मीलन आपले स्वर्गी ठरले
मीलन आपले स्वर्गी ठरले
सांगून तुला मन हे थकले, भाव तुला परि का ना कळले
नश्वर चार युगाच्या आधी, मीलन आपले स्वर्गी ठरले
लपवू नकोस ओठांवरचे, आपल्या प्रीतीचे गाणे
सांगू नकोस मला हे, लटके तुझे बहाणे
बाहूंत या तनूच्या तुजला, आहे मिटून जाणे
बहरतील तुझ्यात गुंतून माझ्या, हृदयलतेची पाने
भविष्य आपले सांगत खग, अंबरी निळ्या फिरले
नश्वर चार युगाच्या आधी, मीलन आपले स्वर्गी ठरले
अधीर आत्मा अडकून श्वास, तुझ्या आठवणीत राहे
माझ्या मनीच्या दर्पणामध्ये, तुलाच रोज पाहे
प्रणयझरा मनातून माझ्या, तुझ्या दिशेने वाहे
स्वप्नी माझे प्रेम तुझ्याशी, रोज बोलत आहे
बोलूनही इतके सांगण्या, गुपित एक बाकी उरले
नश्वर चार युगाच्या आधी, मीलन आपले स्वर्गी ठरले
सोडून शंका सार्या दे हा, हात तुझा हाती
याच नाही जन्मांतला सातही, मीच तुझा साथी
गीत उद्याचे सांगेल तुला, माझी श्रावणातली मिठी
सरेल सारी क्षणात एका, तुझी अनामिक भीती
एकमेकांत जाता गुंतून आयुष्य जणू, क्षणात एका सरले
नश्वर चार युगाच्या आधी, मीलन आपले स्वर्गी ठरले