STORYMIRROR

Purushottam Patel

Abstract Comedy Fantasy

4.3  

Purushottam Patel

Abstract Comedy Fantasy

आजीची इच्छा

आजीची इच्छा

6 mins
291


   सचीन आजी आजोबांचा खूप लाडका नातू…एकवेळ आई-बाबा जवळ नसले तरी चालेल.मात्र त्याला आजी-आजोबा या दोघांपैकी कोणीतरी एक जण घरी हवेच!

 शाळेत जाण्याच्या दररोजच्या वेळेत अंघोळ करून,भांगपट्टी करुन सकाळी साडेसहा वाजता सचीन शाळेत जाण्यासाठी तयार झाला.आईने त्याचे दप्तर तयार केले.त्याला आवडणारे खास कांदेपोहे टिफीनमध्ये भरले.

" सच्चू बेटा ! झाली न् शाळेत जायची तयारी?"

आईचे बोल ऐकताच स्टडीरुम मध्ये केसांत कंगवा फिरवता फिरवता पुन्हा सचीन बोलला.

" आय एम रेडी मम्मा…! "

" आजी-आजोबांना नमस्कार झालाय ना? सगळं काही आवरुन ये बाहेर…!"

आईने सचीनला सूचना केली.त्याचे दप्तर उचलताना तीने सचीनच्या दप्तरात टिफीन, वॉटर बॉटल ठेवलीय का? याची एकदा खात्री केली. विशेष म्हणजे आठवणीने सचीनचे स्कूल आयकार्ड स्वतःच्या हातात घेऊनच ती बाहेर निघाली.

  सचीनने आजी आजोबांना नमस्कार केला. आजीने जवळच असलेली आपली चंची उचलली.चंचिला मारलेली गाठ गरगर फिरवत तीने हळूच सोडली.चंचीत हळूच हात टाकून तिने दहा रुपयाची एक नोट काढली.सचीनच्या हाती देत ती म्हणाली, " राजा,तुला कॅडबरी आवडते ना? घेऊन खा हं! म्हणून हे दहा रुपये!" 

" हो आज्जी ! " म्हणत त्याने घरातून धूम ठोकली.सचीन बाहेर आला.आल्या आल्या त्याने आईलाही नमस्कार केला.आईने आपल्या हातात असलेले सचीनचे स्कूल आयकार्ड त्याचा गळ्यात घातले.दोन मिनिटात स्कूल बस आली.सचीन स्कूल बसमध्ये बसून स्कूलच्या दिशेने निघाला.

  दुपारचा एक वाजला.स्कूलमध्ये लंच ब्रेक झाला.तो खूप आनंदित होता.आईने आज त्याचे आवडते कांदेपोहे टिफीनमध्ये दिले होते.तो खाण्यासाठी खूप अधीर झाला होता.रुममध्ये सगळे स्टुडंट्स बसले.प्रत्येकाने आपापले टिफिन उघडले.सचीननेही आनंदाने आपला टिफिन उघडला.पाहतो तर….काय? टिफीन पुर्णपणे रिकामा होता.त्याच्याकडे पाहून सर्व मुले-मुली मोठमोठ्याने हसू लागले.बिच्चारा सचीन मात्र प्रचंड हिरमुसला.

त्याचाच जवळ बसलेला अभीर म्हणाला,

" ए सचीन,तुझ्या कांदेपोह्याचे तर वांदेपोहे झाले रेऽऽ! म्हणून वाकुल्या दाखवत त्याला चिडवू लागला.

  दुपारी आजीला अचानक चक्कर आली.ती घरातच पडली. पडताच क्षणी आजीची शुद्धच हरपली. आप्पांनी विनयला फोनकॉल करुन दुकानातून त्वरित घरी बोलावून घेतले. विनयने आईला त्वरीत दिया स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.सर्व तपासण्याअंती डॉक्टरांनी आजीला हार्ट ॲटक आला असून आणि त्यामुळे पॅरालिसिस झाल्याचे निदान केले.

  विनयने आईवर उपचार करण्याची सर्व ती तयारी दर्शवली.डॉक्टर म्हणाले,

" विनयजी, तुमच्या आईचे सध्याचे रनिंग एज पंच्यायशी वर्ष आहे.ह्या वयात कोणतेही ऑपरेशन करणे इम्पॉसिबल आहे.तिला दिलेला औषधोपचार काळजीपूर्वक सुरु ठेवा. हॉस्पिटलला राहून अजून काही साध्य होईल असे वाटत नाही. म्हणून तुम्ही आईला घरीच घेऊन जा! ती जास्त दिवस जगू शकत नाही. वाचली तर ते तीचे व तुमचे भाग्य ! "

  डॉक्टरांनी दिलेला सल्ला विचारात घेऊन विनयने आईला घरी आणले.सायंकाळचे सहा वाजले असावेत.सूर्य अस्ताचलाकडे सरकू लागला होता.घरात पुन्हा धावपळ सुरु झाली. तीचे डोळे लागले.पण…आजीचे बरळणे सुरु झाले.आजी एक दोन मिनिटांनी " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " असे बरळू लागली.विनय आणि त्याचा पत्नीला कळेना,आई एकसारखी अत्यंत क्षीण आवाजात " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " असे का बरळते आहे ? आईला विचारावे तर ती कानाने दहा वर्षापूर्वीच बहिरी झालेली.तीला इशा-याने विचारावे तर…तीचे डोळेही लागलेले!आप्पांना ही काहीच कळेना? घरातील सगळेच प्रचंड विचारांच्या वादळात सापडले.

विनयची बायको म्हणाली,

" अहो,मला वाटते…आईची ही शेवटची इच्छा असावी.असे म्हणतात, घरच्यांनी मरणा-या व्यक्तीची शेवटची इच्छा नक्की पूर्ण करावी.मग ती एखादा पदार्थ खाण्याची असो,वा एखाद्या व्यक्तीला भेटण्याची असो!वाह अजून काही… ही इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या मरणासन्न व्यक्तीचे प्राणोत्क्रमणच होत नाही.आणि समजा,प्राण गेलेच तर ते घरातच अडकून राहतात हो!मग ते भूत - हडळ बनून घरातील लोकांना त्रास देतात म्हणे! असं ऐकलंय हो मी! अहो,ऐकताय ना?" विनयची बायको म्हणाली.

" ऐकतोय ना?आईची एकसारखी सुरु असलेली ही बडबड, त्यात तुझी ही दुसरी बडबड! " विनय त्राग्याने म्हणाला.

" अहो,तुम्हाला सांगते ना…माझ्या माहेरी एक आजी असेच काहीसे बरळत मेली.घरच्यांनी तिच्या बरळण्याकडे साफ दुर्लक्ष केलं.अन् तीची इच्छा पूर्ण न होताच गेली बिच्चारी ! आणि…." ती बोलतांना थांबली.

" मग…पुढे काय झालं ते सांगशील का नाही? " विनयने तिला बोलते केले.

" अहोऽऽ मेल्यावर ती आजी रोज रात्री बारानंतर घरात यायची.किचनचे डबे उघडून द्यायची.गॅस पेटवून स्वयंपाक करायची.आणि सर्व पसारा करुन निघून जायची." 

" मग पुढे …? " विनयचा प्रश्न.

" मला वाटतं ,आपली आईसुद्धा " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " असं बरळतेय ना ! ही त्यांची शेवटची इच्छा असावी.आपण तिच्या बेडभोवती पाच फेऱ्या घालू या की!" तीने

विनयला उपाय सुचविला.

" मग पुढे…? " विनयच्या ' मग पुढे…? ' या प्रश्नावर त्याची बायको संतापली.

" काय चाललंय हो तुमचे हे? मग पुढे? मग पुढे? मी सांगते ती गंमत वाटतेय का हो तुम्हाला? "

" मग पुढे…? " विनयचा पुन्हा तोच प्रश्न.

" चला,व्हा पुढे! आईच्या बेडभोवती फेरा मारु आपण ! " म्हणत तिने विनयला उठवले.त्याचा हात हातात घेऊन ती चालू लागली.

" व्हा पुढे! " म्हणत तिने विनयला पुढे केले.त्या दोघांनी आई झोपलेल्या बेडभोवती ' आई आम्ही फेरा घालतोय ग् ! ' म्हणत पाच फेऱ्या घातल्या.आणि ते पुन्हा बसले.मात्र आईचे बरळणे काही बंदच होईना.ते सुरुच होते." फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! "

 आता आप्पांनीही आपल्या बरळणा-या पत्नीची अखेरची इच्छा समजून, आपली काठी टेकवत टेकवत तिच्या बेडभोवती पाच फेऱ्या घातल्या.तरीही तिचे बरळणे सुरुच! 

  लहान सचीननेही पाच फेऱ्या घातल्या.पण …आजीचे " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " बरळणे काही बंदच होईना.

विनयची बायको म्हणाली, " आप्पा, हिरा नावाची आईची कोणी मैत्रीण आहे का हो ?" आप्पांनी आपल्या मेंदुला थोडा ताण देत म्हटले. " हो.आठवलं.तिच्या एका मैत्रिणीचे नाव आहे हिरा!" पण…सुनबाई तू का विचारतेय हे?

" आप्पा,सांगते की! मग झालं तर …कुठे राहते हो हिराबाई? विनयच्या बायकोच्या प्रश्न.

" हिरा न् ? ती दोंडाईच्याला राहते. "

" हिंडू फिरु ,चालू शकते ना हिराबाई? " विनयच्या बायकोने अधीर होऊन विचारले.

होऽऽ ! हिंडते,फिरते ती.कालच तिच्याशी कानात हेडफोन घालून फोनवर बोलली तुझी सासू ! " आप्पा आणि बायकोच चाललेला मुक्त संवाद विनय ऐकत होता.

" आप्पा,हिरामावशींना लावा न् फोन! बोलवून घ्या तर त्यांना.हिराबाईंनाच भेटायची इच्छा आहे त्यांना.त्यांच्यातच जीव घुटमळतोय सासुबाईंचा … ! विनयच्या बायकोची तोंडाची टकळी सुरु झाली.

  आप्पांनी हिराबाईंना फोन कॉल केला.तिला साद्यंत घटना कथन केली.

" अग हिरा,तुझ्या जीवलग मैत्रीणीची प्रकृती बरी नाही.अंतिम यात्रेला निघालीय ग् ती! मात्र जातांना तुझ्या नावाचा जप करतेय ती.तू आहे तशी येऊन भेट.भेटशील ना? "डबडबलेल्या डोळ्यांनी अप्पा बोलत होते.

" आप्पा,होऽऽ आत्ताच निघते मी.पण…काल तर तीची तब्येत बरी होती.हे असे अचानक? " हिराबाई बोलत होती.

" अग आयुष्याचे काही खरं नसतं बाय ! पिकलं पान कधी गळायचं ते कोणी सांगत काय? नाही ना? तसंच …पण तू लवकर ये हं!तुझ्यात जीव गुंतलाय ग् तिच्या ! " आप्पांनी मोबाईल फोन डिस्कनेक्ट केला.

  कातरवेळ झाली होती.अंगणात एक आय ट्वैन्टी फोर व्हिलर येऊन थांबली.गाडीतून एक वयोवृद्ध म्हातारी उतरली.तिला तेरा चौदा वर्षांचा आपल्या नातवाने आधार देत विनयच्या घरात आणले,

हिराबाई घरात येताच आप्पा,आणि विनयसह सर्वांचेच चेहरे उजळले.हिराबाई विनयच्या आईच्या उशीजवळ जाऊन बसली.तिने तिच्या हात हाती घेऊन म्हटले, " ए रंगे, डोळे उघड ना.मी हिरा,तुला भेटायला आले बघ ! " 

हिराबाईचा आवाज ऐकूण आजीने क्षणभर डोळे उघडले.मात्र ते लगेचच मिटले गेले.क्षीण झालेल्या आवाजात अजूनही बरळणे सुरुच होते." फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " बरळणे काही बंदच होईना.

 " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " हे तिचे बरळणे सगळ्यांना एक कोडं झाले होते. तिच्या बेडभोवती विनयच्या अख्ख्या कुटुंबाने फेरा मारला होता.आता आलेल्या हिराबाईनेही फेरा घातला होता.तरी बरळणे काही बंदच होईना.

 आजीची बेडवर पडून बरळण्याची अवस्था सगळ्यांनाच अस्वस्थ करीत होती.सगळेच चिंताक्रांत बसले होते.हिराबाईला आठवले.

' एकदा रंगीने आपल्याच हाताने बनविलेला गोड पदार्थ खाण्याचा हट्ट धरला होता.तसा हा आजचा हट्ट असेल का? ' 

  हिराबाई त्वरीत विनयच्या बायकोला घेऊन स्वयंपाक घरात गेली.दहा मिनिटांत कसला तरी गोड पदार्थ बनवूनच त्या दोघी बाहेर आल्या.हिराबाई पुन्हा रंगीच्या उशीजवळ जाऊन बसली.

" रंगे…अग उठ! हा बघ ,मी तुझ्यासाठी माझ्या हातांनी तुझा आवडता खास पदार्थ बनवलाय ग! खातेय ना?मग उठ ! " 

हिराबाईने एका चमच्यात चिमूटभर तो गोड पदार्थ घेऊन रंगीच्या ओठाआड भरला.

  …आणि चमत्कार घडला.रंगीचे दोन तासांपासून " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " सुरु असलेले बरळणेच बंद झाले.

" आप्पा,तुमची ही रंगी तुम्हाला अखेर पर्यंत कळलीच नाही. ती खूप शौकीन आहे हो ह्या शि-याची ! बघा न् शिरा तोंडात घेताच बरळणेच बंद केले तिने.अहो,काल सुद्धा म्हणत होती ती मला,तुझ्या हातचा शिरा खायचाय ग् ! कधी येतेय तू इकडे ?अखेर बोलवूनच घेतले पहा तिने! " बोलतांना हिराबाईचा कंठ दाटून आला.

  सगळ्यांचाच जीवाची दोन तासांपासून सुरु झालेली " फिऽऽराऽ… फिऽऽराऽ…! " शब्दाभोवतीची घालमेल अखेर " शिरा " वर येऊन थांबली होती.शिरा तोंडात घेऊन होताच पंधरा मिनिटांनी रंगीबाईचे प्राणोत्क्रमणच झाले.

 ' फिऽऽरा ' ने घातलेला गोंधळ ' हिरा ' पर्यंत गेला. हिराने ' शिरा ' केला.आणि मरणासन्न

' रंगी' लाही इच्छापूर्ती होऊन मुक्ती मिळाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract