सय पावसाची
सय पावसाची
ग्रीष्म ऋतूत ऋतूत
वैशाख वणवा पेटला
झाला रागावून लाल
बहुदा भास्कर कोपला
धरा व्याकूळ अतीव
उष्ण झळा सोसुनिया
जीवसृष्टी कासावीस
तप्त उन्ह झेलुनिया
तरू वेली कोमजली
पशु पक्षी तहानले
पाणवठा शोधताना
डोळा पाणी तरळले
गुलमोहर बहवा
ताम्रवृक्ष बहरला
लाल हळदी रंगाचा
सडा फुलांचा टाकला
आम्रवनी कोकिळचा
नाद मधुर गुंजला
मनी रसाळ आंब्याचा
सुवास दरवळला
मंद हसून मोगरा
जुई संगती फुलतो
वाऱ्यासंगे दरवळ
आसमंती उधळतो
थंड झुळुकेची आस
होता काहिली जीवाची
नभा कडे पाहताना
सय होई पावसाची
