उत्कंठा
उत्कंठा


वैशाखासम ऐन दुपारी किती काहिली रणरणती
प्राणीमात्रा,सूर्यदेवता करी होऽरपळ धरतीवरती.
कृष्ण जलद ते नभीचे सारे, एकवटुनी यायेती
अंधुक आशा, येईल वर्षा, पार पळाली त्यांची भीती ----१
अनिलासंगे फेर धरूनि, तरू तरू झुलती डुलती,
उच्चस्वरांनी करुनी कलकल, चिमणी पाखरे भिरभिरती,
उधळीत भूरज उर्ध्वदिशी, आवाहन मेघा करिती
मोदभरे क्रीडती बालचमू, अंगोऱ्या अन भिरभिरती .----२
एक रुपेरी चंचल मासोळी, भेदरलेली तटाकी तळीं,
मनात होती एकच आशा आनंदाची उन्मललेली.
तळापासुनी घेऊन गिरकी उडी घेतली पाण्यावरती
झुलवीत कल्ले, अंगावरती तुषार शिंपित, सुखावली ती -----३
सरली सारी आर्त ओढ ही, झिमझिम होता धरणीवरती.
दरवळला मृद्गंध धरेचा, पखरण झाली चैतन्याची
थेंबथेंबीचा वेग पालटून, जलधारा सळसळती
पुलकित जाहली चिंब होऊनी, सकल धरित्री कृतार्थ ती ---- ४