माझ्या गावाची ही कथा
माझ्या गावाची ही कथा
पावसाच्या सरीनं माझा
गाव भिजलेला
मातीच्या सुगंधात माझा
गाव रमलेला
काय सांगू बाई माझ्या
गावाची ती कथा
कथा ऐकूनी मन दंगूनी
गावच्याच वेशीवरी मी
टेकवली माथा
पावसाच्या सरींनी माझा
गाव सजलेला
सजलेला जसा हिरवी
साडी नेसलेला
साडी साडीत शोभते
गावची ती नारी
नारी श्रुंगार करीते
झाली पेरणीची तयारी
कारभारी गेला राबायला
उजेडाच्या आधी
दिस उजाडता आली
कारभारीण घेऊन भाकरी
भाकरीची चव गोड
संग लोणच्याची फोड
फोड जमीनीची कराया
बैल लागला कामाला
त्याला येसणीची सजा
सारं शिवार फुलवी तरी
निंगडीचा त्याला मारा
मार सोसून सोसून
नांगर ओढून ओढून
त्यानं उभ केलं शेत
शेत पाहुनी डोले
नागरकी त्याचा
काय सांगू बाई तुला
त्या लावणीची मजा
चिखलात रुते रोप जसा
त्याचा मातीतच ठेव
माती देते खूप काही
जणू तिच्यातच देव
देव देवळात राही
वाट पालखीची पाही
आई गुनगुने जात्यावर ओवी
जाती शेकडो असती
माझ्या गावामधी
तरी एकी नांदे
यांच्या मनामधी
मन कसे विसरेल
हिरवे ते रान
गाणं गातो वारा
अन नाचते ते पान
पानावर वाढलेल
माझं जेवण घरात
घर माझे इवलेसे
बागडाया अंगण दारात
अंगणात दरवळ
तुलशीचा परीमळ
माझ्या गावची ती माती
जशी जिव्हाळ्याची नाती
नाती जपायला हवी
मना मनामध्ये गुंफलेली
माझ्या गावची ही कथा
माझ्या गावची ही व्यथा
व्यथा सांगायला हवी
कशी विसरु मी प्रथा
आज माती का रूसली
रुसलेल्या मातीने
मला सवाल केला
इतके देऊनही माणूस
स्वार्थी कसा झाला
