माहेर
माहेर
उंच गगनी विमानातूनी,
फिरता बघते मी धरणी.
दिसे तिथे ते घर कौलारू,
कपिला आणिक तिचे वासरू .
असे तिथे तो श्वान सख्या हो,
तृप्त मनी तो हुंदडतो.
बाजूला ते शेत डुले हो,
वृक्ष, लता अन् फळे, फुले हो .
दृश्य अचानक दिसे वेगळे,
भासे मज ते जरा आगळे.
उभे तिथे तो वृद्ध एकला,
निरखूनी बघतो गगनाला.
हालवून अपुल्या दोन्ही करांना,
भासे मज तो साद घालतो.
सय येई मज मग आजोबांची,
अन् दूर देशीच्या मम गावाची.
सय येई मज काकांची अन काकूंची,
भावांची अन भगिनींची.
उभी माय ती गेही एकली,
वाट बघे ती आसुसूनी.
दृष्य रम्य ते धूसर झाले
बघता बघता क्षणात एके.
पुसूनी लोचने येता भानी,
दिसले मज मी अजूनी गगनी.
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
