सांजवेळ
सांजवेळ
कधी तरी सांजवेळी
एकटाच असताना मी
तुझ्या माझ्यात झालेल्या
असंख्य प्रसंगाची
उजळणी करीत असतो .....
तुझ्या गर्भित मौनांच्या
पायघड्या वरुन थेट
तुझ्या पर्यंत पोहचतो ....
तिथे मला भेटतात
तुझे निखळ हास्य
मंत्रमुग्ध करणारे शब्द
तुझी स्वप्ने जी प्रत्यक्षात
कधीही न अवतरलेली ....
मग त्या सप्तरंगी स्वप्नांचे
तुकडे एकत्रित येतात
पाहता पाहता एक
चक्रव्यूह रचतात ....
आणि त्यात अनाहूत
असा मी नकळत पण
अपरिहार्याने बंदिस्त होतो
अभिमन्यूसारखा .....
