Pradip Joshi

Others

2  

Pradip Joshi

Others

आपल्या हातात काहीही नसते

आपल्या हातात काहीही नसते

2 mins
1.1K


जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत किंवा सर्वच गोष्टीत आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होत नाही. असे झाले तर आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो की आपले नेमके चुकले कुठे? काही केल्या आपल्याला त्याचे उत्तर सापडत नाही मग आपण एका निष्कर्षाप्रत येतो की आपल्या हातात काहीही नसते. आपण फक्त माध्यम असतो. कर्ता करविता कोणी वेगळाच असतो.

आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असतो. आपल्याला त्याला शुभेच्छा द्यावयाच्या असतात. आपल्या दोघात खूप अंतर असते. शुभेच्छा वेळेत पोहचणे गरजेचे असते. आपण सगळी कामे बाजूला ठेवून त्याला भ्रमणध्वनी वरून संदेश पाठवतो. नेमके त्याचवेळी नेट समस्या उदभवते. आपला तो संदेश त्या व्यक्तीला वाढदिवस झाल्यानंतर मिळतो. कारण आपल्या हातात काही नसते.

कधी दुर्दैवाने आपल्या जवळच्या मित्राचा अपघात होतो. अन्य मित्र आपल्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगतात. आपल्याला देखील कधी एकदा मित्राला जाऊन पाहतो असे मनोमन वाटते. नेमकी त्याच दिवशी ट्राफिक जाम असते. आपण वेळेत पोहचू शकत नाही. उपचार घेत असतानाच तो मित्र आपणास सोडून गेलेला असतो. तेथे पोहचल्यावर आपणास सर्वजण "उशीर केला" असे सांगतात. आपण तरी काय करणार? आपल्या हाती काहीही नसते.

पाहुण्यांकडे एखादा कार्यक्रम असतो. त्यांनी वेळेत या वाट बघतो असे आवर्जून सांगितलेले असते. पत्नीने देखील ऑफिस मधून लवकर येण्याची तंबी दिलेली असते. आपण अगदी वेळेत जाण्यासाठी निघणार तोच बॉस पंधरा मिनिटांसाठी मिटिंग ठेवतो. मिटिंग पंधरा मिनिटाऐवजी चांगला अर्धा तास घेते. आपण घाईघाईने घरी येतो. बायकोने अबोला धरलेला असतो. तिची समजूत काढून कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो. कार्यक्रम संपलेला असतो. यजमान "या जेवायला तरी वेळेत आलात" असे उपरोधीकपणे बोलतात. गप्प बसून ऐकून घ्यावे लागते. काय करणार आपल्या हाती काहीही नसते.

मंगल कार्यालयात जेवणाच्या वेळी तर हा अनुभव नक्कीच येतो. पहिल्या पंक्तीत जेवायचे म्हणून ढकला ढकली करत आपण खुर्ची पकडायचा प्रयत्न करतो. मात्र दोन पंक्ती झाल्या तरी त्यात आपणाला यश मिळत नाही. तिसऱ्या पंक्तीला कशी तरी जागा भेटते मात्र निम्म्याहून अधिक पदार्थ संपलेले असतात.काय करणार आपल्या हातात काहीही नसते.

बायको कधीतरी बाजारातून हापूस आंबे आणण्यास सांगते. आपण बाजारात जाऊन दहा वेळा चौकशी करून आंबे चांगले असल्याची खात्री करून ते विकत घेतो. बायको पण पोळ्या करते. तळण तळते. आमरस करते. जेवायला बसताना अर्धी वाटीच आमरस ताटात पाहून विचारणा केली तर उत्तर मिळते की एक डझन आंब्यात फक्त चारच चांगले निघाले. काय करणार आपल्या हातात काहीही नसते.



Rate this content
Log in