Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

आई कुठे काय करते?

आई कुठे काय करते?

3 mins
304


लहानपणापासुन मला आजूबाजूला गोतावळा आवडायचा. मदतीचा हात कायम माझा पुढेच असायचा. वृषभ रास घेऊन जन्माला आलेली मी, कष्ट तसे पाचवीलाच पुजलेले.कर्तव्य असले तरी आनंदाने पार पाडणारी मी फळाची अपेक्षा मात्र प्रश्नचिन्ह? कौतुक थोडं वळचणीलाच पण चुका मात्र चव्हाट्यावर ! माणसाळलेली मी लग्नाचं वय झाले. तसे वरसंशोधन सुरू हौस एकत्र कुटुंबात राहण्याची म्हणूनच काय नशीबाने पण एकत्र कुटुंबच मिळाले.  लग्न झालं, पण मात्र कर्तव्याचं ओझे मानगुटीवर बसले.प्रत्येकांचे डिमांड पुरे करताना मी कोण हेच विसरून गेले.वेगवेगळया नात्याची कर्तव्य समोर उभे राहिली. 


 भरलेले घर स्वतःहासाठी मात्र कमी पडू लागले.'रांधा वाढा उष्टी काढा' मनाची चिडचिड वाढवू लागले. हिंडाफिरायचे हौसमौजेचे दिवस कोपऱ्यात चिडचूप बसले आवडीप्रमाणे घेतलेले कपडे कपाटात बंदिस्त झाले. पाळण्यातील आवाज निटनिटेकेपणाचा अवतार करू लागले. हळूहळू या मायावी संसारात माझ्यातील मी गुंतून गेली. अजागळ अवतार आता मनाला सुखावू लागला. स्वयंपाकघरातील साधनाशी मैत्री जुळवून गेला. स्वतःहातील निटनिटेकेपणा घरातील वस्तूला निटनिटेकेपणा शिकवू लागला. 


   मग मी घरातच रमुन गेले. नाष्टा काय करायचा स्वयंपाक काय करायचा? या विषयावर माझा अभ्यास सुरू झाला. धुणीभांडी झाडूपोछा या विषयात मी पारंगत झाले. आजुबाजुची नाती कर्तव्यदक्ष गृहीणीची पदवी बहाल करून गेले. यावरच माझे समाधान पुरून उरू लागले. दिवसागणिक विषय बदलले. टप्पाटप्याने वयात प्रगती होऊन, त्या जाग्यावर मुलांचे शाळा,परिक्षा याचे वेळापत्रक बनले. कुटुंबातील काही सभारंभाचे वेळापत्रक यामुळे खुपदा चुकलेच. नात्याला मुरड घालावी लागली. 


  

   दिवस सरत होते. प्रत्येकजनाला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होत होती.मी मात्र स्वतःहाचे अस्तित्व विसरून गेलेली कठपुतली झाले होते.

 स्वतःसाठी वेळ मागायच्या आधी वयस्करांच्या पथ्यपाण्याच्या वेळा घड्याळ दाखवू लागले. सगळ्यांचे आजारपण उपसता, उपसता आपले पण काही दुखत असेल हेच विसरून गेले. दिवसाच्या वेळापत्रकात सगळ्यांच्या आवडीनिवडी घुसवता, घुसवता स्वतःहाची आवड मात्र विसरले होते. प्रत्येकाचा शब्द झेलत होते. मी मात्र गरजेपुरते बोलत होते. जवळ शब्दांची कसब होती. कोणे एके काळी, व्यासपीठावर उभी राहून स्त्री वादी भाषणे ठोकणारी मी आता शब्दांना बंदिस्त करून बसले होते. 'तुला यातले समजत नाही' हे लेबल लावून मिरवत होते.


  प्रत्येकांच्या आवडीचे पदार्थ मनापासून बनवून प्रेमाने भरवत होते. पण मला काय हावे? काय आवडते? हे मात्र मी विसरले होते. ते कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. प्रत्येकाला स्वातंत्र्य हावे होते. त्याच्यासाठी प्रत्येक जण आटापिटा करत होते. सुखाचा मार्ग ते जाणून होते काही ना काही कारणाने हळूहळू कुटुंबातील सदस्य घराचा निरोप घेत होते. आता पाखरांनाही पंख फुटले होते. गगनभरारीचे वेध त्यांनाही लागले होते. त्यांनीही आता वेगळे मार्ग शोधले होते. 

 

  प्रत्येकाजण मग आपापल्या करीयरच्या मागे लागले. त्याच्या वेळेनुसार मग ते त्यांचे कार्यक्रम ठरवू लागले. आता त्याच्या सोयीनुसार माझे वेळापत्रक ठरू लागले. 'तु तर काय घरीच असतेस' या नवीन पद्मभूषण पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. मी कोण होते? काय होते? हे कोणाच्या खिजगणतीत ही नव्हते! प्रत्येक जण आपल्या परीने मला गृहीत धरत होते! कोणे एके काळी आवडीच्या वस्तू साठी सगळी बाजारपेठ पालथी घालणारी मी आता कोणी काही भेटीदाखल दिले तरी समाधान मानत होते. 


   नक्की मी कोण होते? कुठे होते? शेवटी माझी ओळख मीच विसरले होते. तात्पर्य काय तर मी सगळ्यांचा आनंद शोधता शोधता माझा आनंद गमावून बसले होते.माझ्यातला आत्मविश्वास हरवून बसले होते. शेवटी काय हाती लागले होते? सगळे जण आपापल्या रत्स्याने निघून गेले. कारण त्यांनी आपल्यातला "मी" जपला म्हणून आत्मविश्वास कमावला. मी मात्र इतरांचा विश्वास कमावण्यासाठी माझ्यातला 'मी' हरवून बसले होते. 


   शेवटी माझं काय? मी इथे कुठेच नव्हते. आई कुठे काय करते? आई कुठे काय करते? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational