आदर्श श्यामची आई
आदर्श श्यामची आई
जगातील सर्वात सुंदर दोन शब्द म्हणजे आई.. आई म्हणजे अखंड देवघरातील दिव्यासारखी.. वात्सल्याच्या तेजोमय प्रकाशात शुद्ध विचारांनी लख्ख करणारी.. लेकरांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी तीची द्यानज्योत कायम तेवत ठेवणारी.. संकटकाळी वादळातील तिमिरातही मंद प्रकाश देत लढण्याची हिम्मत शिकवणारी..
इयत्ता पाचवीपासुनच मला गोष्टीची पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली होती.. शाळेच्या ग्रंथालयातुन दर आठवड्याला एखादे पुस्तक मी घरी घेऊन यायची.. जेव्हा आठवीला गेल्यावर अभ्यासाच्या विषयांमध्ये वाढ झाली.. तेव्हा मी ग्रंथालयात जाण्याचा मार्ग बंद केला..
वर्षभर अभ्यासाखेरीज दुसरं कुठलंच पुस्तक माझ्या वाचण्यात आलं नव्हतं.. मात्र उन्हाळी सुट्टीसाठी मी वेगळं असं पुस्तक खरेदी करायचं ठरवलं.. दरवर्षी प्रमाणे वार्षिक परीक्षेच्या अगोदर शाळेमध्ये पुस्तक विक्रीसाठी काही संच ठेवले होते.. सगळ्या पुस्तकांमध्ये मला "श्यामची आई" हे पुस्तक पाहताच खुप आनंद झाला.. कारण ह्या पुस्तका मधील गोष्टींची महती खुप लहान पणापासून आई आणि आजी कडून ऐकली होती.. शिवाय दूरदर्शनवर कृष्ण धवल श्यामची आई हा सिनेमा रविवारी संध्याकाळी बऱ्याच वेळा पाहिला देखील होता.. मात्र स्वतः चे पुस्तक असण्याचा अन् ते खुद्द वाचन करण्याचा आनंद काही निराळाच असतो.. म्हणून लगेच दुसऱ्या दिवशीच मी श्यामची आई पुस्तक खरेदी केलं.. ओढ लागे जीवा फक्त "श्यामची आई" पुस्तक वाचनाची..
पण वार्षिक परीक्षा जवळ आल्या होत्या.. त्यामुळे परीक्षा होई पर्यंत मी पुस्तक माझ्या पासुन लांबच ठेवले.. फक्त रोज त्या पुस्तकाचं कव्हर दिवसातून एकदा तरी पहायची.. जश्या परीक्षा संपल्या तसा माझा कल श्यामची आई पुस्तकाकडे वळला. तीन दिवसात मी संपुर्ण पुस्तकाचे वाचन करून काढले.. सिनेमा पाहिला होता त्यामुळे प्रत्येक पाठ वाचताना दृश्य डोळ्यासमोर उभे राहून डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या.. त्यानंतर कितीतरी दिवस पर्यंत "श्यामची आई" ह्या पुस्तक वाचनाचा खोलवर परिणाम माझ्या मनावर रुतला गेला होता.. आईविषयी आदर, प्रेम, लाळ, जिव्हाळाच जणू ओसंडुनच वाहत होतं. कारण बहुतेक गोष्टी सहजीवनाशी निगडित होत्याच..
प्रसिद्ध साहित्यिक व स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले लाडके साने गुरुजी ह्यांनी कृतज्ञतेची मुर्ती असलेल्या आई विषयीचे सुंदर नाते ह्या पुस्तकातून वर्णन केलेलं आहे.. पुस्तकातील प्रत्येक पाठ वाचन करताना अंतकरण भरून आल्याशिवाय राहत नाही.. अन् डोळ्यांतील धारा थांबायचं नाव घेत नाही. १९३५ साली, स्वातंत्र चळवळीत सत्याग्रह केल्याची शिक्षा साने गुरुजीं नाशिक तुरुंगात भोगत होते.. तेथील काही कैदयांना पाच दिवस आठवणी सांगताना त्यांनी त्या बेचाळीस रात्रीचे पाठ लिहून काढले होते. शिस्तीला कठोर आणि मनाने प्रेमळ असलेल्या आई विषयी जिव्हाळ्याने भरलेलं "श्यामची आई" पुस्तक प्रत्येक पाठातुन बोधप्राप्ती करून देते.. कुटुंब प्रेम म्हणजे खळखळ वाहणारा वत्स्यालाचा झरा.. "श्यामची आई" पुस्तक वाचताना साने गुरुजींच्या रम्य आठवणींत मन चिंब भिजून निघत..
श्याम अन् त्यांची आई हे दोन्ही व्यक्तिमत्त्व प्रत्येका साठी आदर्श आहेत.. "श्यामची आई" पुस्तक वाचल्या नंतर लगेच आईच्या प्रेमात पडावं.. अन् तिच्या जीवाशी एकरूप होणारं असं.. इतिहास घडविणारं पुस्तक.. अमर ठरलं आहे.. जीवन जगत असताना प्रेमाने जगावं ह्यांचं प्रत्यक्ष दर्शन "श्यामची आई" पुस्तकातून घडतं. 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही साने गुरुजींची कविता मला खुपच भावते.. कारण आईच ती.. तिने दिलेल्या प्रेमळ शिकवणीचे नितळ स्वरूप ह्या कवितेमध्ये पारदर्शक दिसुन येतात.. मग ते प्रेम मानव जीवनावर असो वा प्राणी मात्रावर..
साने गुरुजींनी भारतमातेची सेवा करावी अशी त्यांच्या आईची इच्छा होती.. लवकरच त्यांच्या आईला देवज्ञा झाली.. साने गुरुजींनी स्वातंत्र युद्धात भाग घेऊन त्यांच्या आईची ईच्छा पुर्ण केली.. एक आई कायम जगाचा निरोप घेऊन गेली होती.. मात्र असंख्य आईंचा श्याम मुलगा झाला.. आजही साने गुरुजींच्या आईचा आदर्श पुढे ठेऊन प्रत्येक माऊलीला "श्यामची आई" व्हावेसे वाटते. साने गुरुजींनी आई विषयी सत्य वाक्य लिहिले आहे.. "मदंतरंगी करूनी निवास.. सुवास देई मम जीवनास.. अगदी खरं ना.. आई अगदी अशीच असते.. मुलांच्या जीवनाला स्नेहाचा सुवास देऊन.. मायेची दरवळ संपूर्ण आयुष्याला प्रसवणारी.. मात्र त्या आईचे ऋण कधीच कोणी फेडू शकत नाही..
मातृत्वाची चाहूल म्हणजे,
आई होण्याची नवीन ओळख..
गर्भारपणाच्या कळा शोषत,
मृत्युशी झुंज देत घेऊन येते दोन नवीन जन्म..
बाळाला जन्म देताच,
आई सुटकेचा श्वास टाकते..
बाळाला उदंड आयुष्य मिळावे म्हणुन,
प्रथम देवाला साकडं घालते..
नऊ महिने नऊ दिवस,
गर्भाशी जोडलेली नाळ कापली जाते..
माऊलीच्या हृदयाशी जोडलेली नाळ,
कधीच कोणी कापू शकत नाही..
