STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Classics Inspirational

4  

Prof Purushottam Patel

Classics Inspirational

आईचे मुलास पत्र…!

आईचे मुलास पत्र…!

5 mins
284



प्रिय लेकरा ,

तुला हृदयापासून अनंत आशीर्वाद !

आज तू शिकून सवरुन मोठ्ठा झालास.

नोकरीला लागून साईब झालास.

पण तुला माहित हाय का?

तुला लाहानाचा मोठ्ठा कोणी केलाय ते ? नाहीना... ?

मग ऐक तं !कदाचित उद्या मीही नसेन…

लेकरा,अमरत्वाचे वरदान इथे भूतलावरील कोणत्याच मानवप्राण्याला नाय हे लक्षात असू दे

जवा तू जनमलास ,तवापासंन 

तू चार वरीसचा होईस्तो,

तुझं सगळं काही मी केलं असं समजू नकोस ! लेकरा …तुझा जन्मापासनच तुझं उठणं,बसणं,न्हाऊ-माखू घालणं, इतकंच काय तुझे लंगोट बदलणं,नवीन लंगोट बांधणं,ही सगळी कामं तुझा बाबानं स्वत:च केलीत की!

बाळा,तुला सांगते,तुझा जन्मापासनंच माझी पाठ आजारपणानं धरली,

अन् मी सुद्धा चार वरीस खाटेवरच पडून व्हती !

माझंसुद्धा चार वरीसपावेतो उठणं,बसणं, मला औषधपाणी देणं, रांधणं,वाढणं,उष्टी-खरकटी भांडी धुणं-घासणं…

ही सगळीच कामं तुझा बाबांनीच केली बरं !

तुझे बाबा ते चार वरीस तुझी अन् माझी आई 

अन् मैतर झाले…

तुलाही सुखात,आनंदात जगता यावं म्हणून हा प्रपंच त्यांनी केला !

बाळा! तुला सांगते,मला आजारपणाने खूपच थकल्यागत वाटे ! तुझ्यासाठी दूधही आटलं व्हतं.

तुला दूध प्यायला मिळावं म्हणून त्यांनी द्रोणाचार्य परमाणं पिठात पाणी कालवून दूध पाजलं नाही तुला. तर…स्वतः रातदिन काबाडकष्ट करुन एक गाय विकत आणली. तुझ्या दूधापायी !

त्या गाईचा गुराखी बनुन सांभाळ करणं, चारा-पाणी करणं, शेणं-मूत आवरणंही,

सगळी कामं तुझ्या बाबांनीच केली.का?

तर तुला दूध पिऊन " कृष्ण-बलरामा " प्रमाणं

बलवान होता यावं हे तेंचं सपन व्हतं म्हणून... !

तू जव्हा दुडुदुडू चालू लागला,चालतांना पडू लागला तर धावत येऊन तुला मी नाय तर तुझ्या बाबांनीच सावरलं.

बोट धरुन चालायला ही त्यासनीच तर शिकवलं बाळा तुला !मी तर सदा न् कदा वाटेला खिळलेली होते.

तुझा हट्टापायी ते घोडा झाले.तुला पाठीवर घेऊन घरभर फिरले.तू," चल रं घोडा टबऽऽऽक टऽबऽऽक " असं बोलून खुष व्हायचा.

तुला सांगते,तू नऊ महिण्याचा अस्ताना,तुला हगवण लागली तुझे हागरे लंगोट बदलणे,ते धुणे हे खूप जीवावर गेले त्यास्नी.पण,एक शब्दानेही त्रागा नाही की राग नाही केला त्यास्नी . तुझ्यासाठी ते सगळं करीत व्हते!

तू काहीच खाईना,पिईना,अन् दिवसरात्र काही केल्या झोपेना...रडून रडून आकांत मांडला व्हतास तू ! म्हणून चार दिवस तुला छातीशी - कडेवर घेऊन रात्रंदिन तुझी काळजी तुझा बाबांनीच घेतली.ते चार दिवस अन् चार रात्री त्यांनी जागून काढल्या.

घरातली सगळी कामही त्यासनीच आवरली. कशी आवरली एवढी कामं? तेच जाणे !तुला तवा तर कायबी कळेना.तुला न कळणारी गोष्ट आज सांगितली तर खरी नाय वाटायची.जाऊ दे…!तू म्हणशील, " आई-बाबांनी ही काम करणं त्येचं कर्तव्यच सारे की ! " 

तुझं भी खरंच हाय म्हणा !

