STORYMIRROR

chikne brothers

Inspirational Others

4  

chikne brothers

Inspirational Others

सुगरण

सुगरण

1 min
1.2K

अशीच ती....

ताटली पेल्यांना मांडवत

स्वयंपाकघरात मिरवते कधी,

हंड्याच्या जोडीला माचीवर कळशी बनून सजते कधी,

कधी मऊ मळलेलं जणू पीठ,

कधी तप्त लालबुंद खापरी-तवा नीट,

तरीसुद्धा पोटाची भूक

भागवणारी चविष्ट भाकरी ती

आयुष्याची चव वाढवणारी सुगरण ती..!!


अशीच ती..

तिखट कधी झोंबणारी लवंगी मिरची,

कधी ठेचलेली तुरट पाकळी लसणाची,

कधी भासती टोमॅटोपरी तिचे गुबगुबीत गाल,

कधी होई रागाने नाक तिखटापरी लाल,

तरीसुद्धा जेवणात हवीशी वाटणारी चटणीची झणझण ती,

आयुष्याची चव वाढवणारी सुगरण ती..!!


अशीच ती...

कधी बनते गोड मधाळ

साखर-गूळ,

कधी थंड गोळा लोण्याचा

गोल,

कधी फक्कड चहाच्या वाफेसारखी मंद,

कधी चढे तिला आमटीच्या फोडणीचा गंध,

तरीसुद्धा मातीच्या चुलीवरील चमचमीत कालवण ती.

आयुष्याची चव वाढवणारी सुगरण ती..!!


अशीच ती..

कधी खरखर तिची त्या घरघरणाऱ्या मिक्सरसारखी,

कधी घालते मंजुळ शीळ कुकरच्या शिट्टीसारखी,

फसफसणाऱ्या दुधावाणी उतू जाते कधी तिची माया,

भातातील शितावाणी

सरसरीत शुभ्र भासे काया,

तरीसुद्धा पंचपक्वान्नाची जणू पंगत ती,

आयुष्याची चव वाढवणारी सुगरण ती..


अशीच ती..!!

कधी कांद्याचे अश्रू दिसती तिच्या नयनी,

खोबऱ्याचा ओलावा नेहमीच जपते मनी,

सुखदुःख शिजवताना संसारात धैर्याचे पुरवते सरपण ती,

स्वतःला सावरत बिचारी

चार भिंतींना देते घरपण ती,

आयुष्याची चव वाढवणारी 

सुगरण ती...!!!

सुगरण ती...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational