तो पाऊस
तो पाऊस
आल्या आल्या पावसाच्या सरी,
भिजण्याची मजला हौस भारी,
टप टप पावसाची कानी ऐकू येई,
मन माझे लगेच अंगणी धाव घेई.
सुटलाय आता सोसाट्याचा वारा,
गगणी सुरू ढगांच्या येरझारा,
मेघ लागले नभी जोरात गडगडू,
काळीज माझे लागले धडधडू.
झाला सुरू आता गारांचा पाऊस,
गारा गोळा करण्याची भारी हौस,
लागलो सगळे गारा वेचायला,
सवंगड्यासह आनदाने नाचायला.
हिमकणाचा सडा पडलाय अंगणी
हर्ष मावेना माझा या गगणी,
घेतले पावसात मनसोक्त भिजून,
चिंब झाले तव मन भरेना अजून.
झिम्मड पावसात धरा घालू न्हाऊ,
ओढे,नद्यामध्ये जल लागले वाहू,
मित्रांसोबत केल्या कागदी होड्या,
पाण्यात सोडताना केल्या खुप खोड्या.
सदा आठवतो पाऊस बालपणीचा
हर्षाभराने नाचे मोर मनीचा,
उन्हाच्या झळ करते काहीली अंगाची,
घेई ओढ मन पावसाच्या आगमनाची.
पावसाची माझी अनोखी मैत्री,
एकमेका भेटण्याची असते खात्री,
भेटतो आम्ही आनंदाने दरवर्षी,
पहील्या पावसाची भेट रोमहर्षी.

