उगाच
उगाच
मुद्दाम मग ठरवावं,
नको कुठल्याच विचाराची झुळूक,
म्हणून पटापट साऱ्या खिडक्या आपोआप बंद व्हाव्यात..
मग आत रंगलेला दोनही बाजुंचा सोंगट्यांचा खेळ माझाच आहे,
आणि हे लक्षात असण्याची बोचणी लागत राहावी,
कुठेतरी हरणार ही कासावीस जाणीव त्या अर्ध्या जिंकण्यावर पूर्णपणे सतत विरजण टाकतच होती,
कदाचित माझ्याकडूनच एखाद्या खिडकीची फट उघडी राहिली असावी..
तिचाच शोध घेत घेत मीच केलेल्या अंधारात ठेच नकळत लागावी,
आणि मग ठेचकाळलेला पायाचा अंगठा घेऊन बिटॅडीन हुडकावं..
दिसत नाही म्हणून पुन्हा खिडक्या उघडल्या जाव्यात,
अन त्या अंधारात जखमी झालेली अजून 4 लोकं समोर यावी..
आता चालू असलेला खेळ क्षणात मृगजळ बनतो,
सकाळचा रवी रात्रीच्या चांदण्यांना हवं तसं चमकायला शिकवत असतो..
