मी सैनिक भारतमातेचा
मी सैनिक भारतमातेचा


कठोर निर्धार करुनी, तोडले पाश नात्यांचे
आयुष्य हेचि आहे, कर्तव्यदक्ष सैनिकाचे
भारतभूमी हेच कुटुंब आमुचे
ब्रीद हेचि आहे सैनिक जीवनाचे
देशभक्तीचा वसा घेतला
सैन्यात भरती होताना,
सोडली मग जीवाची पर्वा,
शत्रुचा वार झेलताना
प्रतिकूल निसर्ग, आव्हानात्मक परिस्थिती
परी निस्सीम धैर्य, अन् दुर्दम्य इच्छाशक्ती
हृदयात कोरली गाथा कारगिल शौर्याची
भारतभूच्या प्रेमासाठी झेलेन गोळीही शत्रुची
न हटता मागे, करणार नाही पर्वा स्वतःची
देशाच्या संरक्षणा देईन आहुती प्राणांची
लढणार रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत
जाज्वल्य देशाभिमानाने सांडेल माझे रक्त
भावनांपेक्षा असेल माझे कर्तव्य श्रेष्ठ
पराभव करून शत्रूचा ठेवेल सुरक्षित राष्ट्र
अभूतपूर्व साहस अन् वसा देशभक्तीचा
फेडीन पांग सारे तिचे, मी सैनिक भारतमातेचा