलीही चौकशी न करता लग्न लावून दिलं.
नवरा पक्का व्यसनी. दारूचं जबरदस्त व्यसन. पैसे कमवायचा थोडाफार, पण सारे दारुतच उडवायचा. हीच तीनचार घरची धुणी भांडी करून संसार चालवत होती. एवढे कष्ट करून सुख म्हणून नाही. रोजचा मार खाऊन खाऊन कंटाळली होती बिचारी. "कसलं आयुष्य आपलं? सं
पवून टाकावं काय?" तिच्या मनात आलं मात्र... बाळाने पोटातून लाथ मारून आपले अस्तित्व दाखवले. तिला एकदम प्रेमाचा उमाळा आला. "बाळासाठी तरी आपण जगलेच पाहिजे." ती मनाशी म्हणाली.
इकडे नवऱ्याची नशेत बडबड सुरूच होती. "कसली बायको नशिबाला आलीय. हुंड्यात तर काही दिलं नाही हिच्या बापाने. माझ्या जीवावर मजा मारते नुसती. वर आता आणि पोटुशी. एक तोंड वाढणार खाणारे" असे म्हणून परत तिच्या पेकाटात एक लाथ घालत तो म्हणाला "ए सटवे, आता पोटुशी आहेसच तर ऐक मी काय सांगतो ते. माझ्या वंशाला दिवा तरी दे. मुलगाच हवाय मला. मुलगी झाली तर गळा दाबून जीव घेईन मी तिचा."
हे शब्द कानावर पडताच तिचे सारे अंग भीतीने शहारले. "खरंच मुलगी झाली तर ...मारून टाकेल हा बाळाला? का तर ती स्त्री आहे म्हणून?" नुसत्या कल्पनेने तिच्या डोक्यात तिडीक गेली. स्त्री म्हणून भोगलेले आजवरचे सारे आयुष्य आठवले आणि भीतीची जागा संतापाने घेतली. "आता बास झालं." सारा जीव एकवटून उठत ती म्हणाली. त्याच क्षणी बाळाने लाथ मारून जणू 'लढ, मी आहे तुझ्या बाजूने ' अशी जणू ग्वाही दिली.
नवऱ्याकडे कधी मान वर करूनही न पाहणाऱ्या तिने एक खाडकन मुस्काटात मारली त्याच्या आणि कडाडली "खबरदार माझ्या बाळाच्या अंगाला हात लावशील तर... तुझाच जीव घेईन मी."
तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून बाळाने खुश होऊन अजून एक ढुशी दिली आणि ती सारे दुःख विसरून आनंदाने मोहोरली.