विसर तू मला
विसर तू मला
का तुला रे भाळते मी ?
प्रेम तुझे पाळते मी
याद येता मज तुझी रे
आसवांना गाळते मी
विसर आता तू मला रे
साथ देणे टाळते मी
फूल वाळे, पान वाळे
वेल सुकली, वाळते मी
ते गुलाबी पत्र खोटे
ती निशाणी जाळते मी
आपले क्षण सोबतीचे
क्षण जुने ते चाळते मी
मोगऱ्याचा शुभ्र गजरा
रोज सखया माळते मी

