Pradip Joshi

Abstract Others

3  

Pradip Joshi

Abstract Others

आम्ही छान जीवन जगलो कारण ...

आम्ही छान जीवन जगलो कारण ...

2 mins
180


आम्ही छान जीवन जगलो कारण....

कधी कधी असं वाटत की आपण किती छान जीवन जगलो. आपण धावपळीच्या युगाला कधी सामोरे गेलो नाही. अगदी विचारपूर्वक निर्णय घेत आयुष्याच्या वाटेवरून प्रवास केला. प्रत्येक युगाचे वैशिष्ट्य असते त्यामुळे त्याची तुलना करू नये असे म्हटले जाते. मी पत्रकार असल्याने मला तुलनात्मक विचार मांडल्याशिवाय रहावत नाही. त्यामुळे आमचा वयोगट कसे जगला हे सांगण्याचा हा प्रयत्न....


साधारणपणे 1950 ते 1990 चा कालावधी गृहीत धरायला हरकत नाही. आम्ही पुस्तके वह्या यांच्या ओझ्याखाली कधीच नव्हतो. रमत गमत शाळेत जायचो व त्याच मार्गाने घरी यायचो. मित्र मैत्रिणी खूप होत्या पण मैत्रीचे सारे संकेत आम्ही पाळले होते. समाज आमच्याकडे कधीच संशयी नजरेने बघत न्हवता. आम्ही मुक्त होतो पण स्वैराचारी मुळीच नव्हतो. आम्ही खरीखुरी मैत्री केली. नेटसोबत आमची मैत्री नव्हती. आम्ही वर्गातील मित्र मैत्रिणी एकमेकांना संदेश द्यायचो मात्र ते वहीच्या पाठीमागील पानावर व कोणाला वाचता येऊ नये इतक्या बारीक अक्षरात. आम्हाला चिठ्ठ्या देण्यापेक्षा हा मार्ग सुरक्षित वाटायचा. 

आम्ही कुठलेही पाणी पचवले. अगदी नदीच्या पात्रातील झऱ्यातील पाणी आम्ही मनसोक्त पिलो. बिसलरी आम्ही पाहिली देखील नव्हती. हवं तितकं हवं ते खाल्लं मात्र आमच्या शरीरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

आई सकाळी गरमागरम पातेलं भरून कालवण व भाकऱ्या थापून ठेवायची. सकाळी आम्ही कुस्करून हवी तेवढी भाकरी खायचो. बिस्किटाच्या आहारी आम्ही कधी गेलो नाही. शाळेत सुद्धा आमचा तीन कप्पी डबा असायचा. भात भाकरी भाजी दूध यांचा त्यात समावेश असायचा. सकाळ संध्याकाळ घरात चुलीवर स्वयंपाक असायचा. हल्ली सारखे सकाळी जेवण संध्याकाळी फास्ट फूड हा प्रकार आम्ही कधी अनुभवलाच नाही.


उसाचा रस पिऊन आईस्क्रीम खाऊन आम्हाला सर्दीचा कधी त्रास झाला नाही. ज्या त्या हंगामात आम्ही सगळे पदार्थ खायचो किती मजा यायची. कॅल्शियम पोटॅशियम कमी म्हणून आम्ही दवाखान्यात कधी गेलो नाही. सकस जेवण, सकस नाष्टा हे आमच्या आजारी न पडण्याचे गमक होते. जेवणाच्या वेळा आम्ही पाळायचो. हंगामी फळे आमच्या खाण्यात असायची.

टाकाऊ पासून टिकाऊ हीच आमची खेळणी होती. सिगारेटची रिकामी पाकिटे, रिकाम्या काडेपेट्या, गोट्या, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, दगड, गारगोट्या ही खेळण्याची साधने होती. चिनी खेळणी आम्ही पाहिली देखील नव्हती. आई वडील, गुरुजन यांचा मार देखील भरपूर खाल्ला होता. शिक्षा म्हणून उपाशीं देखील झोपलो होतो. लाड कमी शिस्त जास्त आशा वातावरणात आम्ही होतो.

मोबाईल चॅटिंग असले प्रकारचं नव्हते काय असेल ते रोखठोक बोलणे. प्रेम देखील असेच केले. घराघरात संवाद होता वाद कमी होता. तक्रारीचा फारसा सूर नव्हता. आई वडील सांगतील ते प्रमाणभूत. असा प्रकार होता .

सुट्टीच्या दिवशी आम्ही मित्राच्या घरी खेळण्यासाठी जात असू तेथेच आमचे जेवण होत असे. जीवनात कमालीचे हास्य होते. तणाव हा फारसा नव्हताच. माणसे कमालीची हळवी होती. आजच्या सारख्या लोकांच्या संवेदना बोथट झालेल्या नव्हत्या. थोडक्यात काय तर आमची पिढी खाऊन पिऊन सुखी होती.

मी हल्लीच्या पिढीला नावे ठेवणार नाही किंवा दोषही देणार नाही. काळाबरोबर बदलावे लागते हे मलाही मान्य आहे. भौतिक सुविधा, विचारसरणीत होणारा बदल हा क्रमप्राप्त असतो. जीवनशैली प्रमाणे आपणास बदलावे लागते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract