पौर्णिमेची रात्र
पौर्णिमेची रात्र
चंद्र नभांगणी प्रगटता
शुभ्र चांदणे वसुंधरेवर
जणू रुपेरी शाल पांघरली
वृक्षवेली सावल्या धरेवर.
रातराणी बहरते अंगणी
गंध आसमंती दरवळतो
चांदरात हर्षविते मनाला
स्पर्श साजणाचा भावतो.
गोल चंद्रमा बघा नभांगणी
रास लिला खेळे तारकांशी
हळुच दडे ढगाआड जाऊनी
कुजबुज चालते चांदण्याशी.
हा खेळ चांदण्याचा नभात
वसुंथरेचे दृष्य रम्य मनोहर
चांद रसात बुडाली वनराई
झोके घेतो पवन झाडावर.
पौर्णिमेची रात्र ही सुंदर
शुभ्र शीतल चांदण्याची
मोर मनाचा फुलवणारी
प्रेमिका संगे चालण्याची.