मन
मन
खिडकीत बसले असता एकटी
हळीच आला राऊ,
वदला मजसी चल गं सखे,
आकाशाची सैर करुनिया येऊ...
मन माझे मोरपिसाहूनी
हलके हलके झाले,
आकाशाची सैर कराया
राऊ संगे निघाले....
राऊच्या पंखांवरती अलगद
मन माझे स्वार झाले,
उंच आकाशी विहारताना
आनंदुनिया गेले.....
नव्या सखीचे स्वागत करण्या
खग भोवती गोळा झाले,
रीत पाहुनी स्वागताची
मन माझे हरखून गेले......
राऊ
पुसतो वदनी पाहून
सखे, जाऊ या का परती?
नको सखया; मुक्त उडू दे
मज ने क्षितिजावरती....
लाल-तांबडे रंग उधळीत
मित्र आला पुढती,
मग मनोमन मी लुब्ध जाहले
आदित्य तेजावरती....
दुरूनच ती शुक्र चांदणी
लुकलुक करीत हसली,
हसले मीही तिजला पाहून
जणू जुनी सखी मज दिसली....
पुन्हा एकदा राऊ पुसतो
सखे जाऊ या का पुढती?
तृप्त होऊनि मी हि वदले
सखया फिरून जाऊ परती...
चल फिरून जाऊ परती.......