ओळख मातीची
ओळख मातीची


ज्यांच्या आज्या-पंज्यांनी खोदलेल्या मातीतून आणि फोडलेल्या,
दगडातून बनलेला एकेकाळचा रस्ता,
आज महामार्ग म्हणून मिरवतोय दिमाखानं,
आज त्याच नातू-पंतुनी तुडवला त्याला पायदळी,
रात्रंदिवस अनवाणी पावलानं.
गर्व होता त्याला त्याच्या काळ्याभोर डांबरीपणाचा,
सुगंधाची अन उंची वस्त्रांची सोबत करणाऱ्यांचा,
आज घामेजलेल्या अन उसवलेल्या कपड्यातील,
करपलेल्या कातडीतल्या अन मातीतल्या माणसांनी,
जिरवला माज त्याचा.
वाऱ्याच्या वेगात अन रोजच्या गजबजाटात,
चकाकणाऱ्या डांबरावरच्या मृगजळामागं धावताना,
तो विसरला होता त्याचं अस्तित्व अन भूतकाळ,
आज जगण्याच्या ओढीनं अन बाहूंच्या ताकदीनं,
दमदार पावलांनी, शांतपणानं अन निर्धारानं,
केलं त्याला घायाळ.
रोषणाईनं सजलेल्या-नटलेल्या धाबे अन रेस्टॉरंटसोबत,
खमंग वासानं थांबणारी पोटं अन त्यांच्या भरल्या ढेकरांनं,
तो विसरला होता करपलेल्या अन शिळ्या भाकरीची चव,
आज सुकलेल्या ओठांनी, खपाटलेल्या पोटांनी,
गाठोड्यातल्या चटणीनं अन करपलेल्या भाकरीनं,
केलं त्याला बेचव.
तो हरवलाय डांबराच्या अन सिमेंट काँक्रीटच्या जंगलात,
जगतोय स्वतःच्याच मस्तीत धुंद-बेधुंद होऊन,
क्षणिक सुखाच्या लालसेनं, ढकलतोय घामाच्या धारांना,
लाचारीच्या गटारीत
आज त्याच घामाच्या धारांनी, रक्ताच्या गाठोळ्यांनी,
सुजलेल्या पावलांनी, दाखवून दिलं त्याला,
पाण्यात पडला नि हवेत उडला तरी
शेवट होतो मातीत.