पण तू एकदा बोलला व्हता," बाबा, तुम्ही खूप कष्ट करतात.मी त्याचं मोल विसरणार नाही .नोकरीला लागलो न् की तुम्हा दोघांना खूप सुखात ठेवीन मी!

तुमच्या चाकरीला नोकर राखीन मी! " 

हे ऐकून आम्हास्नी आभाळ चार बोटं दूर राहिल्याचं वाटलं व्हतं!

लेकरा,आम्ही काही तालेवार नव्हतो,पण तरी तूला आमच्या पोटाला चिमटा देऊन शिकवलं! स्वतः तुझ्या बापानं दहा वेळा तुटलेली चप्पल शिवून वापरली.पण तुला सायबांचे बुट विकत दिधले.

सवताचा घास तुझा मुखात भरवला.तू पोटभर जेवला की मगच आम्ही जेवलो.तू उपाशी राहायला नको म्हणून…!

तुझा बाबानं सवता ठिगळं लावलेलं धोतर अन् फाटका सदरा व मी सुद्धा ठिगळं लावलेली साडी वापरली,पण तुला महागातली सुटपॅन्ट अन् टाय का काय ? तो घेऊन दिला." तू साईब व्हावा.हे सपन पूर्ण व्हावं.मग तुझ्यासाठी कायपण..." यासाठी त्येंनी सारी हौसमजा दूर सारली.

 तेंचं व माझं सपन आज पुरं झालं.तू आत्ता मोठ्ठा कलीक्टरसायब झालाय म्हणे!शिकता शिकता शिरमंताची लेक तुला बायको मिळाली.सास-याचे ऐंकून तू लग्नही उरकून घेतलं.त्येचा आम्हाला राग नाय ! खरं सांगते हं! तुझा संसार सुखात चाललाय.तुला दोन पोरं होऊन ती घरभर हिंडाय लागलीत.कामाला नोकरचाकर ,फिरायला महागडी गाडी... 

राहायला मोठ्ठा राजमहाल वाटावा

असं घर आहे म्हणे तुझं! हे ऐकून आम्ही धन्य झालोय!🙏

ही सगळी सुवार्ता मला तुझ्या घरी कामाला असणारी रमाबाई येऊन सांगून गेली. ऐकूण मन भरुन आलं रं पोरा !

आम्ही काय ? जन्माचे दरिंदर,तुला आता कायबी देवू शकणार नाही.जेवढं आमच्या झोळीत होतं ते सर्व तुला देऊन झालं.आता म्हातारे झालो.हातापायातलं बळ संपतं चाललंय. तुला आमची आता गरजच नाय.तू आमच्यापासून दूर राहिला तरी त्येचं आम्हाला तिळमात्र वाईट नाही. " तू सुखात रहा ! "

" तू खूप सुखात रहा! तुला दुखाचा कधी चटका लागू नये.म्हणून आई अंबाबाईला हात जोडून प्रार्थना! "

आणि बाळा,एक गोष्ट ऐक…चुकलो असू आम्ही तर माफ कर!🙏

रमाबाईचं ऐकूण तुझा बाबाला राहवलं नाही.तू बोलवलं नसलं तरी , “ मुलाला भेटायला बापाला कसली बंदी? मी माझ्या लाडोबाला भेटायला जाणारच!” हा त्यांनी हट्ट धरला.

आठ दिवसांपुर्वी ते तुला भेटण्यासाठी तुझ्या बंगल्यावर आले.पण,तुझ्या बंगल्याचा गेटजवळच तुझा बाबाला तुझ्या पट्टेवाल्यांन अडवलं. 

" ए,भिकारड्या...कोण रं तू ?"

“अरं दादा,मी तुझा सायबाचा बाप हाय.त्याला भेटाया आलोय ! त्याची आवडती ' मोहनथाळ ' घेऊन आलोय.मला आत जाऊ दे रं दादा.! "

" तू...अन सायबाचा बाप ! सायबांचा बाप कधीचा मेलाय ! तू चोर ,भिकारी असशील कोणी.चल निघ इथनं! म्हणत त्याने तुझा बाबाला काठीने ढकललं.त्ये भूईवर खाली पडले.तव्हा,तू बंगल्यातून बाहेर आला. म्हणाला, “ गणा,कोण आहे रे हा म्हातारा ? " म्हणून विचारलं.

