स्त्री
स्त्री
स्त्रिया ह्या स्त्रियाचं असतात
कालच्या, आजच्या, उद्याच्या असल्या तरी
मायेचा झरा असतात...
त्यांच्या असण्याने बोलू लागतात भिंती नी डोलू लागते छप्पर
त्या असतात
चैतन्याच्या मयूर पिसांनी भरलेलं वहीच पान
नी प्राजक्ताचे टपटपणारे सुगंधी अत्तर...
त्या भरत असतात वळचणीचे रांजण नी,
मनातल्या रांगोळ्यांनी सजवितात अंगण...
त्या असतात जगाची अधाशी तहान
आणि सद्गुणांची ओथंबून भरलेली खाण....
प्राक्तनात पेटलेल्या असोशीची भूक ही असतात त्या
डोळ्याने बोलक्या, पण शब्दांनी मूक असतात त्या...<
/p>
त्या असतात वळणावळणाचा घाट
आणि असतात दवं पांघरलेली मंद पहाट..
असतात त्या घराच्या गाभाऱ्यात लखलखत्या पणत्या
चंद्र ,सूर्याला ही लाजविणाऱ्या दिवट्या मिणमिणत्या..
ज्या चेतवितात भावना जगाच्या
आणि प्रकाशित करतात अंधाऱ्या जगाची वाट
त्यांच्या हसण्याने उठते सप्त सुरांची लाट..
प्रेमाच्या अखंड वाहणाऱ्या नदिसारख्या
फक्त नि फक्त प्रेम,स्नेह फुलविणाऱ्या
जीवनदायिनी आईसारख्या...
म्हणून स्त्रिया या स्त्रियाच असतात
कालच्या, आजच्या, उद्याच्या असल्या तरी
मायेचा झरा असतात...