वळवाचा पाऊस...
वळवाचा पाऊस...
विद्युलतेची साथ लेऊनी
मेघगर्जनेसह तो आला
ग्रीष्म तृषित धरित्रीला
क्षणात तो सुखावून गेला....
आम्रसरी होऊन कोठे,
कुठे बैसाखी होऊन बरसला,
वळवाचा पाऊस तो होता
भेटीस तिच्या आतुरलेला.....
वैशाखातील कोपी दिनकर
आग धरेवर ओकू लागला,
अन् तप्त प्रियेला तृप्त करण्या
तो वर्षे आधी धावून आला.....
कुशीत विसावून वसुंधरेच्या
वचन परतीचे देऊ लागला
मृद्गंधाचे दरवळणारे अत्तर
भेट स्वरूप तिज देऊन गेला...
भेट स्वरूप तिज देऊन गेला.........