मायमराठी
मायमराठी
थोर माझी मायमराठी, महिमा तिचा किती वर्णावा,
पडे शब्दही अपुरे, ऐसा माय मराठीचा गोडवा
साज - शृंगार करुनी विविध अलंकारांचा भारी,
नटली - सजली अप्सरा, नवरसांनी ही न्यारी
माझी मराठी आहे, शान या संस्कृतीची,
देते आहे साक्ष या हिंदुस्थानाच्या प्रगतीची
उधळीत आहे स्तुतीसुमने देशभक्तांच्या कार्याची,
सांगते आहे गाथा वीर पुरुषांच्या शौर्याची
संतवाणीने मायमराठी दिशादिशांत दुमदुमली,
मराठी तलवार ही , साऱ्या विश्वात खणखणली
मायबोली माझी, इतकी आहे समृद्ध ,
जिच्या नुसत्या शब्दांनी पेटली कित्येक युद्ध
कवी साहित्यिकांनी जागृत ठेवली भाषा मनामनात,
अखंड राहो माझ्या मराठीचे अस्तित्व कणाकणात
मायमराठीने पावन केले या भारत भूमीला,
बनवू अभिजात आपुल्या मराठी भाषेला
