आईवडील म्हणजे साक्षात परमेश्वर
आईवडील म्हणजे साक्षात परमेश्वर


जन्मताच ज्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं-वाढवलं आणि नुसतंच वाढवलं नाही. अफाट प्रेमही केलं, काय हवं काय नको याची काळजी घेतली जे पाहिजे होतं ते कशाची फिकीर न करता लगेच आणूनही दिलं. माझा प्रत्येक हट्ट त्यांनी पुरविला.. माझे आणि माझ्या भावाचे डोळ्यात तेल घालून आमचं संगोपन केले... आम्ही खूप भाग्यवान आहोत म्हणून आम्हा दोघांना असे आई-वडील मिळाले जे माझे सर्वात प्रिय आहेत. आई-वडीलांवरून खूप कविता केल्या, लेखही लिहिले पण पहिल्यांदाच लेख लिहण्याचं धाडस केलं... मला जे खरंखुरं वाटतं ते लिहीत गेले. मग कधी आठवल्या लहानपणीच्या आठवणी तर कधी आईने भरवलेला पहिला घास. किंवा बाबांनी पहिल्यांदा आणलेली माझ्यासाठी छोटीशी बाहुली आणि लहान भावाने केलेले अतोनात प्रेम. काही चुकाही झाल्या पण त्या चुकांवरती पांघरूण घालत मला त्यांनी सावरलं. कधी चूक झाली की दोघेही रागे भरायचे तर तितकेच आणि त्यापेक्षाही जास्त लाडही करायचे. माझा प्रत्येक अनुभव विचार आठवणी या लेखामध्ये आहेत. पण त्या दोघांबरोबर घालवलेले सोनेरी क्षण माझ्या मनात घर करून बसले आहेत. काहीही म्हणा माझे त्या दोघांवरती खूप खूप प्रेम आहे..
प्रत्येक जन्मी मला हेच आई-वडील मिळू देत आणि त्यांना माझं आयुष्य लाभु देत. या लेखातून मनाला शांतता देणारी प्रसिद्धी मिळेल. आणि त्यात मोलाचा असा वाटा त्या दोघांचा असेल. कारण त्यांनी दिलेले संस्कार शिकवण यांची ती परतफेड म्हणून छोटीशी भेट असेल. त्यांच्याबद्दल लिहिताना काय काय अजून लिहू हेच मनात येत होतं. कारण दोघांनाही शिस्तप्रियता आवडायची. कधी चुकलं तर कधी आईचा मार आणि बोलणीही खायला लागायची पण चुका केल्यावर मलाच ओरडणार, असं वाटलं की मग रुसवा कुठच्या कुठे पळून जायचा. पण प्रेमदेखील तितकंच करायची. खूप जीव आहे तिचा माझ्यावर. ती मला न सांगतासुद्धा ओळखता येते आणि बाबांची आणि माझी जोडी म्हणजे सवंगड्यासारखी. मला रोज शाळेला सोडणं ते कॉलेज सोडणं-आणणं त्यांनीच तर केलं आहे. माझी खूप काळजी असते त्यांना की माझं कसं होणार आणि माझा लहान भाऊ पण स्वभावाने खूप मोठा आहे. मला समजाऊन घेतो. वेळप्रसंगी काही गोष्टीही शिकवून सांगतो. आम्ही खूप खेळतो आणि भांडतोही पण कधी दूर गेलोच तर दोघांनाही करमत नाही.
त्या तिघांशिवाय माझं आयुष्याचं पानच रिकामं आहे. मी हसते लिहिते व्यक्त होते फक्त त्यांच्यामुळेच आणि मला कोणी विचारले की तुम्ही परमेश्वर बघितला आहात का? तर माझं त्यावर उत्तर हो असं असेल कारण मी त्यांना रोज हसताना बोलताना रागे भरताना माझी माझ्या भावाच्या आयुष्याची काळजी घेताना बघितलं आहे. आम्ही दोघं कसे सुखी आनंदी वातावरणात राहू हे सदैव त्यांनी पाहिलं आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट मेहनत घेतली आहे आमच्या अनेक इच्छा न मागताच त्यांनी पूर्ण केल्या आहेत. म्हणूनच माझ्यासाठी तेच परमेश्वर आहेत.. आपल्याला मूर्तीत देव दिसतो तर माझ्या आई-वडिलांमध्ये दिसतो. आणि त्यांना नेहमी आनंदी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न माझा असेल. कारण आता मी त्यांच्यासाठी काही करण्याची वेळ आली आहे. म्हणून हा छोटासा लेख फक्त आणि फक्त त्यांच्याविषयी ज्यांच्या बद्दल मला आदर वाटतो. कोणासाठी नाही पण जगातली सगळी सुख त्यांच्या पायाशी अर्पण करायची आहेत. कारण हीच शिकवण त्या दोघांची आहे ज्याचा मला खूप अभिमान आहे आणि असेल..