Nagesh S Shewalkar

Tragedy Action

3  

Nagesh S Shewalkar

Tragedy Action

आर्त टाहो!

आर्त टाहो!

9 mins
778


             सहावा तास चालू असताना कॉलेज बंद होत असल्याची आपत्कालीन घंटा वाजली. नंदा आणि स्वर्णमाला यांनी शंकित नजरेने एकमेकींकडे पाहिले. त्या दोघी बी. ए. प्रथम वर्षात होत्या. इतर मुलींनीही इतरत्र बघताना आपापल्या घड्याळाकडे पाहिले. कॉलेजची वेळ संपायला एक तासाचा अवधी असताना आपत्कालीन घंटा वाजली कशी? सहा टोल देण्याऐवजी शिपायाने चुकून तर घंटा नाही वाजवली ना? वेळेच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या प्राचार्यांनी आज लवकर सुट्टी का दिली? प्राचार्य तर आहेत ना? असे प्रश्न मुलींच्या मनात येत असताना वर्गातील डेकवर आवाज आला आणि मुलींच्या आपापसातील चर्चा थांबली. प्राचार्य धीरगंभीर आवाजात म्हणाले,

"ऐका. महत्त्वाची सूचना आहे. घाबरू नका. शहरात अचानक गोंधळ सुरु झाला आहे. वातावरण तंग आहे. आपल्या कॉलेजमध्येही पोलीस आले आहेत. सर्वांनी गोंधळ न करता शांतपणे कॉलेजमधून बाहेर पडावे. आपापल्या घरी जावे. शहरात फिरू नये. शहरात संचारबंदी लागण्याची शक्यता आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांनी ताबडतोब बसस्थानकावर जावे...." प्राचार्यांचे निवेदन सुरु असताना नंदा-स्वर्णा लगबगीने बाहेर पडल्या. कॉलेजच्या पटांगणात पोलीस असतानाही विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ मारामारी सुरू झाली होती. वेळ न गमावता त्या दोघी कॉलेजच्या बाहेर पडल्या. बाहेरही खूप गोंधळ सुरु होता. लोक मिळेल त्या वाहनाने जीव मुठीत घेऊन घर, बसस्थानक, रेल्वेस्थानक गाठायच्या प्रयत्नात होते. 

   ते शहर अतिसंवेदनशील होते. दंगलीसाठी म्हणून प्रसिद्ध होते. साध्या कारणामुळे होणाऱ्या बाचाबाचीचे रूपांतर दंगलीत व्हायला वेळ लागत नसे. शहरातील कोणत्याही एका कोपऱ्यात एकाच जातीच्या दोन माणसात भांडण लागले तरीही शहरात दोन जातींमध्ये भांडणे लागायची. शांत असलेले शहर दुसऱ्याच क्षणी दंगलीच्या भक्ष्यस्थानी पडायचे आणि लगोलग रक्ताच्या थारोळ्यात सापडायचे. दोन जातीतील लोक एकमेकांची डोकी फोडायचे, जीवावर उठायचे.

   त्यादिवशी असेच कुठेतरी साधे कारण घडले. कुठे काय घडले ते नेमके कुणालाच काही कळाले नाही. परंतु शहर पेटले. लोकांनी एकमेकांच्या वस्तींवर जाऊन वार करायला सुरुवात केली. आयाबहिणींवर अतिप्रसंग सुरु झाले. सर्वत्र गदारोळ, हाहाकार माजला. नेहमी घडणाऱ्या दंगलींमुळे तळ ठोकून असणाऱ्या राखीव दलाच्या तुकड्या कामाला लागल्या.

"नंदे, कसे ग?" घाबरलेल्या स्वर्णमालाने विचारले.

"काय करावे ते समजत नाही...." रडवेल्या आवाजात नंदा म्हणाली. पुढे काय असा प्रश्न दोघींसमोर होता. शहरापासून त्यांच्या गावाचा फाटा पाच किलोमीटर आणि तिथून गाव दोन किलोमीटर. ते दोन किलोमीटरचे अंतर पायी चालावे लागे. नंदा म्हणाली,

"बसस्थानकावर जावे आणि दंगलीमुळे बस बंद केल्या असतील तर तिथून पुन्हा पायी फाट्यावर जाण्यापेक्षा इथून मधूनच गेलो तर?"

"अग, पण पायी आठ किलोमीटर जायचे म्हणजे?"

"पायच दुखतील पण इज्जत तर वाचेल ना?"

"म्हणजे?"

"या दंगली का तुला माहिती नाहीत. अशावेळी नराधमांना आई-बहीणसुद्धा ओळखू येत नाहीत. त्यांच्या कपड्यांना हात घालायला.... बरे चल...." असे म्हणत त्या शहराबाहेर पडणाऱ्या रस्त्याला लागल्या.तितक्यात आलेल्या एका जीपमधून आवाज आला,

'शहरवासीयांना सूचना....अफवांवर विश्वास ठेवू नका. शहरात काहीही घडलेले नाही. दोन माणसांमध्ये बाचाबाची झाली आहे. जातीच्या भांडणाचा प्रश्न नाही. शांत डोक्याने घरी जा. समाज कंटक अफवा पसरवून दोन जातींमध्ये दंगल घडवू पाहात आहेत. त्यांना बळी पडू नका. शांतता ठेवा. शहरात शांतता राहावी म्हणून आज सायंकाळी पाच वाजलेपासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी जारी करण्यात येत आहे.'

जीप पुढे निघून गेली न गेली तोच रस्त्यातल्या एका गल्लीतून काही युवक हातात चमचमत्या वस्तू घेऊन बाहेर पडल्या. ते तरुण त्या दोघींच्या इतक्या जवळून गेले की, जणू दोघींनाही यम त्यांना खेटून पुढे निघून गेल्याचे जाणवले. दोघींनी एकमेकींच्या हात घट्ट आवळले. जणू एकमेकींचा जीव त्या मुठीमध्ये सांभाळून ठेवल्याप्रमाणे. परंतु तो गट त्यांच्याकडे न पाहता निघून गेला. दोघींनी एकमेकींकडे पाहिले. दोघींचेही चेहरे घामाने डबडबले होते. ....

   नंदा आणि स्वर्णमाला त्यांच्या गावातून जवळच्या शहरातील कॉलेजमध्ये शिकत होत्या त्यासाठी दररोज सकाळी गावी मुक्कामी येणाऱ्या बसने त्या शहरात येत. दिवसभर कॉलेज करून सायंकाळी बसने फाट्यावर उतरून पायीच गावी जात असत. दोघी वेगवेगळ्या जातीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये दाट मैत्री होती. गाव तसे शहराला खेटून असल्यामुळे शहरात घडणाऱ्या घटनांचे पडसाद त्यांच्या गावात फार लवकर उमटत असत. शहरात 'हू्ं ' झाले की, गावात 'चू..चू..' होतच असे. त्यामुळे त्या छोट्या गावात कायम दुश्मनीचे आणि दहशतीचे वातावरण असे. विशेषतः तरुणाईमध्ये दुश्मनीची भावना कायम घर करून होती. गावात सतत तणाव असे. अनेकदा गावातील समाजकंटकांनी शहरात दंगल पेटली असल्याची खोटी अफवा पसरवून गावात दंगल घडवून आणली होती. प्रत्येकवेळी महिलांना पुरुषी अत्याचाराला बळी पडावे लागायचे. दोन जातीमध्ये प्रचंड तणाव असला तरीही नंदा आणि स्वर्णमाला यांच्यामध्ये छान मैत्री होती. कदाचित शिकण्यासाठी शहरात जाणे येणे करणाऱ्या त्या दोघीच असल्यामुळे गरजेपोटी त्या एकत्र आल्या आणि नंतर त्यांच्या मैत्रीमध्ये सहजता आली असावी....                                त्या दोघी झपाझप पावले टाकत निघाल्या. पायाची गती वाढली तशीच त्यांच्या ह्रदयाची धडधडही वाढली. दोघींचा वाढलेला श्वास एकमेकींना आधार देत होता, बळ देत होता. दोघी शहराबाहेर पडल्या आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. 

"चला. आगीतून तर बाहेर पडलो." नंदा म्हणाली.

"आगीतून बाहेर पडलो ग पण फुफाट्यात अडकू नये म्हणजे मिळवलं."

"ते ग कसे?"

"अग,तुला का माहिती नाही? कोंबडा आरवतो शहरात त्यामुळे जागे होते गाव आपले! शहरातल्या पेक्षा भयंकर दंगल आपल्या गावात होते."

"हो ना. आता आपण गावात पोहोचेपर्यंत गावात दंगल पेटली नाही म्हणजे मिळवले. गावातील पोट्टे तर नेहमीच एकमेकांच्या जीवावर टपलेली असतात....."

"या आपल्या लोकांना शहाणपण कधी येईल ते न कळे. अग, मागच्यावेळी शहर शांत होते परंतु सकाळी गावातून निघणाऱ्या मोटारीत जागा मिळवण्यासाठी भांडणे झाली. एकमेकांची डोकी तर फुटलीच परंतु तो वाद मिटविण्याऐवजी दोन समाजातील शहाणी सुरती माणसेही एकमेकांच्या छाताडावर बसली. मोटारीचीही नासधूस केली."

"पण त्यापासून कुणी काही शिकले का? पुन्हा ये रे माझ्या मागल्या! त्यापूर्वी माधवीवर कुणीतरी जबरदस्ती केली अन त्याचे फळ तिच्या उदरात वाढल्याचे पाहून तिने विहीर जवळ केली ते पाहून का कुणी सुधारले का? तिच्याप्रमाणे इतर बायकांनी केले असते तर आज आपल्या गावात बोटावर मोजण्याएवढ्या बायका जिवंत राहिल्या असत्या."

'आ जा मेरी गाडी मे बैठ जा! ' असा कर्कश आवाज करीत एक जीप त्यांच्याजवळ येऊन थांबली. टेपचा आवाज बारीक करत चालक म्हणाला,

"बसा. फाट्यावर सोडतो."

दोघींनीही जीपकडे पाहिले. जीपच्या आजूबाजूने माणसे लोंबकळत होती. 

"कुठं बसावे ग? पाय ठेवायला जागा नाही."

"हो ना. चल. जाऊ पायी. किती वेळ लागेल? पाच मिनिटात तर फाटा येईल." नंदा म्हणत असताना जीपला लोंबकळलेले तरुण खाली उतरून म्हणाले,

"बसा. कसेही करुन...."

शेवटी दोघींनी एकमेकींकडे बघितले. अंग चोरत त्या जीपच्या मागच्या दांड्यावर बसल्या. आत गच्च अंधार होता. कोण कुठे काही समजत नव्हते. तशातच एक उग्र दर्प येऊन त्यांना मळमळायला झाले. मागे उभे राहणाऱ्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या अंगावर जास्तीत जास्त भार टाकला. अनेक हात विषारी सापाप्रमाणे त्यांच्या शरीराला दंश करु लागले. परंतु दोघी एकमेकींचे हात हातात घेऊन एकमेकींना धीर देत होत्या. चालकांने गाणे बदलून नवीन गाणे लावले होते,

' चोली के पिछे क्या है? चोली के पिछे...' ते लोकप्रिय गीत ऐकताना दोघींनाही लाजल्यासारखे होत होते. जीपच्या वेगापेक्षा अधिक वेगाने दोघींचेही मन गावी पोहोचले होते. दोघी मनोमन विचार करत होता, 'गावात नक्कीच दंगल भडकली असणार. दुपारची वेळ आहे. गावात जास्त माणसे नसणार. समाजकंटकांना रान मोकळे असणार. काही दुष्ट विचारांची माणसे घरात घुसून ....' तितक्यात जीपला जोराचा ब्रेक लागला. त्यामुळे जीपच्या दांड्यावर बसलेल्या त्या दोघी समोर ढकलल्या गेल्या. त्यांना आधार देण्याच्या निमित्ताने अनेकांनी स्वतःचे हात शेकून घेतले, दुधाची तहान ताकावर भागवल्याप्रमाणे. सावरलेल्या दोघी खाली उतरल्या. दुसरे दोन तरुणही उतरले. क्लिनर म्हणाला," काढा वीस - वीस रुपये..."

"काय? वीस रुपये?" दोघींनीही एकदम विचारले.

"होय. आणले नसते तर ? दंगल पेटली आहे. पायी निघाल्या होत्या. कुण्या टारगटाने रस्त्याने धरले असते म्हणजे ?" क्लिनर छद्मीपणे हसत म्हणाला. कळस म्हणजे त्याच्या वाक्यावर जीपमध्ये हास्याची कारंजी फुलली. खाली मान घालून नंदाने दोघींचे पैसे दिले. ती दोन मुलेही पैसे देऊन भरभर चालत गावाच्या दिशेने निघाले. त्या दोघी मात्र हळूहळू निघाल्या. ती मुले बरीच दूर गेल्याचे पाहून स्वर्णमाला म्हणाली,

"बरे झाले. पोट्टे निघून गेले..."

"अग, पण रस्त्यात कुठे आपली वाट पाहात दबा धरून बसू नयेत म्हणजे मिळवले."

"आता ग कस? म्हणून तर ते भरभर गेले नसतील ना?"

"अग, शहर पेटल्याचे पाहून ते निघाले आहेत. रस्त्याने थांबणार नाहीत. गावी पोहोचून गाव पेटवण्याचा विचार असेल. काय करावे बाई..." असे म्हणत स्वर्णमालाने रस्त्यावर पडलेले दोन अणुकुचीदार दगड घेतले. एक नंदाजवळ देऊन म्हणाली,

"ठेव जवळ. आलेच कुणी आडवे तर काढू ठेचून." शरीरातील जीव मुठीत धरावा तसे त्यांनी ते दगड मुठीत पक्के धरले. प्रचंड तणावात त्या दोघी चालत होत्या. एकमेकींना धीर द्यावा असे दोघींनाही वाटत होते परंतु दोघींचेही शब्द भीतीने मूक झाले होते. आजूबाजूला कुठे झाडाच्या पानांचा जरी आवाज झाला तरी हातातल्या दगडावर दाब वाढून त्या इकडे तिकडे पाहायच्या.मध्येच कुणीतरी समोर आल्याचा भास होऊन त्या जागेवरच दचकून उभ्या राहत. निम्मे अंतर पार पडले आणि समोरून दोन व्यक्ती लगबगीने येताना दिसल्या तशा दोघीही भीतीने गारठल्या. न बोलता दोघींनी एकच निर्णय घेतला आणि दोघीही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या मागे जाऊन लपल्या. ती माणसे जसजशी जवळ येत होती तसतशी या दोघींच्या ह्रदयाची धडधड वाढली. ह्रदयाचे ठोके जणू एकमेकीस साद घालू लागले, धीर देऊ लागले. ती माणसे त्या झाडाशेजारुन पुढे गेल्यानंतर काही वेळाने त्या रस्त्यावर येऊन निघाल्या.

   गाव हाकेच्या अंतरावर असताना अचानक जोराचा पाऊस आला. सोबतीला वादळही होते. तितक्यात जोराच्या वाऱ्याने गावातील लाइट गेले. पावसाचा जोर एवढा मोठा होता की, गावात प्रवेश करून गावाच्या तोंडावर असलेल्या नंदाच्या वाड्यासमोर जाईपर्यंत त्या नखशिखांत भिजल्या. नंदाचे घर येताच नंदा म्हणाली,"स्वर्णा, ये. पाऊस थांबला की जा."

"अग,पण ..."

"ये तर. तुला घरी पोहोचायला सारा गाव ओलांडून जावे लागेल. अशा भिजलेल्या अवस्थेत तू कुणाच्या दृष्टीस पडली तर नसती आफत ओढवेल. घरात चल. कपडे बदल. पाऊस थांबल्यानंतर जा.ये...." नंदा म्हणाली आणि तिच्या पाठोपाठ स्वर्णमाला घरात शिरली.एका खोलीत स्वर्णमालाला बसवून काही क्षणातच नंदा काही कपडे घेऊन आली. ती म्हणाली,

"हे कपडे घे. लवकर बदल. तोवर मी चहा आणते." असे सांगून नंदा आत गेली......

"आर चला रे. शहरात दंगल पेटलीय. जातीजातीत मारामारी लागलीय. आपल्या माणसांना हाण हाण हाणायलेत.."

"अरे, पण झोडपून काढायला गावात कोण असणार आहे?"

"समदी माणसं शेतात गेली असतील पण बाया पोरी असतीलच की...हां. हां. चला रे. चान्स आलाय तर सोडू नका...."

"अरे, पण..."

"ए चूप! चला रे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. गावात एक्का दुक्का माणसे असतील त्यांना ठेचून काढू. आज माल हाती लागेल."

गरम डोक्याची तरुणाई ती.त्यांना हवा मिळायला उशीर. लाकूड, पट्टा, चैन, चाकू, काठी हाती पडेल ते घेऊन ते सारे त्या गल्लीकडे निघाले. जिथे काही वेळापूर्वीच नंदा आणि स्वर्णा दोघी पोहोचल्या होत्या. त्या पोरांमध्येच होता एक सतरा-अठरा वर्षांचा तरुण. त्याचे नाव साहेब. शहरात दंगल सुरु झाली हे ऐकून त्याचे डोके फिरले. अनेक दिवसांपासून त्याचा डोळा नंदावर होता. तो अशाच संधीची वाट पाहात होता. 'आज संधी मिळायला पाहिजे. शहरातून आलेले पोरे सांगत होते की, नंदा आणि स्वर्णा कॉलेजातून आल्या आहेत म्हणून. स्वर्णा घरी पोहोचली असणार. नंदाच्या घरी ती आणि तिची आई दोघीच असणार. तिची आई काय करणार? फारच वटवट करु लागली तर तिला थंड करायला काय वेळ लागणार?' खिशातील चाकूवर हात फिरवत साहेब म्हणाला आणि वेगळ्याच त्वेषाने निघाला. अनेक महिन्यांपासून तो जे स्वप्न पाहात होता ते प्रत्यक्षात उतरण्याची संधी अनायासे चालून आली होती. तो मनोमन खुश झाला. वादळाचा आणि पावसाचा वेग हळूहळू कमी होत होता. परंतु जातीय दंगलीचे वादळ कसे शमणार होते? किती लोकांचे बळी, किती सधवांचे कुंकू आणि किती महिलांची लाज मातीत मिसळून थांबणार होते?

   ते टोळकं त्या गल्लीत शिरलं. क्रिकेटच्या मैदानावर पोहोचताच खेळाडूंनी आपापल्या जागा घ्याव्यात त्याप्रमाणे एकेक जण एकेका घरात शिरुन दिसेल त्या स्त्रीवर ...तिचे वय, तिची स्थिती विचारात न घेता तिच्यावर अन्याय करत सुटले. साहेब हळूहळू पुढे सरकत होता कारण नंदाचे घर शेवटी होते. पाऊस थांबला असला तरीही ढगांची गर्दी असल्याने अंधुकसा प्रकाश होता. साहेब नंदाच्या घरात मांजराच्या पावलाने शिरला. तो आत जाणार तितक्यात त्याच्या कानावर आवाज आला,'हे बघ. तू कपडे बदल. तोवर मी चहा करते.' ते ऐकून खुश होत साहेब मनात म्हणाला,

'म्हणजे नंदाची आई चहा करायला जातेय आणि नंदा कपडे बदलतेय. म्हणजे....म्हणजे तिचे कपडे...' असे पुटपुटत साहेब सावधगिरीने खोलीच्या दाराशी आला. त्याने खोलीत डोकावले. कपड्यांची सळसळ ऐकू आली. अंधुकशा प्रकाशात विवस्त्र झालेले ते शरीर पाहून आनंदी झालेल्या साहेबने खिशातील रुमाल काढला. एका उडीत त्याने तिला मिठीत घेतले. तिच्या तोंडावर बळेच रुमाल बांधला आणि तिला जवळच्या पलंगावर ओढले. दोन-चार मिनिटात एका वेगळ्याच आनंदात तो बाजूला झाला. त्याच आनंदात त्याने तिच्या तोंडावरचा रुमाल ओढला आणि... आणि...त्याचवेळी लाइट आले. खोली प्रकाशाने उजळली. नजरानजर झाली. चेहऱ्यावरचे, डोळ्यातले भाव बदलले.

"क...क...कोण? स्वर्णा, तू..?"

"हे रे काय केलेस तू, साहेबदादा? आज पहाटेच बांधलेल्या राखीची ही रे कशी ओवाळणी घातली?" दोन्ही हातांनी चेहरा झाकलेल्या बहिणीच्या आर्त टाहोने त्याची कानठळी बसली. तो गारठला.....

                                          


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy