आईची धावपळ
आईची धावपळ


सप्टेंबर महिना अखेरीस आहे व सहामाही परीक्षासुद्धा जवळ आहे तरीही अद्याप अमितने स्वतःच्या नजरेखालून कोणत्याही विषयाचे पुस्तक घेतलेले आहे असे अजुनही माझ्या निदर्शनास आलेले नाही, "जो होगा वो देखा जायेगा" अशा वात्रट वाक्यात नेहमी मला सांगत असतो, "अगं आई मी करेन गं!! तू नको चिंता करू, मै हू ना" अशा वाक्यात मला अडकून नेहमी माझी फजिती करत असतो, मित्रांसोबत नको त्या ठिकाणी जाऊन रात्ररात्रभर घरी न येणे , नको तिथे आपल्या वागणुकीचे व शक्तीचे प्रदर्शन करणे, आपल्या सुव्यवहारीक बुद्धिमत्तेचे उदाहरण देत स्वतःबद्दल स्तुतीसुमने स्वतःलाच बहाल करणे व असे बरेच काही साहसी कार्य त्याच्या दिनक्रमात ठरलेले असतात. पण ह्या सर्व गोष्टीत त्याचे अभ्यासावरून जणू लक्षच अकेंद्रित झाले आहे.
अकेंद्रीताचे लक्षण म्हणजेच हा आळस, एका गोष्टीबद्दल वाटणाऱ्या दुर्लक्षित भावनेबद्दलचा सकारात्मक विचार, ह्याचा अर्थ म्हणजेच की जी गोष्ट मनापासून कधी करावीशीच वाटली नाही ती एकदम कशी काय अवगत होऊ शकते, पण हे नक्की किती वेळा?? कधी ना कधी ह्या सर्व गोष्टी पुन्हा निदर्शनास येऊन त्याबद्दल आपणास जागृत तर रहावेच लागते, माणसांचा विकास हा त्याच्या बुद्धिमत्तेवर व असणाऱ्या सर्व व्यावहारिक चातुर्यावर अवलंबून असते, त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात व तो करीत असलेल्या प्रत्येक कृतीवर आपणास त्याचे शारीरिक अथवा मानसिक स्वास्थ्य समजत असते; पण एवढं सांगूनसुद्धा अमितवर ह्या सर्व गोष्टींचा कधीही प्रभाव पडला नाही, तो त्याची वागणूक जशी आहे तशीच ठेवत राहिला, जसं मला पाहिजे तसं मी वागणार त्यामध्ये मला दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींचा कुठलाच फरक पडणार नाही, अशी विचित्र भावना घेत तो तिथून निघून गेला.
हे सर्व ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण जर पुढेही हा जर असच वागत राहिला तर त्याचे नुकसान हे पदोपदी ठरलेलेच आहे त्याबद्दल कोणतीही शंका नाही. एका विचित्र संभ्रमात त्याने मला जसे अडवून ठेवलेले होते पण त्यावर उपाय नक्कीच सुचविणे व ते अमलात आणणे तितकेच महत्वाचे होते. एका विषया संदर्भात दुसऱ्याच्या मनात आवड निर्माण करणे हे फार अवघड व तितक्याच प्रमाणात कठीण सुद्धा असते, प्रत्येक माणसाच्या मनात "आवड" ही निर्माण तर नाही पण त्यातल्यात एक गोडी त्यासमवेत जोडू शकतो पण असो आता त्याला अभ्यासाचे महत्व व त्याच समवेत त्याच्या मनात असलेल्या आळसाचे महत्व अगदी नाहीसे करून टाकणे हा एकच पर्याय माझ्या समोर दिसत आहे. दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्याकडे एकतर्फी दुर्लक्षच करत राहिले, त्याच्या प्रत्येक हालचालींवर, त्याच्या प्रत्येक वागणुकीवर माझे लक्ष अगदी तंतोतंत टिपलेले होते, त्याची नजरसुद्धा माझ्यावर म्हणावी तर तिरकीच होती, तो मुद्दामून मला अतिप्रमाणात काही गोष्टी करून दाखवत असे पण मी ठरविलेले होते की आपण त्याच्याकडे पाहायचंच नाही. असं करून एक आठवडा कधी पूर्ण झाला हे मला सुद्धा कळले नाही पण त्या विरून गेलेल्या एक आठवड्यात त्याच्यात काडीचाही बदल झाला नाही, जसा तो आधी होता तसाच आता सुद्धा समांतर आहे.
एवढा अबोला धरूनसुद्धा त्याच्यात काडीचाही फरक जाणविला नाही, पण माझं त्यात एकप्रकारे अपयशच आहे, जणू ह्या स्थितीत येऊन मला मात्र एकही उपाय सुचत नाही आहे, पण असं बोलूनसुद्धा मी माझ्या जवाबदारीतून माघारी पण फिरू नाही शकत ना!! नक्की आता उपाय करावा तरी कसा ह्या विचारात मी गुंतले होते, त्रास होत होता पण त्याच बरोबर चिंता पण तेवढीच वाटत होती ती म्हणजे त्याच्या भविष्याची व त्याच्या भावी आयुष्याची. जेवढी काळजी ही त्याच्या आईला होती त्याच्यातली निम्मी काळजीसुद्धा अमितला नसेल असे प्रत्येकाच्या निदर्शनास आलेच असेल, मी ठरवलं की थोडा वेळ देऊ या आतापर्यंत जितका वेळ गेला आहे त्यात आणखीन थोडा त्यातही त्याला काहिच फरक पडला नाही तर त्याला अस्तित्वाची जाणीव करून देणं हे महत्त्वाचं आहे. लहानपणी जे आम्हाला मिळालं नाही ते सर्व आम्ही त्याला देण्याचा
प्रयत्न केला, कोणत्याही गोष्टीची उणीव त्याला कधीही भासू दिली नाही त्याचीच ही मोठी शिक्षा मला मिळत आहे, असो पण ह्यापुढे ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठी वर्जित आहे व त्याच्यावर काही प्रमाणात बंधन घालणे पण तितकेच महत्वाचे आहे. आम्ही दोघांनी तरी किती प्रमाणात त्याला समजवावे हे कळत नाही, तरी त्याचे बाबा त्याला कोणत्याही गोष्टीस हे तू करच असं कधी म्हणाले असतील तर ते मी कधीच ऐकले नाही कदाचित ह्याचाच तर वाईट परिणाम झाला तर नसेल ना. लहानपणापासून दिलेली सूट आमच्यास अंगाशी आली तर नाही ना?? माझ्या मनात जणू काय प्रश्नांचा भडिमारच सुरू आहे. नक्की हे किती वेळा?? आजपर्यंत जे काही घडले तर ते पुन्हा घडू नये एवढीच इच्छा.
आपल्या शालेय वेळापत्रकानुसार परीक्षेचा वेळ ही जवळ येत होती व त्याचबरोबर माझी धाकधूक सुद्धा वाढली होती कारण जो निकाल माझ्या मुलाचा येणार होता त्याची कल्पना मला आधीपासून होती व सालाबादप्रमाणे परीक्षा आली, त्याने पेपरसुद्धा दिले. तो आहे तसाच वागत होता, वरवर पुस्तक घेऊन वाचत होता, सोंग करण्याचे त्याला ज्ञान होते त्यातही तो पारंगत होता, आता फक्त आम्हाला आतुरता होती त्याच्या निकालाची. दिवाळीची सुट्टीही अखेर संपली होती व आता शाळेत निकाल घोषित होण्यास अगदी निम्मा वेळ फक्त राहिला होता. माझी धाकधूक व देवाकडे प्रार्थना अगदी सकाळपासून चालू होती, काय होईल व काय नाही असे नेहमी मनात वाटत होते, पण आता काळजी करूनसुद्धा काहीच निष्पन्न निघणार नव्हते. दुपार होताच मी अमितच्या येण्याची वाट बघत होते, वेळेपेक्षा त्याला येण्यास त्यावेळी खूपच उशीर झाला होता. मी अजूनही त्याची वाट बघत होती व तो आला. अगदी नैराश्याच्या भावनेने तो अगदी धिम्या गतीने घराकडे येत होता, माझी धाकधूक तर अगदी शिगेला पोहोचली होती, पण असो जो निकाल येईल तो मी मान्य करेन अशी एक दृढ भावना मी माझ्या मनात तयार करून ठेवली होती. अगदी हळुवारपणे माझ्याजवळ तो आला, त्याने मला शांतपणे बसवलं व त्यानंतर त्याने मला सांगितलं की, आई मी पास झालो आहे. हे ऐकताच जणू दोन मिनिटं मी आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे त्याच्याकडे पाहत होते व तो ही मला वारंवार ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होता, पण काही वेळा नंतर त्याला मी स्पष्टपणे विचारले की तू खरं बोलत आहेस ना की चेष्टा करत आहेस.
माझं हे बोलून होताच तो फक्त म्हणाला की, आई मी पास झालो आहे, तुला जर विश्वास बसत नसेल तर माझ्या शाळेत जाऊन विचार ह्यापुढे मी तुझ्याशी काहीच बोलू शकत नाही. एकतर मला वाटलं की हा खोटं तर बोलत नसेल ना व एका बाजूला वाटत होतं की शाळेत जाऊन काय ती शहानिशा करून येऊ. मी त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शाळेत गेले व त्याच्या निकालाबद्दल त्याच्या शिक्षकांकडे चौकशी केली व त्यांनी जे मला सांगितलं ते अतिशय विलोभनीय व माझ्या विचारापलीकडचे होते.
ते म्हणाले की खरंच तुमचा मुलगा चांगल्या टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे व आमच्या संपूर्ण शिक्षकवर्गाने त्याचं मनभरून कौतुक केले, तुमचा मुलगा हा मस्तीखोर आहे पण त्याचसोबतच तितकाच हुशार व वर्गात त्याचे लक्षसुद्धा असते. त्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण तो नेहमी करत असे, शिक्षकांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात माझ्या मुलाविषयीचे प्रेम अधिक वाढले व मी करत असलेला त्याचा राग हा पूर्णतः माझ्या मनातून निघून गेला. ह्यातून मी एवढेच शिकले की स्वतःच्या मुलावर नेहमी विश्वास ठेवा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारे बळजबरी करू नका. आपण बोलतो की आताच्या मुलांना सत्यपरिस्थितीची जाणीव नाही पण तसे नाही आहे, प्रत्येकाला त्यांच्या घरच्यांची व ते करत असलेल्या कष्टाची जाणीव आहे व हे सर्व विचार करताकरता मी एकच गोष्ट शिकले की माझ्या मुलावर ह्यापुढे मी कोणत्याही प्रकारे बळजबरी करणार नाही व त्याला नेहमी प्रत्येक गोष्टीत माझ्याकडून मिळेल तेवढे प्रोत्साहन देत राहीन व सांभाळ करेन व त्याला लागणारी प्रत्येक गोष्ट मी त्याला देईन व पूर्ण करेन.