STORYMIRROR

Shreyasee Mantrawadi

Inspirational Others

4  

Shreyasee Mantrawadi

Inspirational Others

मायबोली

मायबोली

1 min
161

महाराष्ट्राचे माहेर मायबोली मराठीला

संतसज्जनही गाती तिचिया महतीला ।।


ज्ञानओवी ज्ञानेशाची भक्तिगाथा तुकयाची

एकनाथ नामदेव गोडी त्यांच्या कीर्तनाची

संतमेळ्याचा भरला तिने मळवट भाळा ।।


काव्य शास्त्र विनोदाचे अंगी ल्यालीसे दागिने

सारस्वत धर्म तिचा ज्ञानगंगेचे वाहणे

साहित्याचा गं संस्कार तिच्या अंगी नाना कळा ।।


सह्याद्रीच्या कपारीत तीच वीरांगना होते

हर हर महादेव एक आरोळी घुमते

झळाळते वीररूप भवानीचे दान तिला ।।


बुद्धीवादी कलासक्त तिच्या उदरी जन्मले

किती थोर वैज्ञानिक देशभक्तही घडले

अमृताचे स्तनपान तिच्या कुशीत जिव्हाळा ।।


तिला नका रे अव्हेरू येई डोळ्यात गं पाणी

तिचे उपकार थोर तुम्ही बोला शुद्ध वाणी

गुणगान तिचे गाऊ तिचा माथी लावा टिळा ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational