मन हे वेडे बावरते...
मन हे वेडे बावरते...
प्रेम गीत कसे हे गावे
ना मला ना तुला हे ठावे।
प्रेमाची हळुवार चाहूल
मनास माझ्या मोहरते।
मन हे बावरते,
अन् अलगद सावरते.।
क्षणात इकडे क्षणात तिकडे
फुलपाखरू जणू बागडते।।१।।
कशी सावरू स्वतः ला
अन् या वेड्या मनाला
परि तुझ्या येण्याची
ओढ माझ्या जिवाला
कोठे आहेस प्रियतमा
मन हे.... वेडे बावरते।।२।।
सय तुझी येऊनी मनी
नयनी अश्रूपात होतसे
विरहाची अग्नी काळजास
माझ्या जाळितसे
कधी येशील सख्या
माझ्या अंगणी.....
मन हे वेडे बावरते. ।।३।।
मागणे माझे एकच देवा
सोभाग्याचा मज देई ठेवा
या विश्वाचा विधाता तू
सकलांचा ञाता तू
तुच तारि या जिवाला
मन हे वेडे बावरते. ।।४ ।।
जाणीव तुझ्या येण्याची मजला
प्रित नवी जागवते
आगमनाने तुझ्या सजणा
कळी माझी खुलते
राधा तुझी मी, कृष्ण तु माझा
रुप तुझे पाहूनी मन हे वेडे बावरते.।।५।।
सोभाग्याचे अलंकार लेवुनि
हिरवागार शालू नेसुनी
झुगारुन सारे बंधन नाते
सुंदर रुप आठवते
वाट तुझी रे पाहताना
मन हे वेडे बावरते.।।६।।
प्रित तुझी नि माझी
पुन्हा नव्याने फुलते
झुगारुनी सारे बंधन नाते
तु माझा अन् मी तुझी होते
रुजला तुझ्या प्रेमाचा अंकूर
लाजूनि माझे मन हे बाव
रते।।७।।
गोड गुलाबी क्षण सारे
एकाहूनि एक न्यारे
वर्णन करता सार्याचे
शब्द अबोल होई माझे
साथ तुझी अशीच लाभू दे
मन हे वेडे बावरते.।।८।।
लागली कुणाची नजर प्रितीला
का जीवघेणी परीक्षा प्रेमाला
सांग प्रिया का अबोला
काय कारण दुर जाण्याला
स्वप्न भंगाच्या विरहाने माझे
मन हे वेडे बावरते.।।९ ।।
नियतीचा हा खेळ निराळा
काय कळे कोणाला
काय कारण दुर जाण्या
अपराध माझा काय झाला
का उपेक्षिली मीरा राधा
मन हे वेडे बावरते.॥१०।।
नाते तुझे नि माझे
ना कोणा उकलावे
माझ्यासाठी तु पुन्हा नव्याने
रंग उधळूनी यावे।
तुझ्याच येण्याची असमनी
मन हे वेडे बावरते।।११।।
आठवता तुझे मुखकमल नाथा
थांबल्या प्रेमाच्या वाटा
विरल्या कोठे आणाभाका
वचन जे दिलेस तु मला
आठवुनी प्रेम सारे
मन हे वेडे बावरते.।।१२।।
काय ललाटी हे लिहिले
ना कोणाला कळले
विधात्याने विधान केले
वसुंधरेला या मान्य झाले
क्षणिक साथ पावसाची
मन हे वेडे बावरते .।।१३।।
जरी आपली साथ थोडी
परि न्यारी झाली जोडी
वरुण तु आपाचा राजा
परि तुझीच मी वसुंधरा
तुझ्या प्राप्तीसाठी सजणा
पुन्हा नव्याने जन्मेन मी
स्वीकारुनी कर्तव्याला
मन हे आपले सावरते.॥१४।।