माझ्या मित्रा
माझ्या मित्रा
चल मित्रा उठ,नवीन वर्ष तुझंच असेल
फक्त ऊतू नकोस,मातू नकोस,
अन नवविचार करणे सोडू नकोस,
मग बघ मित्रा,नवीन वर्ष तुझंच असेल.
येऊ देत अनेक संकटे,असू देत अनेक विरोध,
बिनधास्त चल,सामना कर,
फक्त मार्ग आपला बदलू नकोस,
मग बघ मित्रा,नवीन वर्ष तुझंच असेल.
ते आले,ते बोलले,
अन निघून गेले,
तू मात्र अढळ रहा,
फक्त मागे वळून बघू नकोस,
मग बघ मित्रा,नवीन वर्ष तुझंच असेल.
तो काय म्हणेल,त्याला काय वाटेल,
हा विचार सोडून दे,
फक्त अविरतपणे पुढे जात रहा,
जाताना मात्र संयम आपला सोडू नकोस,
मग बघ मित्रा ,नवीन वर्ष तुझंच असेल.
तो काय करतो,ती काय करते,
ही उठाठेव इथेच ठेव,
फक्त तत्वे आपली सोडू नकोस,
मग बघ मित्रा ,नवीन वर्ष तुझंच असेल.
हात जोड,विनंती कर,
प्रसंगी 'महाराज' तुझ्यातील जागे कर,
परंतु माणुसकीचा बुरुज तू कदापि ढळू देऊ नकोस,
मग बघ मित्रा,नवीन वर्षच काय,
तर हे जगही तुझेच असेल,
नवीन वर्षच काय, तर हे जगही तुझेच असेल.
