सागराचे विरहगीत
सागराचे विरहगीत


जावू नको मला तू सोडून गं नदी
का डाव चालली तू उधळून गं नदी
रत्ने तुला नको का माझी तळातली
वाफेत चालली का वाळून गं नदी
आहे स्वभाव खारा माझा जरा तरी
जातेस मीठ का तू चोळून गं नदी
मोठा समुद्र मी गं विश्वातला सखी
श्रीमंत ना कुणी माझ्याहून गं नदी
पाण्यातले महाले मासे जळी खेळी
नात्यांस चालली का तू तोडून गं नदी
मोती तुला सखी शोभे शिंपल्यातले
माळेत शुभ्र मोती घे माळून गं नदी
तो कोणता गुन्हा माझा सांग ना पुन्हा
जातेस का जरासे बोलून गं नदी