माणुसकीचा दिवा
माणुसकीचा दिवा
अरे मानवा दिवाळीच्या सणाला
जरी प्रकाशाने उजळले सारे गांव
तरी अंधारल्या काळजात तुझ्या
एकतरी माणुसकीचा दिवा लाव
कदापी न मिळे कष्टावीण फळ
चोर्य कर्माने वाढणार नाही भाव
आजन्म स्वाभिमान जगण्यासाठी
श्रमप्रतिष्ठेचा दिवा लाव
नारीविना नराचा जन्म अधुरा
मानसी घेऊनी मांगल्याचा भाव
निर्भया जातीचे रक्षण करण्या
स्त्रीपुरूष समानतेचा दिवा लाव
भिन्न जाती धर्म पंथ प्रांत भाषा
नको रक्तपात नको कुणा घाव
मानवात वेल प्रितीचे बहरण्या
सर्वधर्म सहिष्णुतेचा दिवा लाव
आभाळ फाटले ज्याचे अचानक
कधी निसर्ग कधी मानवाचे डाव
घोर तीमिर दरवळणाऱ्या सदनी
संवेदनशीलतेचा दिवा लाव
मन मस्तिष्क लाभले तरीही
वृथा लागे दैव देवतांची झाव
सदविवेकबुद्धी जागृत होण्या
वैज्ञानिक दृष्टिकोन दिवा लाव
काश्मीर असो वा कन्याकुमारी
अखंड भारत माता एकच नाव
या मातेचे ऐक्य जोपासण्यासाठी
राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा लाव
