केशर तिन्हीसांज
केशर तिन्हीसांज
शोधले होते तुला खूपदा..
पण सापडत नव्हती कित्येकदा
तूझी हलकीशी मावळती झलक
पुरी होती जगण्याला
त्या मोरपंखी तिन्हीसांजेला..
आकाशाने सप्तरंगी शृंगार केला
रवी चालला एकटाच.. परतीच्या प्रवासाला..!
एक मावळता केशर किरण..
अधून मधून अलगद डोकावला
त्या बंदिस्त कोनाड्यावर..
पडली त्याची केशर सावली
त्या निर्जीव पाषाणावर
पाषाणही जणू.. सप्तरंगी भासले मनोमन
मनोहरी सोनकिरणाने..
सारी धरा उजळली...जागा घेतली अवकाशी मनात
सात स्वरात अन सप्तरंगी मेघात..
ती मोरपंखी तिन्हीसांज..
अलगद मनाला स्पर्शून गेली
त्या काळोखात एक केशर उजेड
अन सप्तरंगी पाषणाची खुललेली कळी
अगदी सजीव वाटू लागली..
दिवसभरच्या थकव्याने क्षणिक विश्रांती घेत बसलेली ...
तुमच्या माझ्या आयुष्यात..
शेवटच्या टप्प्यात..श्वासात अडकलेली,
मनामनात गुंतलेली..इच्छापूर्तीसाठी आसुसलेली
तूच ती...केशर तिन्हीसांज..!

