STORYMIRROR

Mohan(Sitaram ) Deshpande

Others

3  

Mohan(Sitaram ) Deshpande

Others

आई

आई

1 min
197

माझ्या ‘माये’चा पदर

आहे लई बहुगुणी,

देवदुर्लभ असे तो

त्याची मोठी गं कहाणी.


माझी माय गं अडाणी,

तिच्या मनीं भोळा भाव.  

लुगड्याच्या बाजारात

खातो पदरच भाव.

चुली म्होरं रांधताना

भांडी उचली शेवाने,

घाम कपाळी आगीचा

पुसे त्याच पदराने.


कधी काटक्या ढलप्या

चुलीसाठी सरपण,  

गोळा कराया पदरात

कोस कोस वणवण.

माझ्या मायेच्या पदरात

शिवाराचा वानवळा,

कधी गाजर काकडी,

कधी वांगी,कांदा, मुळा.


पदराखाली मायेच्या

अमृतपानाचे गं सुख,  

पुसे त्याच पदराने

माझे माखलेले मुख.

झुंजे थंडी, वारा, पाऊस

घट्ट लपेटी पदर

कवटाळता उराशी

नसे जगाची फिकीर. 


माझ्या मायेची गं मांडी

मऊ फुलांचा गालीचा

जशी दुधावरली साय 

स्पर्श गालाला हाताचा.

देहावरी फिरता हात

चांदण्याची बरसात,

पांघरूण पदराचे

जीव सुखावे उबेत.


हाती धरून पदर

बाळ टाकितो पाऊले,

भिंती पल्याडचे जग

त्याला उमजून दिले.

घोर नसे त्या जीवाला

लपताना पदराआड,

येता आधाराला शेव

बाळ चाले धाड धाड .


धागे विणिले मायेचे,

उगा नव्हे गं पदर,

देवे विणीला गं शेला,

ऐसी जादुची पांघर.

ना कोणी शोधील

ना कुणा गवसेल,  

किती अप्रूप म्हणू मी

चीज ऐसी अनमोल. 


कुणासाठी काही असो,

स्वर्गसुख माझ्यासाठी,

तुच्छ भासे चराचर

मुठी असता ही मिठी. 

मिळो बालकांना जगी

अशी ममतेची छाया,  

सुखी होतील जगी या

पांघरता आभाळमाया.


Rate this content
Log in