गुढिपाडवाची कथा
गुढिपाडवाची कथा
उपरिचर नावाचा एक प्रजारंजनतत्पर व नित्य धर्मशील भूपति होऊन गेला. मृगयेसाठी भ्रमण करणे हा त्याचा नित्य संकल्प असे.
उपरिचर राजाने एका आश्रमात उग्र तपश्चर्या आरंभली. तपश्चर्येच्या बळावर तो इंद्रपदाला योग्य होईल अशी भिती देवांना वाटू लागली. सर्वं देव इंद्राचा नेतृत्वाखाली उपरिचराला तपश्चर्येपासून उघडउघड परावृत्त करण्यासाठी आले.
देव म्हणाले , ' राजा,पृथ्वीवर धर्माच्या बाबतीत कसलीही अव्यवस्था होता कामा नये. धर्माला जर तुझा आधार मिळाला तर तो सर्व जगताचे धारण करील. '
इंद्र म्हणाला , ' राजा , तू पृथ्वीवर नित्य तत्पर आणि जागृत राहून धर्माचा प्रतिपाळ कर. तू स्वतः धर्मशील झालास तर तुला शाश्वत व स्पृहनीय लोकांची प्राप्ती होईल. स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या माझ्या पृथ्वीवर वास्तव्य करणारा तू परम मित्र आहेस . म्हणून तू पृथ्वीवर सर्वात जो रमणीय देश असेल अशा देशात राहा. चेदि देश माझ्या दृष्टीने रमणीय देश आहे. गोधनाच्या संवर्धनासाठी हा अनुकूल आहे. तेथे धन-धान्याची विपूल समृद्धी आहे. येथील भूमी बहूप्रसव असल्यामुळे तिच्यापासून अनेक उपभोग्य पदार्थांचा लाभ होतो. धनाची व रत्नांची विपूलता असलेल्या या देशाची भूमी सुवर्णाने विपूल आहे.अशा या स्वर्गतूल्य देशाची जोपासना मोठ्या दक्षतेनेच झाली पाहिजे. म्हणून तू चेदि देशातच वास्तव्य कर,आणि त्या देशाचा तू अधिपती हो !
हे राजन, येथील ग्रामस्थ लोक धर्मशील आहे.साधूसज्जन पूर्ण संतुष्ट आहे.या देशात थट्टेने सुद्धा कोणी असत् बोलत नाही. इथले पूत्र वडिलधारी माणसांच्या हिताला नित्य जपतात. ते आपल्या पित्यापासून कधीच विभक्त निघत नाही. कृश झालेले बैल येथे नांगराला जुंपले जात नाही. उलट ते पुष्ट कसे होतील याकडे लक्ष पुरवितात. चेदि देशात प्रत्येक वर्णाचे लोक नियमित आपापल्या विहित धर्माप्रमाणे वागतात.
इतरांच्या मान राखण्याच्या बाबतीत तत्पर असलेल्या हे राजा, तुला माहित नाही अशी एकही गोष्ट त्रिभूवनात नाही. प्रत्यक्ष देवांनीच ज्यात आरुढ व्हावे आणि आकाशात संचार करावा असे एक स्फटिकाचे गगनविहारी दिव्य विमान मी तुला बहाल करीत आहे.ते तुझ्या सेवेसाठी हजर राहिल.
दुसरे तिच्यातील कमळे कधीच कोमेजून जात नाही अशी वैजयंती माळ मी तुला देतो. संग्रामामध्ये ही माळ नित्य तुझे रक्षण करील, आणि शस्त्रांची जखम तुला होऊ देणार नाही. इंद्रमाला या नावाने ओळखली जाणारी ही माळ तुझे अतुलनीय, नामांकित आणि कमनीय बिरुद ठरेल.'
इतके बोलून देवराज इंद्राने उपरिचर राजाला आपली नित्य आठवण राहावी म्हणून ,
' सज्जनांची प्रतिपाळ करणारी कळकाची एक काठी इंद्राने उपरिचर राजाला बहाल केली.'
नंतर इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराचा शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवून ठेवली.
तेव्हापासून थोर उपरिचर राजाने सुरु केलेल्या प्रघाताप्रमाणे थोर थोर राजे आज देखील वर्षाच्या शेवटच्या दिवशी जमिनीत काठी रोवतात .दुस-या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, वर्षप्रतिपदेला त्या काठीवर शेल्यासारखे एखादे उंची वस्र बांधतात. सुवासिक पुष्पाच्या माळांनी ती शृंगारतात.आणि विधिपूर्वक ती खूप उंच उभारतात.या काठीची (गुढीची ) पूजा म्हणजे उपरिचर राजावरील प्रीतिने स्वतः हंसरुप धारण केलेल्या भगवान इंद्राचीच पूजा होय.
राजश्रेष्ठ उपरिचर वसूने आपली एवढ्या थाटामाटात केलेली मंगल पूजा पाहून प्रभू इंद्र संतुष्ट झाला.तो म्हणाला,
' जी माणसे व जे राजे चेदिपती उपरिचर वसूप्रमाणे परमप्रीतिने माझा उत्सव अशा प्रकारे साजरा करतील, त्यांना ऐंश्वर्य ,विजय प्राप्त होईल. सा-या राष्ट्रात धनसमृद्धी होऊन राष्ट्राचा अभ्यूदय होईल. आणि लोक सुखी होतील .जे लोक इंद्राचा उत्सव ' इंद्रमह ' नित्य करतील आणि त्या उत्सवात ' भूमिदान ' व ' रत्नदान ' करतील ते जगात मान- सन्समान आणि किर्ती इत्यादिस पात्र होतील.'
बहुमोल दान देऊन ,महायज्ञ करुन , आणि दरवर्षी इंद्रमहोत्सव करुन चेदिराज वसूने इंद्राला संतुष्ट ठेवले. इंद्राने चेदिराज राजाचा योग्य मान राखला,आणि त्या चेदिराजाने धर्माने पृथ्वीचे पालन केले. इंद्रावरील प्रेमामुळेच चेदिराजा उपरिचराने इंद्रमहोत्सवाचा प्रघात अखंड चालू ठेवला.
अशा रितीने इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराचा शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने जमिनीत एक काठी रोवली. तिचे पूजन दुस-या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षप्रतिपदेला करायला प्रारंभ केला. तोच पहिला गुढिपाडवा होय.
