मराठी भाषा गौरव
मराठी भाषा गौरव
मराठी माझी माय सुसंस्कृत 'सुंदरी' हाय...
रेषांचं छप्पर
तिच्या माथी हाय !...1
ह्रस्व अन दीर्घ
घसरतो कधी पाय...
आधाराला काठीचे
बळ तिला हाय !...2
वेलांटीचा पदर
तिच्या डोईवरती हाय...
काना पाठीशी
सतत उभा हाय !...3
उकार अन मात्राची
'पवित्र' माझी माय...
अनुस्वार अन चिन्हे
आधार तिचा हाय !... 4
स्वर अन व्यंजनाची
नवीन नवरी हाय...
जोडाक्षर पोटात
वाढवती माझी माय !...4
अक्षरे जपता काळजात
संस्कृती धरून हाय...
अवनीच्या गर्भात
आठते माझी माय !...5
कौतुकी सजता शृंगारी
लावण्यवती हाय...
पिढ्यानंपिढ्या जपती वारसा
माझी माय.. माझीच माय !...6
