ओढ पावसाची
ओढ पावसाची
ओढ पावसाची
लागली रे आस
दाटले गगनी
काळे मेघ खास
चातक पक्ष्यांची
प्रतीक्षा संपेल
एक बुंद प्राश
तहान भागेल
बरस बरस
पावसाच्या धारा
वसुधा लाजली
पर्जन्याचा मारा
गार झाली धरा
टाकली बिजाई
रोप आले वर
वाऱ्याची अंगाई
डोलती डोलती
वेली फुले पान
हिरव्या शिवारी
आनंदी किसान
डोळ्यात मावलं
भरलं सपन
नको देऊ दगा
पोरीचं लगन
नव्या कपड्यात
बायको पाहिन
दोन वरसान
लुगडे घेईन
गरिबांची गत
ठिगराचं झालं
किती शिवू त्याले
सारंच फाटलं
येईन येईन
आनंदाचे दिस
धन धान्यानं रे
भरतील खिसं
ओढ पावसाची
लागली रे आस
साऱ्या जगामंदी
पोशिंदा रे खास