STORYMIRROR

Arvind Bhamre

Inspirational

3  

Arvind Bhamre

Inspirational

सत्ता

सत्ता

1 min
13.1K


सत्तेच्या अतिरेक्यांनो

बगळ्याचे कफन

अंगावर घेउन

माजलेल्या कावळ्यांनो

मला ठाऊक होतं

तुमच्या  अचाट ताकदीपुढे

माझ्या एकट्याचा निभाव नाही

माझी विद्रोही मशाल विझायला

वेळ ही लागणार नाही

ज्या भूमीदासाच्या बळावर

तुम्ही राजकारणात साज मढवता

मखमली बिछान्यावर

रातराणीच्या गंधात रात्र घालवून

दारिद्र्यातल्या झोपडय़ांना आग लावता

मातीत पोळणा-या हाडांची

राख होतांना पाहून

नुसत्याच  आश्वासनाचे पाढे वाचता

अशी दुर्बळ क्षीण माणसे

मी पाठीशी उभी केली आहेत

आता पुरे झाले

हात जोडून मागणे

रखरखत्या मातीत चालणारा नांगर

आता हातात घेऊन

आम्ही वेदनेचा टाहो फोडणार आहोत

त्या साठीच

मी आता

घराघरावर बंडाची राख शिंपडतोय

मुक्या कंठात

क्रांतीचा सूर पेरतोय

मी बिथरलेल्या छाताडावर

उद्रेकाची अक्षरे उमटवत आहे

क्षितिजावर टांगलेल्या डोळ्यात

सूर्याची आग ओतत आहे

तुम्ही आता खुशाल

सैतानी सारीपाट रंगवा

हवे तर आजच मला

भर चौकात सत्तेच्या पायाखालती

चिरडून मारून टाका

पण...

मी पेटवलेली

युगाची

श्रमाची लढाई

आता आवरायची नाही

जरा डोळयावरची कातडी ओढून

उद्याच्या सूर्याकडे पहा

तुम्ही शोषलेला, पिळलेला

तळागाळातला दुर्बल माणूस

आज घट्ट विळा धरून

जहरी फणा फुसकारणा-या नागासारखा

पुढे सरसावातोय.

तुमचं कुकर्मी मस्तक छाटण्यासाठी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational