Shobha Wagle

Inspirational

4  

Shobha Wagle

Inspirational

आभाळमाया

आभाळमाया

5 mins
152


दिक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर सुवर्ण पदक मिळवलेल्या डॉक्टर दक्षा मॅडम आपल्या आभाळमायेबद्दल भरभरून बोलत होत्या. तिच्या जन्माची कथा ऐकून सारे हवालदिल झाले होते. खुद्द तिच्यावर अशी अफाट माया करणारे तिचे मानलेले आई-बाबा आज धन्य धन्य झाले होते. कोमेजणारी कळी आज दिमाखाने, मोठ्या नावलौकिकाने जगासमोर त्यांनी उभी केली होती. आणि हे त्यांचे ऋण दक्षाने फेडणे अशक्यच होते. तिचे न फिटणारे ऋण म्हणजे रावसाहेब भोसले आणि दुर्गादेवी माँ.


पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रावसाहेब व दुर्गादेवी नियमीत प्रभादेवी, दादरला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जात असत. तो दिवस मंगळवारचा होता. सकाळी सहालाच जाऊन दोन तासात दर्शन आटपून ते येत असत. आजही ते असेच निघाले होते.


बोरीवली ते प्रभादेवीला अर्धा तास लागायचा. सकाळी साडे सहाला ती अंधेरीला पोहोचली तेव्हा सिग्नलला कार थांबली होती. तेव्हा दुर्गादेवीने रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी झोपलेली पाहिली. तिच्या आसपास कुणीच नव्हते. सिग्नल संपेपर्यंत तिच्याकडे त्या पाहत होत्या. गोड निरागस बालक शांत झोपले होते. सिग्नल संपला, गाडी पुढे गेली. प्रभादेवीला श्री गणेशाचे दर्शन घेऊन परत बोरीवलीला यायला निघाले. नेमकी अंधेरीला साहेबांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. ते दुरूस्त होईपर्यंत बाई पाय मोकळे करायला गाडीबाहेर आल्या. तेव्हा पाहतो तो काय! जातेवेळी पहिलेली मुलगी उठून बसली होती व एकसारखी रडत होती. बाई जरा पुढे गेल्या तर तिच्या गळ्यात एक जाडा कागद लटकत होता व त्यावर लिहिले होते, "मी या मुलीला रस्त्यावर देवाकडे न्याय मागण्यासाठी सोडत आहे." बाई पुढे येताच ती मुलगी त्यांच्याकडे झेपावली आणि "माम्म माम्म" चित्कारली. बाईचं मातृहृदय कळवळलं आणि त्यांनी पोरीला उचलून घेतले. तेवढ्यात साहेबही तेथे आले. ती मुलगी चांगल्या घरातली वाटत होती. साहेबांकडे पाहून ती गोड हसली. साहेब व बाई बराच वेळ तेथे थांबले पण कोणीच आलं नाही. तिला पोलिसांकडे सोपवावे म्हणून तेथे जवळच असलेल्या पोलिस चौकीकडे ते निघाले.


बाईने मुलीला मांडीवर घेतले तेव्हा त्यांना एक पाकीट पिनने अडकवलेले सापडले. त्यांनी ते काढले आणि वाचले. पोरीच्या आई-वडीलांनी घरच्यांविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. पण सहा महिन्यात वडील एक्सीडेंटने वारले. आईला कोणीच आसरा दिला नाही. सहा महिने कसेबसे काढले. आईला कॅन्सरने पछाडले. आता जगणं आणि पोरीला वाढवणं कठीण म्हणून आईने स्वतःचे जीवन संपवायचा विचार केल्याने पोरीला देवाकडे न्यायासाठी सोडत आहे, असा मजकूर होता.


पोलिसांनी सगळी हकीकत ऐकून घेतली. तिच्या आईचे पत्रही वाचून काढले आणि "बघूया, आम्ही चौकशी करतो. पोरीला आमच्याकडे असू द्या. आम्ही तिची व्यवस्था करतो" असे त्यांना आश्वासन दिले. दुर्गाबाईंना राहावलं नाही. त्यांनी विचारले, "तुम्ही काय करणार पोरीची व्यवस्था? मला कळेल का?" 

"बाई, तुम्ही आमच्याकडे पोहोचवलं ना मूल, मग तुम्ही बिनधास्त राहा. आम्ही करू चौकशी."

"अहो, पण या मुलीची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही, असे पत्रात लिहिलेय ना?"

"बाई, तुम्ही कशाला काळजी करता. आम्ही आमचं काम बघून घेऊ. तुम्ही चला आता घरी."


रावसाहेबांनीसुद्धा दुर्गादेवींना गप्प केलं आणि ते परतणार तेव्हा त्या चिमुरडीने बाईंचा पदर घट्ट धरुन ठेवला होता. तो सोडून घेताना त्यांच्या नाकी नऊ आले. त्यांचे डोळे पाणावले. जीव वर-खाली झाला. त्यांचाच नाही तर रावसाहेब आणि पोलिसही गहिवरले. पण त्यांचाही नाइलाज होता. कोण कोणाची पोर, अशी कशी द्यायची. "बाई तुम्ही या आता. आम्ही करतो तिची व्यवस्था आणि कळवतो."


"ठीक आहे" म्हणून रावसाहेब परत घरी आले तरी दुर्गाबाईंना चैन पडेना. एक सारखी तीच मुलगी डोळ्यासमोर येत होती आणि त्या रावसाहेबांना प्रश्न विचारून त्रास देत होत्या. घरी आल्या आल्या दुर्गाबाईंनी प्रश्नांचा भडिमार केला. काय केले हो त्यांनी? कुठे पोहोचवले तिला? एवढीशी पोर! बोलता पण येत नाही. एक वर्ष पण झालं नसेल तिला. कोठे सोडतील, आश्रमात? कसे वागतील ते लोक? तिला सारखी काळजी वाटत होती. रावसाहेबांनी तिला सांगितले मी उद्या जाऊन सगळी चौकशी करतो. 


दुसऱ्या दिवशी ते खरेच चौकीत गेले आणि पोलिसांनीही तिला कुठल्या आश्रमात ठेवले ते सांगितले व तिथला पत्ताही दिला. पोलिसांचे आभार मानून ते घरी परतले. सगळे दुर्गाबाईंना सविस्तर सांगितले. बाई तिला भेटायला खूप उतावीळ झाल्या होत्या. आपण आजच संध्याकाळी जाऊ असे त्यांनी ठरवले आणि संध्याकाळी ते गेले सुद्धा. पोलिसांनी पत्ता व पत्र दिलंय म्हणून मुलीला भेटायला आलो असे तिथे सांगितले.


आश्रमातल्या लोकांनीही त्यांची व मुलीची भेट घडवून दिली. ती चिमुरडीही बाईंना बघितल्यावर आयाच्या कडेवरून झेप घेत बाईंकडे आली. आश्रमाच्या संस्थापकालाही नवल वाटले. मग रावसाहेबानी तिला दत्तक घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांनीही सविस्तर माहिती पुरवली. काय काय करायचे ते सांगितले व एका आठवड्यात सगळे सोपस्कार पूर्ण करून त्या पोरीला घरी आणले.


दुसऱ्या दिवशी रावसाहेब व दुर्गाबाई त्या मुलीला घेऊन परगावी गेले. काही दिवस तिथे राहून दुर्गाबाई व मुलीला तेथेच ठेवून ते परतले. दोन दिवस इथला सगळा कारखान्याचा कारभार नीट मार्गी लावला आणि शेजारीपाजारी सांगितले "मी परगावी नवीन कारखाना उभारला आहे, तिथेच स्थायिक होणार" आणि ते दुर्गादेवीकडे आले. तिकडच्या लोकांनाही नवीन मुलीबद्दल काही वाटले नाही. त्यांना ती त्यांचीच मुलगी वाटली. दुर्गाबाई रावसाहेब या मुलीची नीट जोपासना करत होते. तिच्या बाललीलेत ते मग्न होते. दुर्गाबाईला तिच्या सोबत खूप आनंद मिळत होता. सगळं सुखी-समाधानी होतं. त्यांनी तिचं नाव दक्षा ठेवलं. दक्षा भरभर वाढू लागली. तिला त्यांनी शाळेत घातले. अत्यंत बुद्धिमान असल्याने प्रत्येक वर्षी चांगल्या गुणांनी ती वरच्या वर्गात जाऊ लागली. ती दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाली. रावसाहेबांनी तिला विज्ञान शाखेत जायचा सल्ला दिला. तिने बारावीची परीक्षाही उत्तम गुणांनी पास केली. त्या गुणांनी तिला मेडिकलला सहज प्रवेश मिळाला. मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी रावसाहेबांनी तिला हॉस्टेलमध्ये ठेवले. हॉस्टेलमध्ये तिचा अभ्यास नीट चालला होता.


हॉस्टेलमध्ये मेडिकलचा अभ्यास करत असताना एक दिवस तिला एक निनावी पत्र आले. त्या पत्रात लिहिले होते की तू रावसाहेबांची मुलगी नाही आणि दुसरेच कुणीतरी तिचे आई-बाबा असल्याचे सांगितले होते. खरे-खोटे करण्याकरता तिला पोलीस चौकी आणि आश्रमाचे नाव दिले होते. पत्र वाचून दक्षा घाबरली आणि चकित झाली. पोलीस चौकी आणि आश्रमाचे नाव दिल्याने तिने कुणालाही न कळू देता चौकशी पूर्ण केली आणि तिला कळून चुकले की ती खरेच रावसाहेबांची मुलगी नसून त्यांची दत्तक मुलगी आहे. तिला तिचा सगळा इतिहास कळला. तिचे मन भरून आले. रस्त्यावर फेकलेल्या मुलीला या देव माणसाने स्वतःची मुलगी म्हणून पालन केले. तिला काही कळू दिलं नाही. एवढ्या सहज स्वतःच्या मुलीसारखी जोपासना केली. यामुळे ती भरून पावली. रावसाहेब दुर्गाबाई त्यांना जेवढे होईल तेवढा आनंद द्यायचा म्हणून तिनं नेटाने मेडिकलचा अभ्यास पूर्ण केला व तिला सुवर्ण पदक मिळाले. सगळीकडे आनंदीआनंद झाला. आपल्या जन्माची हकीकत कळली हे तिनं आपल्या मैत्रिणी किंवा कुणालाच कळू दिले नव्हते. मेडिकलला गोल्ड मेडल मिळाल्यामुळे रावसाहेबांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी आनंद सोहळा व्यक्त करण्याकरता एक जंगी पार्टी ठेवली. त्या पार्टीत सगळ्या लोकांना बोलावले होते. त्याचबरोबर दक्षानेही पत्रात नाव दिलेले पोलीस इन्स्पेक्टर तसेच आश्रमातले संस्थापक यांनाही गुपचूप आमंत्रण दिले होते. पार्टी रंगात आली होती. सगळा सोहळा झाल्यावर शेवटी "मला काही सांगायचंय" म्हणून दक्षाने माईक हातात घेतला आणि तिने सर्वांसमोर आपण रावसाहेब व दुर्गाबाईंची मुलगी नसून त्यांची दत्तक मुलगी आहे हे सांगितले. हे कळताच सगळे स्तब्ध झाले. आजपर्यंत गुप्त ठेवलेली गोष्ट हिला कशी कळली म्हणून रावसाहेब-दुर्गाबाईंना काही सुचेनासे झाले. पण दक्षा बोलत होती. तिने सांगितले की आई-बाबा सुद्धा करणार नसतील तेवढे लाड माझ्या या आई-बाबांनी केले. त्यांचं ऋण मी सात जन्मात परतफेड करू शकणार नाही. ही दत्तक घेतल्याची कहाणी खरी आहे हे सांगण्याकरता तिने इन्स्पेक्टर व संस्थापकांनाही दोन मिनीटं बोलायला सांगितले. रावसाहेब आणि दुर्गादेवी या लेकीमुळे धन्य झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational