Sangieta Devkar

Inspirational

3.0  

Sangieta Devkar

Inspirational

आर यु व्हर्जिन?

आर यु व्हर्जिन?

5 mins
615


विशाखाच्या घरी आज सगळे खुश होते आनंदात होते एका मोठ्या खानदानी घरातून तिला लग्नासाठी होकार आला होता. 15 दिवसांपूर्वी पाहुणे तिला बघून गेले होते आणि आज निरोप आला मुलगी पसंद आहे. मुलगा राजदीप त्याचे जेमतेम शिक्षण बी. कॉम झालेले, त्याचे वडील गावचे सरपंच, आजोबा जिल्हाध्यक्ष, काका पण राजकारणात सक्रिय गावात खूप मान होता या कुटुंबाला. राजदीप दिसायला स्मार्ट... त्याचा बिझनेस होता. विशाखा साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील बी.ए झालेली मुलगी नाकीडोळी छान आणि स्वभावाने शांत. लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न ठरवले होते. राजदीप गावात रुबाबात फिरायचा त्याच्या मागेमागे अनेक रिकामटेकडी मुलं सतत असायची. राजदीपचे लग्न ठरल्याचे त्याच्या मित्रांना समजले तसे सगळे बोलू लागले त्याला...

राज ही मुलगी शहरात राहणारी तिचे काही अफेयर वैगरे असेल तर आणि ती अजूनही कोरीच असेल कशावरून?

म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला, राज ने विचारले.

आजकालच्या मुली खूप फॉरवर्ड असतात, लग्नासाठी कुमारी म्हणजेच व्हर्जिन मुलगी मिळणं कठीणच.

तसा राज म्हणाला, नाही विशाखा तशी वाटत नाही.

बघ बाबा चांगली चौकशी कर नाहीतर तिलाच विचारून घे... असे काहीसे विचित्र विचार मित्रांनी राजदीपच्या मनात घातले. राजदीपही याचा विचार करू लागला.

खरंच विशाखा व्हर्जिन असेल? पण तिला विचारणार कसे? काय करावे त्याच्या मनात गोंधळ चालला होता.


त्याने या विषयावर आपल्या मोठया भावाशी बोलायचे ठरवले. मग तो भावाकडे गेला आणि आपल्या मनातील शंका त्याने बोलून दाखवली. तसा भाऊ हसू लागला म्हणाला, काळजी नको करुस आपल्या घरीच ती पध्दत आहे मुलगी खरी आहे की नाही हे पाहण्याची.

म्हणजे, राजला काही समजले नाही.

तसा भाऊ बोलला, हे बघ तुझे लग्न झाल्यावर पहिल्या रात्री तुमचा संबंध आल्यानंतर जर विशाखाला रक्तत्राव झाला तर समजायचे माल खरा काय समजले का?

ओहह समजले, राज म्हणाला.


थोड्याच दिवसात राजदीप विशाखाचे लग्न झाले. ती सासरी आली.

तेव्हा तिच्या जावेने तिला विचारले विशाखा तुला एक विचारू का?

हो विचारा ना ती म्हणाली.

विशाखा लग्नाआधी तुझे बाहेर काही नव्हते ना?

म्हणजे मी नाही समजले विशाखा बोलली.

अगं तुझे कोणावर प्रेम वगैरे...

नाही पण तुम्ही असे का विचारता विशाखा म्हणाली.

बरं काही नाही काळजी घे, इतकं जाऊबाई म्हणाली.


विशाखाला समजेना असे का विचारले. रात्री विशाखा राजच्या रूममध्ये गेली. थोड्या वेळात राज आला तिच्याजवळ बसला तर त्याच्या तोंडातून दारूचा वास आला.

विशाखा म्हणाली, हे काय तुम्ही ड्रिंक केलीय.

हा मग त्यात काय एवढं, मी पुरुष आहे आणि पुरुष ड्रिंक करतात. आमच्या घरी सगळे घेतात, त्यात विशेष काय, राज म्हणाला.

पण मला नाही आवडत हे ड्रिंक वगैरे ती म्हणाली.

हे बघ इथे तुला काय आवडते याला काहीही किंमत नाही. आम्ही जे करू सांगू ते निमूट ऐकायचं समजले... सगळ्या घरातल्या बायका तेच करतात, राज म्हणाला.

इतक्यात दार वाजले म्हणून राज दार उघडायला गेला त्याची आई आली होती आणि त्यांच्या हातात पांढरी बेडशीट होती ती त्यांनी राजला दिली आणि बेडवर टाक म्हणाल्या. विशाखा म्हणाली आता हे काय.?

ही बेडशीट आहे बेडवर टाक

विशाखाला इतके काही समजले नाही. तिने ती बेडशीट टाकली आणि दिवे बंद करून राज फक्त लांडग्यासारखा तिच्यावर तुटून पडला. तिला समजेना हा काय प्रकार अशी असते पहिली रात्र पण ती चुपचाप त्याचे अत्याचार सहन करत राहिली. सकाळी तिला जाग आली तेव्हा तिचे अंग वेदनेने ठणकत होते. तेवढ्यात दारावर थाप पडली तिने दार उघडले आई बाहेर होत्या.

तिने विचारले काय काम आहे.

तसे आई बेधडक आत आल्या आणि त्यांनी राजला उठवले. राज उठला आणि बेडवरची बेडशीट पाहिली तर ती आहे तशी सफेदच होती.

हे पाहून आई भडकल्या म्हणाल्या, राज ही मुलगी कोरी नाही बघ. हिला रक्तस्त्राव झाला नाही.

राजने हे पाहिले आणि विशाखाला म्हणाला, तू फसवलेस मला तू व्हर्जिन नाही आहेस. विशाखा रडत रडत म्हणाली नाही मी खरे बोलते माझे लग्नाआधी कोणाशी संबंध नव्हता. तसा राज भडकला म्हणाला, मग तुला रक्तस्त्राव का नाही झाला, मला मूर्ख समजतेस का? आमच्या घरी ही पद्धत आहे यावरून समजतं मुलगी कशी आहे आणि सगळ्याच जणी या परीक्षेतून जातात समजलं. तुझी बॅग भर आणि जा तुझ्या घरी असली उष्टी बायको मला नाही चालणार... राजदीप बोलला.

विशाखाने त्याचे पाय धरले म्हणाली, अहो असं काही नाही. मी काही चुकीचे वागले नाही. कोणाशी माझं अफेयर नव्हतं, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा.

पण त्या घरात तिचं ऐकणारं कोणी नव्हतं. माल खोटा निघाला मग तिला या घरात जागा नसायची ही पद्धतच होती या खानदानी घराची. विशाखाला आता तिथे काही स्थान नव्हते. तिला तिच्या घरी पाठवून दिले. विशाखाच्या घरी सर्वाना हा धक्काच होता. आजच्या काळात ही अशी प्रथा अजून ही अवलंबली जाते हा प्रश्न होता. विशाखा फक्त रडत होती तिने राजदीपला फोन केला पण त्याने उचलला नाही. तिला हेच समजेना की यात तिची चुक काय? ती कुमारिकाच होती पण ते सिद्ध करावं लागतं हे तिच्या गावीही नव्हते. रेणू विशाखाची मैत्रीण तिला भेटायला आली होती कारण तिला तिच्या लग्नाला यायला जमले नव्हते.


रेणू आली तिने विशाखाला विचारले, काय मग कसे आहेत आमचे जीजू? पण विशाखा हे ऐकून रडू लागली. काय झाले विशाखा तू रडतेस का? मग विशाखाने जे घडले ते सगळं रेणूला सांगितले. तसे रेणू म्हणाली, अगं किती भयंकर आहे हे आणि आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात हे घडतं. तू गप्प कशी काय राहू शकतेस विशाखा? हा एक प्रकारचा अन्यायच आहे याच्या विरोधात तुला आवाज उठवलाच पाहिजे नाहीतर अजून किती विशाखा या क्रूर प्रथेला बळी पडतील. पण रेणू मी काय करू शकते ते लोक खूप मोठे आहेत पैशाने आणि मानाने. कसली प्रतिष्ठा विशाखा असल्या लोकांची... किती हलक्या वृत्तीचे लोक आहेत हे आज 21 व्या शतकात पण या अंधश्रद्धेला चिटकून आहेत तू चल माझ्यासोबत आपण त्याची पोलिसांकडे तक्रार करू. हा तुझ्या चारित्र्यावर त्यांनी घेतलेला संशय आहे. तुझे चारित्र्यहनन करण्याचा त्यांना काहीही हक्क नाही. आज तूही तुझे अधिकार, हक्क मिळवू शकतेस अशा लोकांना धडा शिकवायलाच हवा. चल ऊठ, असे म्हणत रेणू विशाखाला घेऊन घराबाहेर पडली...    


आजही काही समाजात ही कौमार्यचाचणीची परीक्षा घेतली जाते. भारतातच नव्हे तर बाहेरील देशातसुद्धा व्हर्जिनिटी चेक केली जाते. अलीकडे आपल्याच शहरातही वर्तमानपत्रात बातमी आली होती की एका नवविवाहितेची कौमार्यचाचणी केली गेली ती ही सुशिक्षित घरामध्ये. स्वतंत्र भारतात एकविसाव्या शतकात काही समाजातल्या ‘तिची’ मात्र आजही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्यचाचणी घेतली जाते. जग किती जरी पुढे गेले असले तरी अजुनही काही समाज आपल्या प्रथांमध्ये घुटमळत आहेत. त्यांच्या या घुटमळीत कुठेतरी मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार मांडला जातोय हे नक्की. या समाजात केवळ मुलगीच चारित्र्यवान आहे का? हे पाहिलं जातं. इथे कुठेच मुलांसंदर्भात अशी चाचणी किंवा अशी प्रथा नाही. यामुळे स्त्री-पुरुष समानतेचादेखील प्रश्न उपस्थित होतो. मग मुले व्हर्जिन आहेत का? त्यातले चारित्र्यवान कसे ओळखायचे, असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात येतात. या प्रश्नांवर समजातील लोकांकडे उत्तर कुठेच नाही. या सर्व परिस्थितीवरून एकच लक्षात येते की मुलींना एक माणूस म्हणून वागवले जात नाही. म्हणूनच म्हणते स्त्रीला एक माणूस म्हणून जगू द्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational