लढण्याचा प्रवास
लढण्याचा प्रवास
जीवनाच्या लढाईत हरला तो ,
सांगत होता कुणीतरी मानसोपचार तज्ञ,
सगळे ऐकत होते जणू काही ते होते सुज्ञ.
कुणी सांगितले हे की जीवन एक लढाई आहे?
अन् मग जर लढाई आहे हे सांगितल्यावर ,
लढण्यासाठी का नाही केले तयार ,
का नाही हे शिकवले कुणी की ,
लढाई म्हणजे हार अन् जीत दोन्हीही असणार.
तर काही लढाया तह करूनही जिंकता येतात.
चित्ता सुद्धा चाल करण्या आधी चार पावले मागे जातो,
कृष्णाला सुद्धा मारण्यासाठी कंसाला
थांबावे लागले एक तप
रामाने देखील केले चौदा वर्षांचे तप.
लढाई साठी असावे लागते शस्त्र अस्त्रानी सज्ज,
समोरच्याला तू हरला म्हणून मी जिंकलो,
हे सांगण्याची इच्छा हवी,
तर हरल्यावर तू चांगला लढलास
मीच आज कमी पडलो.
हे मान्य करण्यात ला मोठे पणा हवा.
कधीतरी शरीराने नाही मनाने जिंकायचे असते,
अन् जर मन हरले तर त्याला राखेतून उठवायचे असते.
एक हात ठेऊन नुसते तू लढ म्हणून चालत नसते,
लढण्यासाठी त्याला तन मनाने तयार करावे लागते.
तंदुरुस्त असण्यापेक्षा मन कठीण असणे
किती आवश्यक आहे हे त्याला शिकवणे महत्वाचे असते.
मुख्य म्हणजे जीवन ही लढाई नसून
तो एक प्रवास आहे हे त्याला सांगायला हवे,
प्रवासात दमल्यावर विश्रांती घ्यायची असते,
अन् परत नव्या दमाने सुरवात करायची असते.
प्रवासातील टप्पे आहेत उन,पाऊस,वादळ वारे
तयारी जर ठेवली तर तोंड देऊ शकतो आपण सारे.
चुकला जरी रस्ता तरी देतो नवीन दिशा ,
ना उमेद झालो तरी जिवंत असते आशा.
लढाईला शेवट नाही ,ना बंध ना आकार,
प्रवासात मात्र उशिरा का होईना
आपले होते स्वप्न साकार.
लढाई पेक्षा प्रवास देतो आपल्याला ज्ञान,
जगण्यासाठीचे मिळते आत्मभान.
थोडे शहाणपण बाळगले ना आपण
झुगारले जर विचारांचे कृपण,
होईल सुखाचा प्रवास सर्वांचा
नाही सोडणार मग कुणी अवेळी हात
देतील सर्वजण मनापासुन साथ.
