सकस वाचनातून सकस साहित्य निर्म
सकस वाचनातून सकस साहित्य निर्म


सकस वाचनातून सकस साहित्य निर्मिती होते.
वाचन व लेखन या दोन परस्पर पूरक क्रिया आहेत. ही दोन्ही कौशल्ये आहेत. कौशल्ये आत्मसात करावी लागतात. आपणाला चांगले लेखक बनायचे असेल तर प्रथम चांगले वाचक बनले पाहिजे. जो चांगले वाचतो तो चांगले लिहतो हा अलिखित नियमच आहे. काय लिहावे याचा जसा आपण विचार करतो तसेच काय वाचावे याचा देखील विचार झाला पाहिजे. केवळ रोजचे वर्तमानपत्र वाचणे म्हणजे वाचन नव्हे. भरपूर वाचन केले की एक प्रकारची प्रगल्भता येते. चांगल्या वाचनातून विविध प्रकारचे अनुभव मिळतात. कठीण प्रसंगी सामोरे कसे जायचे याचे ज्ञान मिळते. वाचनातून प्रेरणा मिळते. एखाद्या लेखनाचा अनुभव हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शन ठरू शकते.
आज लेखन विपुल प्रमाणात आहे. कवितांचा तर महापुरच आहे. दिवसेंदिवस लेखन करणारांची संख्या वाढत आहे. विविध माध्यमे त्यास प्रोत्साहन देत आहेत. वाचकांचाच शोध घ्यावा लागत आहे अशी आजची स्थिती आहे. लेखन विपुल असून चालणार नाही त्या लेखनाच्या दर्जाचे काय?
किती लिहिले यापेक्षा काय लिहिले याला जास्त महत्व असते. दैनिकात जसे रकानेच्या रकाने भरून येतात मात्र सर्वच मजकुर वाचनीय नसतो. तसे साहित्याच्या प्रांतात घडून चालणार नाही. लेखकाचे देखील जसे वाचन तशी त्याची विचारसरणी व त्यानुसार त्याचे लेखन हे ठरलेले असते. त्यामुळे लेखकाने प्रथम सकस वाचन वाढवले पाहिजे. चांगला वाचक हा चांगला लेखक हेच सूत्र माझ्या मते योग्य वाटते.
नवोदितांना लेखन कसे करावे याच्या कार्यशाळा जशा घेतल्या जातात तशाच प्रकारे नेमके काय वाचावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा देखील आयोजित केल्या पाहिजेत. रोज मी दहा कविता, पाच कथा, विपुल लेख लिहिले याला काही अर्थ नाही. ते लेखन किती जणांनी वाचले किती वाचकांची त्याला सकारात्मक दाद मिळाली हे देखील पाहिले पाहिजे. जात, धर्म, स्तुती, टीका या पलीकडे जाऊन लेखन झाले पाहिजे. एखादी कलाकृती आपणास का आवडते तर त्यातील काही संदर्भ आपल्या जीवनाशी मिळते जुळते असतात. एखाद्या लेखक किंवा कवीने आपल्याच जीवनावर लिहले आहे असा आपला समज होतो त्यावेळी आपण त्या लेखनाशी एकरूप होतो.
प्रत्येकाची लेखनाची धाटणी वेगवेगळी असते. खूप पुस्तकांचे वाचन केल्यावर आपणास त्यातील विविधता बारकावे समजतात. आपल्या लेखनास ते मार्गदर्शक ठरू शकतात. शहरी, ग्रामीण, दलित, वंचीत, प्रादेशिक साहित्यातून व्यथा वेदना, सुख दुःख, हास्य आदी भावभावना प्रकट होतात त्यासाठी दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. म्हणतात ना "वाचाल तर वाचाल..."