कृषकाची आर्त
कृषकाची आर्त


करू नकोस वंचना, उतर रे झणी धरां
साहवेना ओढ ही अवतरणा करी त्वरा
स्तब्धली या आर्जवे, आसवे डोळ्यामधे ,
प्रार्थिता थांबती हे शब्द शुष्क कंठामधे !! १ !!
भेगाळली, वाफाळली, व्याकुळली काळी धरा
झडकरी येई वरुणा, मीलना वसुंधरा.
प्रतीक्षेत तुझ्या किती गमावला समय सारा
मनी आस चातकाची, सुखव तू चरांचरां !!२ !
असे दाह अंगात तप्त हा निखारा.
तुझ्या विना उले सले येतसे शहारा
उष्णतेचे हे उसासे ,कसे तुला समजवावे?
दुजा नसे अन्य जगती, आग कोणी शांतवे !३ !!
चिंता एक वसे उरी, बीज हे रुजेल का?
अंकुरासह पालवी प्रीतीची लेवेल का.?
जोजावीण्या त्या जीवाला अथक मी श्रमेन रे
प्रार्थना मम अंतरीची करुणानिधी स्वीकार रे !! ४ !!
कां न दिसते दृष्टीला तुझ्या होरपळ ही या जीवांची
आशाळभूत नेत्र होती करून दाटी आसवांची.
शुष्क ओढे, नदी, नाले आणि चिमणी पाखरं
करी प्रदान चैतन्या ,भेटुनी अवनीवरं !! ५ !!
झिमझिमत ये, शिडकत ये, वा ये उधळीत धारा
आसूसली दृढ आलिंगना, अतृप्त ही सारी धरा..
उफाळून येऊ दे शिवारी, बीज-मोतियांचा तुरा
धन्य, तृप्त होऊनी, शांती येऊ दे घरा. !!६ !!