आईची आधुरी कहाणी
आईची आधुरी कहाणी
She is a no more डॉ. सांगितले आणि संध्यानी जोरात हंबरडा फोडला. डॉक्टर खोटे ठरवा असे शक्य नाही. मी घेऊन जायला आले आहे आईला!संध्या हमसाहमशी रडू लागली.
शेवटी एका नात्यानी Exit घेतली. संध्या पूर्ण हलून गेली. बाबांकडे तिरका कटाक्ष टाकत बोलली, आता गाजवा तूमचा हक्क कोणावर गाजवणार ?आईला संपवलत तुम्ही. ती रागात बरळत होती.
शेखरने तिला थोपटले थोडं पाणी पाजून बाजूला घेऊन गेला.तिला समजावणीच्या सुरात म्हणाला,संध्या शेवटी व्हायचे ते झाले. तुझ्या त्रागा करण्याने आई परत येणार आहे का? उगाच तमाशा नको हे हॉस्पिटल आहे. बाकीचे पण पेशंट असतात. शांत हो दगडावर डोके आपटून आपलं डोके रक्तबंबाळ होणार दगड आबादी आबादच राहणार तेव्हा शांत.
शेखर कशी शांत राहू ह्या बाप माणसानं गिळलं रे माझ्या आईला सतत दबावाखाली जगली ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.श्वास घ्यायला पण परवानगी लागायची तिला अजून काय सांगू तुला?
संध्याचा आईसाठीचा टाहो ह्रदयाला चिरून टाकत होता.थोड्यावेळाने ती शांत झाली कारण पुढील करायच्या होत्या. तिथे सगळे सोपस्कार पुर्ण केले आणि बॉडी ताब्यात घेतली.
पुढे सगळे क्रियाकर्म तिनेच केले. बाबा अलिप्तच होता.आज आईला जाऊन एक महिना झाला. तिने तिन्हीसांजेला देवासमोर निरंजन लावली. या कातरवेळी तिचे डोळे पुन्हा भरून आले.आणि या आसवात आईच्या आठवणी ओल्या झाल्या.
निघताना टेलिफोनवाल्या भाऊंनी मला एक पत्र गुपचूप आणून दिले होते व सांगितले होते ताई आईची आठवण आहे जाताना तुझी आई माझ्याकडे देऊन गेली व तुझ्याकडे सुपूर्द करायला सांगितले.जपून ठेवली आज माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांती लाभेल. मी तिच्या काहितरी कामाला आलो. तोदेखील हमसाहमशी रडत होता.
ते पत्र पर्समधे ठेवले या देवमाणसाचे मनापासून आभार मानले.आज परत तेच पत्र पुन्हा काढून मी वाचत होते. पण निर्णय मात्र होत नव्हता. हो माझी आई, नकळत्या वयापासून माझी नाळ फक्त आईशीच जोडली होती. बाबा सतत कडक शिस्तीचा तो म्हणेल तीच पूर्वदिशा घरात बाबा असला कि, घरात स्मशान शांतता, आईच्या नावातील शेवटचे अक्षर उच्चारायच्या आत आई समोर हावी हा दंडक.
घरातल्या वस्तूची जागा पण तोच ठरवणार.घरात येणारी प्रत्येक वस्तू देखील त्यांच्याच आवडीप्रमाणे, लहानपणापासून घरात फक्त बाबांचे वर्चस्व ती पाहत होती एक पुरषी अहंकार! एकत्र कुटुंब आईचा सगळा वेळ फक्त स्वयंपाकघरात.घरात फक्त सासरचा राबता.मामा, मावशी हे नात कधी संध्याला तिच्या अंगणात दिसलेच नाही. आई तशी मला लहानपणी नेहमी सांगायची तिच्याबाबतीत.
मी म्हणजे आई खुप कोडकौतुकात वाढले, मी घरातलं पहिलावहिलं अपत्य मी मग खुप कौतूक होतं नंतर माझ्या पाठीवर दोघे आले पण माझी जागा कायम तीच राहिली. त्या काळात मला शिकवले बाबांनी. अगदी इंटरपर्यंत लग्नाचे वय झाले, खुप सोयरिकी येत होत्या अगदी पण नात्यातील पण.
बाबांना नात्यातला मुलगा नको म्हणून दुरचे हे स्थळ सांगून आले. मुलगा होतकरू घर भरलेले लगेच बाबांनी होकार कळवला.आणि लक्ष्मीच्या पावलाने मी या घरात आले. नव्याचे नऊ दिवस लगेचच सरले ग आणि सासुरवासाचे गारूड मानगुटीवर बसले. मोकळ्या वातावरणात वाढलेलली मी बंदिस्त झाले.
फक्त रांधा वाढा उष्टी काढा. घरात सतत पाहूण्यांचा राबता. तश्यात दिवसही गेले. सतत दडपण, मुलगाच हवा बरका असा घरात स्वर दुमदुमला. तो काळ खुपच कठीण गेला ग, मनात सतत धाकधुक. पहिले बाळंतपण, मग बाबा येऊन मला घेऊन गेले मला माहेरी. डिलेव्हरी झाली आणि तु झालीस. सासरचे कोणीही पाह्यला आलेच नाही. तुझ्या बाबानी तर नावच टाकले. मला मुलगा दिला नाहीत, तुम्ही आता तिकडेच रहा आसे पत्र धाडले. खुप वाईट वाटायचे..
आई म्हणायची ओली बाळंतीण रडू नकोस. बाबा तर म्हणायचं रडू नको "म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात" . तुझा बाबा समर्थ आहे तुला पोसायला.नाही पाठवणार जा म्हणावं त्यांना ! मग खुप धीर वाटायचा, पण शेवटी माहेर ते माहेरच. मामा, मावशी मागे होते. मी अशी माहेरी राह्यले तर, त्यांची लग्न कशी होणार?
शेवटी तो पण विचार करायला हवाच होता. मग जे होईल ते होईल शेवटी सटवाई ने जे विधिलिखित तुझ्या बाबतीत लिहिले तेच होईल ते तर कोणी बदलू नाही शकणार.हा सारासार विचार करून मी तुला घेऊन सासरी आले ते हि न कळवता!
खरचं तुझे माहेरी खुप कौतुक होते ग! सव्वा महिना झाला.आईबाबा नको म्हणत असताना पण तुला घेऊन मी सासरी आले. मग सुरूवात झाली ती वेगळी..दारातच भाकर तुकडा ओवाळून न टाकता स्वागत शाब्दिक लाखोली ओवाळून टाकून झाले आले का परत?"खायला काळ नि भुईला भार"आमच्या? झेपले नाही वाटत बापाला?
रोज काही ना कारणाने मला अपमानित केले जायचे. मी सहन करत होते कारण शेवटी माहेरची अब्रू महत्वाची होती.माहेरची ख्याली खुशाली कोणान् कोणाकडून कळत होती. कालांतराने तुझ्या मावशीचे मामाचे देखील लग्न झाले. पण मला जाता आले नाही.
सासुबाईंनी स्वत:हाच आजारपण उकरून काढत नाहितर काहीतरी निमित्त मुद्दाम म लग्नाला जाण्यात व्यतय आणत. शेवटी येथूनच मावशी व मामावर अक्षदा टाकल्या. काळ पुढे सरकत होताच. कोंबडं झाकले म्हणून काय सूर्य उगवायचा राहणार? तद्वतच
एक नशीब चांगले होते कि, तु दिसायला चांगली होतीस आणि चुणचुणीत, मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तद्वत तुझे अंगचे गुण मला दिसत होते. ओढणी गुंडाळून तु आरश्यासमोर ऊभी राहून नाचायचीस छान ठेका घ्यायचीस, मी ओळखले तुला आवड आहे कथ्थकची मग घरात विषय काढला.घरात खुप मोठे रामायण घडले. मग तो विषय तिथेच संपला.
शेवटी तुला शाळेत कोणत्या घालायचे यावरूनही घरात वातंक माजलं, मला तर व्हाईस नव्हता. कारण मुलगी परक्याचे धन काय करायचे शिकवून? वाईट वाटायचं पण काय करणार होते मी पण तु हुशार होतीस. शेवटी तुझ्या हुशारीने नाव कमवत होतीस.
दिवस सरत होते तुझ्यात ऊद्याचा ऊष:काल मी बघत आलेला दिवस ढकलत होते.तुझ्यानंतर मात्र दुसऱ्यांदा माझी कुस उजवलीच नाही. त्यांचे खापर परत माझ्यावरच.
तुझ्या बाललीलात माझा दिवस सरत होता. बाबांशी तु कधी मोकळे पणाने नव्हतीस. एक कर्तव्य म्हणून तो करत होता.आपलेपणा नव्हताच कोठे.
दिवसामासी दिवस सरत होते, तु शाळेत जाऊ लागली. कधीच पहिला नंबर सोडत नव्हतीस. पण कोणाला कौतूक नसायचे.
पण इकडे आज्जी, आजोबा मामा मावशीला भारी कौतुक. मग ना शाळेच्या रस्त्यावर एक टेलिफोन बुध होते. तो भाऊ मोठा प्रेमळ होता. त्याच्या बुधवरून मी आई बाबांना तुझे यश, प्रगती कळवायचे कधी मनातलं बोलायचे. ते खुप खुश होतं तुझ्या बाललीला आणि कौतुक ऐकून. मग तुला बक्षीसाखातर तुझ्या नावाने काही रक्कम पैशांच्या रूपात बॅंकेत जमा करत.
दिवस सरले वयानुसार तुलाही समज आली. चांगले वाईट तुला समजू लागले. चांगल्या मार्काने दहावी पास झालीस. पुढे मात्र तु देखील मागे वळून पाहिले नाहीस. स्कॉलरशिप वरच पुढचे शिक्षण घेतलेस.खुप पुढे गेलीस, आणि मग बाबांशी आरे ला कारे करण्याची हिंमत मिळवलीस.
सतत तुम्हा दोघांत खुपदा वाद व्हायचे. देवाला प्रार्थना करायचे देवा माझं आयुष्य संपलं पण पोरींच नशीब बदलव रे! माझी थोडीफार पुण्याई आहे ना. ती तिच्या ओटीत घाल.
देवाने गार्हाणं ऐकले.चांगल्या पगाराची नोकरी तुला मिळाली. खुप रडले मी त्यावेळी अग पण ते आनंदाश्रू होते..
मग यथावकाश स्वतःहाच्या हिमतीवर तु जोडीदार देखील शोधलास. बाबाने त्यावेळीही खुप तमाशा केला. शिव्याशापाची लाखोली व्हायली. आणि माझ्या संस्कारचे धिंदवडे देखील काढले.
पण मी खुश होते. मी तुला घरातुन निघून जाण्याची हिंमत दिली. कारण ह्या बापाच्या मनात शिजत असलेल्या दाळीचा मला वास आला होता.
त्याने तुझ्यासाठी बीजवर शोधला होता. त्याच्या बदल्यात वराकडील मंडळी तुझ्या बाबाला भरपूर पैसा देणार होते. एकंदरीत तो तुला विकणार होता. ही बातमी मला त्या टेलिफोन बुथवाल्या भाऊने दिली. तिथूनच हा माणूस त्या स्थळासाठी फोन करत होतात.खरच हा बुथवाला देवमाणूस मला मात्र भावाच्या रूपातच भेटला होता.
माझा निर्णय योग्य कि,अयोग्य मला माहीत नव्हते. जावाई भला कि बुरा हि पारख पण मी केली नव्हती. पण तुझी निवड योग्यच असणार हे मला माहीत होते.
पुढे तुला मी जगण्याचा वेगळा मार्ग दाखवला व तु घरातुन गेलीस आणि इकडे घरात नित्य नवा तमाशा सुरू झाला.
आईबाबांना तुझ्या बाबतीत समजले मग पुढे कोडकौतुक तुझे आजोळी झाले.
पुढे मात्र मी खचत होते. शरीरावर याचे परिणाम दिसू लागले आणि मग तब्येत खुपच खराब झाली. मी अंथरूण धरले मग उठलेच नाही.फक्त थोडी आशा तुझ्यात होती. एकदा डोळे भरुन तुला पाह्यचे होते.
आताशी शेवटी शेवटी बाबाला पश्चाताप झाला होता. कारण आता तो घरचा ना घाट का झाला होता.
सतत त्याला सपोर्ट करणारे त्याचा सहपरिवार पण आता विरक्त झाला होता.कोणीच त्याला विचारत नव्हते.
मग त्याला माझी साथ हवी वाटू लागली. पण वेळ निघून गेली होती. आता तो माझ्या निचेतन शरीरावर प्रेम करत होता. कारण तो एकटा पडणार होता म्हणून तो मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता. आता माझ्याकडून तुझ्याकडे पोहचण्याचा मार्ग तो शोधत होता. कारण आता सगळे मार्ग संपले होते.
शेवटी आता निर्णय तुझा आहे. पण जाता जाता एवढेच सांगते एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. आपल्यात फरक ठेवावा. माझे संस्कार पोकळ नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे. निरोप घेते.
तुझीच आई
तळटीप : माझे हे पत्र तुझ्या हाती पडेल तेव्हा मी या जगात नसेल, पण नक्कीच तुझ्या बरोबर कायम असेल.
आई गेली पण खूप काही मागे ठेवून... पत्र परत पर्समध्ये ठेवले. त्या देवदूताचे आभार मानले कारण तो टेलिफोनवाल्या मामाच माझ्या सुखदुःखाचा खरा साक्षीदार मला वाटू लागला.
काय करावे हेच सुचतं नव्हते. बाबाला माफ करावे का? बदला घ्यावा? मग आईचे संस्कार आठवले. पण माफ केले तर हा माणूस उलट्या काळजाचा आहे. "गरज सरो वैद्य मरो" त्यामुळे माझा निर्णय मात्र होत नव्हता.