" साहेब,आहे कोणी तरी एक भिकारी.तुम्हाला भेटायचं म्हणतो.मी म्हटलंय,भिका-यांना भेटायला साहेबांना वेळ नाही.चल निघ ! म्हटलं !”

 तेव्हा तू " ठिक , मला वेळ मुळीच नाही. निघतोय मी .त्या भिका-याला जायला सांग ! " असं म्हणत बाळा,तू गाडीत बसून निघून गेला. खाली पडलेल्या तुझ्या बापाची एका शब्दांने साधी विचारपुस सुद्धा केली नाहीस रे तू! पोरा,आम्ही हा संस्कार केला नव्हता रे तुझ्यावर .इतका निर्दयी कसा झालास रे तू ? 

हं…पोरा,मी विसरलेच रे,तू आता मोठा सायब झालास.शिरमंताचा जावाई झालास,पैसैवाला झालास,म्हणून गर्व तर नाही झालाय ना तुला ? पोरा,नको रे हा गर्व ! गर्वाचं काही काही टिकत नाही.ऐक माझं आणि सोडून दे हा विचार! माणसं ओळख,माणसं जोड.ती आयुष्यभर पुरतात.मान-पान-शान पद असे तो राहते.नंतर ते सरते.हे नको विसरु रं लेकरा ! "

 बाळा, तुझा बघून परत आल्यावर तुझ्या बाबानं धिर सोडला.हाय खाल्ली.म्हणाले,

 " आपण आपल्या पोराला परके झालो गं! ओळख मोडली त्यानं ,ओळख मोडली…!" म्हणत ते धाय मोकलून रडले.😭जेवण खाणं बंद केलं.तुझा वागण्याला बघून त्यांनी चार दिवसांत जगाचा निरोप घेतला.माझं कपाळीचं कुंकू पुसलं गेलं पोरा!तुझे पितृछत्र हरवलं! कुठल्याही बाजारात तू कितीही पैसा दिलास तरी मिळवायचं नाही जे पुन्हा दिसणार नाही. काळाचा पोटात गुडुप झालं...!

रमाबाई मला म्हणाली," बाय,तुझी सून तूझ्या पोराला ईचारत होती," तुझ्यासाठी तुझा बाबानं काय केलं? "

या प्रश्नाला उत्तर देताना तू गप्प होतास म्हणे ! 

पण ...तूला तुझा बायकोसमोर जे बोलण्याचं धाडस झालं नाही.ते सगळं मी ह्या पत्रात लिहलंय.ते वाचून दाखव तिला.अन् सांग,तुझी बायको म्हणजे आमची सुन, कुटुंबाची गृहलक्ष्मी तिच्याबाबत आम्हाला कधीच राग ना द्वेष नाहीच! तीही सुखात राहो हा आशीर्वाद सांग ! तुझे आई-बाबा म्हणून तुझ्या लेकरांना म्हणजेच आमच्या नातवांना डोळे भरुन पाहू शकलो नाही.म्हणून दुरुनच ह्या वेड्या आजीचा मंगल आशीर्वाद सांग! सांगशील ना! हे मागणे नव्हे तर विनंती समज पोरा!"🙏

पण शेवटी एकच मागणं ,तुला वाढवताना आम्ही जे घरंदाज संस्कार केले.ते संस्कार तू तुझ्या मुलांवर कर! न जाणो, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते तुम्हा नवरा बायकोच्या वाट्याला न येवो.ही अंबाबाई चरणी प्रार्थना!तुला नातवांनी विचारलंच ," आजी आजोबा कुठं राहतात.त्यांना भेटायचं आहे ."

" तू सांग,चिमण्यांनो, तुमचे आजी-आजोबा माझ्या लहानपणीच एका अपघातात मेले.ज्यांना मीही डोळे भरुन पाहिले नाही.असं सांग.पण, आमची ओळख करुन देऊ नकोस!ही तुला हात जोडून विनंती!🙏"

तू व तुझा परिवार सुखात राहो! हा आशीर्वाद!


✍️ तुझी आई !


प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics