पाऊस
पाऊस
पाऊस म्हणजे जणू कल्याणकारी राजा
मर्जीने त्याच्याच, आनंदी सारी प्रजा
पाहिल्या सरींमध्ये भिजण्याची येई मजा
मन प्रसन्न करी, तो वरुण राजा. ।।१।।
प्रेमासाठी कधी, रिमझिम बरसतो
कधी क्रोधाने, तांडव नृत्य करतो
बळीराजाला अचानक, प्रसन्न करून सुखावतो
कधी पीक झोडपून, देत्य रूपाचे दर्शन घडवतो. ।।२।।
अवतारी पुरूष बनून, धरतीचा दाह शमवतो
अतिवृष्टी करून, जनजीवन विस्कळित करतो
सृष्टीसाठी शाप, आणि वरदानही ठरतो
कधी देवरुपात, तर कधी दानव म्हणून अवतरतो. ।।३।।
जीवन जगण्यासाठी, दाणा तोच उगवतो
पिकांना जगवून, अभयदान तोच देतो
कधी पिकवलेला दाणाही, हिरावून नेतो
अन् रुष्ट होऊन, दुष्काळही घडवतो. ।।४।।
उमजत नाही, पावसास संबोधावे काय?
वाटते म्हणावे, लेकराला सावरणारी माय
कधी जीवन जगवणारी, दुधावरची साय
कधी आतताईपणाने, अपघाती मोडलेले पाय. ।।५।।
पाऊस म्हणजे, आनंदाचा अक्षय ठेवा
साथ देणाऱ्या प्रियकरासारखा, कायम हवा
पोळलेल्या धरतीसाठी, सुखद गारवा
बहरलेल्या सृष्टीला, नवा शालू हिरवा ।।६।।
पाऊस अवतरतो, दोन भिन्न रूपात
सृष्टीला मिळते, त्याची मोलाची साथ
तोच शिकवतो कला, जीवन जगण्याची
दुःखातूनच सुखाच्या, नव्या पहाटेची. ।।७।।