सुरवात पावसाची (गझल)
सुरवात पावसाची (गझल)
सुरवात पावसाची हळूवार होत आहे
नयनात पावसाळा दमदार होत आहे
बदलून प्रेम गेले कळपात युद्ध झाले
बघ ताटवा फुलांचा तलवार होत आहे
फुकटात रोज कांदे विकतो खुशाल आता
उपवास रोजचा हा सरकार होत आहे
मलब्यात शोधतो मी अवशेष जीवनाचे
तुकडे किती मनाचे क्रमवार होत आहे
सजवून दु:ख सारे हसतो कधी कधी मी
लपवून आसवांना सणवार होत आहे
मुकलोय नोकरीला जमला न कामधंदा
शिकलो तरी अडाणी व्यवहार होत आहे
कळले न राजकारण कळले न अर्थकारण
कळली न लोकशाही मतदार होत आहे

