आषाढस्य प्रथम दिवसे
आषाढस्य प्रथम दिवसे
जिथे पाऊस बसलाच नाही त्यांनी काय पावसाची मजा लुटावी. कारण कायम आम्ही दुष्काळच अनुभवला आहे. मृगाचे चार थेंब अंगावर पडायचे अजून चिंब भिजावे वाटायचे. पण ढग पुढच्या प्रवासाला निघायचे. आम्ही भरलेले ढग बघितले. चाललेले ढग बघितले. पण बरसलेले ढग फक्त चित्रातच रेखाटले.
म्हणूनच पावसाला पत्र मला लिहावेसे वाटले.
प्रिय पावसा,
तू येणार! नेहमीच येतोस|
कोठे जास्त कोठे कमी प्रमाणात कोसळतोस||
तू पण बेभरवशी झाला आहेस, विश्वासघात तूही अंगी मूरवलायेस.सूर्य आग ओकतो आहे, सागर हिरमुसलेला, नदी नाले आटले धरणीमाय दूभंगली कारण पावसा तू कात टाकली.
शेतकरी राजा विठू माऊली कडे गार्हाणं घेऊन गेलायं,आणि आता सुधारित मानव कृत्रिम पावसाच्या गोष्टी करू लागलाय..
किती हा हट्टीपणा ! अरे कोपतोस पण अन पावतोस पण, तूझे इंगित जरा न्यारच रे, चूक केली आम्ही पण त्याची शिक्षा इतकी कठोर असती कारे?
विनाशकाले विपरीत बुद्धी' तद्वतच अवस्था झाली आहे बघ.तोडतोय वृक्षवेली ऊभारतोय इमले माड्या,
सुधारण्याच्या नावाखाली निसर्ग नामशेष करतो आहोत याचे भानच नाही.कळतय पण वळत नाही.
अशी परिस्थिती झाली आहे बघ आजकाल लोकांना नैसर्गिक पेक्षा अनैसर्गिकच भावतं. म्हणूनच तर तूझे तैलचित्र भरमसाठ किंमतीत विकले जातं ह्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या भूतान पछाडलय..
म्हणूनच हातचे सोडून पळत्याच्या पाठी आम्ही धावतोय. आता एकदाच फक्त एकदाच विनवते तूझ्या येण्याची वाट पाहण्याशिवाय हातात काय उरले आहे?
उतू नकोस मातू, नकोस घेतला वसा टाकू नकोस निसर्गाला बहरू दे, सागर सरितेला ओसंडून दे, धरणी मातेला हिरव्या शालूची भेट दे, सावळ्या मेघाला आसमंत दूमदूमून टाकू दे,वृक्षवेलीला गूज तूझ्याशी करू दे.
आता तूच दे कराने, थोडे बाजूला ठेव या मोहमयी मानवाचे अपराध. आपसूकच होईल त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप.
'ये रे घना ये रे घना' न्हावू घाल माझ्या मनातला 'आषाढ्यस प्रथम दिवसे' मला ललितबंधात नाही ऊतरवायचे मला ते अनुभवायचे!..
'बरस रे घना, बरस रे घना' मी हाक देते तू साथ दे.. तू साथ तू दे.मी वरूणराजाच्या अगमनाची वाट पहात आहेत.तुम्ही पण ना?.
