STORYMIRROR

Anuj Kesarkar

Abstract

2  

Anuj Kesarkar

Abstract

सॉक्रेटीस

सॉक्रेटीस

1 min
243

हे सॉक्रेटीस,

तुझ्या हातातला कंदिल दे मला,

असेच सूर्य पेरीत, अथेन्सपर्यंत जाईन म्हणतोय...

हातातल्या कंदिलाने,

तुझ्या अथेन्सप्रमाणे

मला माझं शहर जागवता आलं तरं.... 

जागलेलं शहर, अश्याच सकाळ जाग्या करीत

तेववत राहील नंदादीप...


तू आयुष्यभर सांगत राहिलास,

खरंखुरं सत्य...

जे पाळलेल्या प्रथेत अन् चाळलेल्या ग्रंथात कधी नव्हतंच...

जे होतं ते सूर्य पेरू पाहणाऱ्या,

विचारांचं भलथोरलं विद्यापीठ...

लेफ्ट-राईट कवायतीत 

आयुष्यभर चालत राहिलास बर्फावरून...

बर्फ वितळण्याएवढा तू जगलास आदर्श...

तुझं भिंतीभिंतीतलं चौक जागवणारं सत्य,

ठरवलं गेलं अपराधी

विषयोगाच्या अवलंबाने...


आणि हो,

तुला देवाचे म्हणणे ही ऐकू यायचे 

मग देवाला विचारायला हवं होतंस तू,

लोकांना जागवणाऱ्याला असंच मारलं जातं का...

देवपण जगलास तू

विचारांच्या मंदिरांवर नितीमत्तेचा कळस चढवून तू गेलास...


आणि हो,

तुझं देवपण सिद्ध करायला

तुला मरावंच लागलं...

बघ... सॉक्रेटीस

काळ ठरला जालीमच,

तुला मारणाऱ्यांचे काय झालं असेल

काळाने ठरवून दिली असेल त्यांनाही जितीजागती मूठमाती...


विचार तपासणीच्या कसोट्यांवर 

प्रेम करतच,

तू विष पिलंस...

विष जालीम होतं का रे?

तुझ्या पुढे पडलं असेल तेही फिकं...

एखादा दयेचा अर्ज केला असतास,

तर सुटलाही असतास कदाचित...

रडणारी तुझी बायका-मुलं जगापुढे उभी करून 

तू शिक्षेतून सुटण्याची तरतूद करू शकला असतास...

पण बुद्धीवर चालणारा तू 

सांगत राहिलास ज्ञानाच्या गोष्टी...


जन्म लांबल्यावर, मरण येऊ लागत जवळ...

तुझं मरण जवळ आल्यावर,

तुझ्या शरीराची व्यवस्था लावण्याचा प्रश्न 

क्रीटोने विचारल्यावर,

जाताजाता सांगून गेलास,

आणखी एक सत्य..

ते... ठरव तुझं तू

विचाराला मरण नसते, त्याला मूठमातीही येत नाही देता...

हे तुझं सांगणं,

मातीत रुजायला 

ही जावाच लागला काही काळ...              

तेव्हा कुठे उभी राहिली,..              

तुझ्या विचारांची विद्यापीठं...


माणूस जातो विचार राहतात...

पुन्हा एकदा,

क्रांतीच्या उंबरठयावर नवं एखादं अथेन्स

नव्या एका सॉक्रेटिसच्या शोधात...

उभं राहतं...

देवाच्या दारात देवाचे विचार घेऊन...

तोवर हातातला कंदिलही जळत राहतो...

धुवांधार काजळी धरत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract